नवीन घड्याळ, डबे, बॅग, बूट अशा कोणत्याही नवीन वस्तू आणल्या की त्यांच्या बॉक्समध्ये एक पांढऱ्या रंगाची छोटीशी पुडी असते. त्या पुडीवर लिहिलेलं असतं की, ‘सिलिका जेल, खाऊ नका.’
हे सिलिका जेल नेमकं काय असतं आणि ते या वस्तूंमध्ये कशासाठी ठेवलं जातं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. तर, आज आपण या बद्दलच जाणून घेणार आहोत.
वस्तू सुस्थितीत राखणारी ही छोटी पुडी
या छोट्या पुडीत एक अशी खास गोष्ट असते, जी आपल्या वस्तू खराब होण्यापासून वाचवते. या छोट्या पुडीला डेसिकंट (Desiccant) म्हणतात. डेसिकंट म्हणजे अशी वस्तू जी हवेतील जास्तीचा ओलावा शोषून घेते.
आता तुम्ही म्हणाल, “याची काय गरज?” तर, जेव्हा अनेक कंपन्या त्यांच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतात किंवा गोदामात साठवतात, तेव्हा तिथलं वातावरण कसं असेल हे त्यांना माहीत नसतं. कधी खूप पाऊस असतो तर कधी खूप दमट हवा असते. अशा दमट वातावरणात या वस्तूंना गंज लागू शकतो, बुरशी येऊ शकते. त्यामुळे ते उत्पादन पूर्ण खराब होऊ शकते. म्हणूनच या वस्तू चांगल्या स्थितीत तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी कंपन्या या डेसिकंटच्या पुड्या त्यात ठेवतात.
सिलिका जेल कसं असतं?
या पुड्यांमध्ये सर्वात जास्त डेसिकंट म्हणजे सिलिका जेल वापरलं जातं. हे सिलिका जेल म्हणजे छोटे छोटे, कडक आणि थोडे पारदर्शक दिसणारे मणी असतात. हे मणी वाळूत किंवा दगडांमध्ये सापडणाऱ्या सिलिकॉन डायऑक्साइडपासून तयार करतात.
आता हे मणी पाणी कसं शोषून घेतात? तर या मण्यांमध्ये डोळ्यांना न दिसणारी, खूपच लहान लहान छिद्रं (Nano-scale pores) असतात. ही छिद्रं इतकी बारीक असतात की, एखाद्या अणूच्या आकारापेक्षा फक्त 15 पट ती मोठी असतात. झाडं जशी त्यांच्या मुळांमधून आणि बारीक नसांमधून पाणी वर खेचतात अगदी त्याचप्रमाणे हे सिलिका जेलचे मणी हवेतला ओलावा या बारीक छिद्रांमधून स्वतःकडे खेचून घेतात.
हेही वाचा : आपण QWERTY कीबोर्ड का वापरतो? यामागची गंमत तुम्हाला माहितीये का?
सिलिका जेल विषारी आहे का?
या पुड्यांवर ‘खाऊ नका’ असं स्पष्ट लिहिलेलं असतं. त्यामुळे ते खूप विषारी असतील असा आपला समज असू शकतो. तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या पुड्यांमध्ये असलेले सिलिका जेलचे मणी सहसा विषारी नसतात. पण हे मणी खाल्ले तर ते गळ्यात अडकण्याचा धोका असतो. यामध्ये काही सिलिका जेलमध्ये रंग दिलेले मणी असतात. जो ओलावा शोषून घेतल्यावर बदलतो. उदाहरणार्थ, काही सिलिका जेल निळे असतात आणि ओलावा शोषल्यावर गुलाबी होतात. या रंगांसाठी जो पदार्थ वापरला जातो तो थोडा विषारी असतो. पण मण्यांमध्ये त्याचा वापर खूप कमी प्रमाणात केलेला असतो.
डेसिकंटचे इतर प्रकार
सिलिका जेलशिवाय अजूनही बरेच पदार्थ आहेत जे ओलावा शोषून घेण्यासाठी डेसिकंट म्हणून वापरले जातात. यात झिओलाइट्स, ॲक्टिव्हेटेड ॲल्युमिना आणि ॲक्टिव्हेटेड कार्बन हे पदार्थ येतात.
तसंच, तुम्ही मोठ्या कपाटांमध्ये किंवा धान्याच्या कोठारांमध्ये ओलसरपणा शोषून घेणारे डब्बे पाहिले असतील. त्या डब्यांमध्ये कॅल्शियम क्लोराईड नावाचं एक डेसिकंट असतं. हे एक प्रकारचं मीठच आहे, जे तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात मिळू शकतं.
डेसिकंट परत वापरू शकतो का?
डेसिकंटचे पाकिट किंवा मोठे डेसिकंट डब्बे वापरून फेकून द्यायचे असतात, असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही त्याचा पुन्हा वापर करू शकता. सिलिका जेलला परत ‘चार्ज’ करण्यासाठी किंवा त्यातील ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही ते ओव्हनमध्ये 115-125 अंश सेल्सिअस तापमानावर दोन-तीन तास ठेवू शकता. पण जर ते प्लास्टिकच्या पुडीत असेल तर ते ओव्हनमध्ये ठेवू नका, कारण प्लास्टिक वितळू शकतं.
त्यातला ओलावा काढून टाकल्यानंतर, सिलिका जेलच्या पुड्या खूप कामाच्या ठरू शकतात. जर तुमचा फोन कधी पाण्यात पडला तर तुम्ही तो सुकवण्यासाठी तांदळापेक्षा सिलिका जेल वापरू शकता. कारण सिलिका जेल खराब होत नाही आणि तुमच्या वस्तूंवर डागही पाडत नाही. तसंच तुमचा कॅमेरा कोरडा ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. जुने फोटो आणि फिल्म एकमेकांना चिकटू नयेत म्हणून देखील याचा वापर करता येतो.



