आपण अनेकदा बघतो की कपडे धुतल्यावर किंवा पाण्यात भिजल्यावर त्यांचा रंग थोडा गडद वाटतो. विशेषतः सुती कपडे ओले झाल्यावर त्यांच्या रंगात स्पष्ट फरक दिसतो. कोरडे असताना जे कपडे फिकट वाटतात, तेच ओले केल्यावर अचानक गडद का दिसतात? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का असं का होतं? यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. चला याबद्दल समजून घेऊ.
आपल्याला दिसणारा कोणताही रंग हा प्रकाशावर अवलंबून असतो. सूर्यप्रकाश किंवा एखाद्या दिव्याचा प्रकाश जेव्हा वस्तूवर पडतो, तेव्हा त्या वस्तूवरचा काही रंग शोषला जातो आणि ज्या रंगाचा प्रकाश शोषला जात नाही तो रंग परावर्तित होतो आणि तोच रंग आपल्याला दिसतो.
पांढऱ्या प्रकाशात अनेक रंग मिसळलेले असतात. प्रत्येक रंगाची स्वतःची वेगळी wavelength आणि frequency असते. कपड्याचा रंगही याच प्रकारे दिसतो.
कोरड्या कपड्याच्या आतली बाजू प्लेन नसते. तो भाग थोडा खडबडीत असतो. त्यांच्या धाग्यांमध्ये बारीक हवेची जागा असते आणि त्यामुळे त्यावर पडलेला प्रकाश त्यामध्ये पसरतो. हाच पसरलेला प्रकाश मूळ रंगाशी मिसळून त्या रंगाला थोडा फिकट करतो. त्यामुळे कोरड्या कपड्यांचा रंग आपल्याला थोडा सौम्य दिसतो.
पण कपडे पाण्यात बुडवल्यावर पाणी त्या कपड्याच्या धाग्यांमध्ये आणि खडबडीत जागी शिरतं. यामुळे कपड्याचा तो खडबडीतपणा कमी होतो आणि त्याचा पृष्ठभाग थोडा गुळगुळीत होतो. आणि कपड्याचा खरा, मूळ रंग अधिक स्पष्टपणे दिसतो आणि म्हणूनच रंग आपल्याला अधिक गडद वाटतात.
हे विशेषतः सुती कपड्यांमध्ये अधिक जाणवतं. कारण कॉटन हे नैसर्गिक धाग्यांचं बनलेलं असतं आणि त्यात खडबडीतपणा आणि हवेच्या जागा अधिक असतात. त्यामुळे पाणी त्यात सहजपणे शिरते. म्हणूनच फिकट वाटणारे सुती कपडे ओले केल्यावर त्यांचा रंग गडद दिसतो.
सिंथेटिक आणि सिल्कच्या कपड्यांमध्ये मात्र हे प्रमाण कमी असल्याने, ते पाण्यात सुती कपड्यांइतके गडद दिसत नाहीत.
आता पुढच्या वेळी तुम्ही तुमचे सुती कपडे धुताना बघाल, तेव्हा तुम्हाला यामागचं विज्ञान नक्की आठवेल!