आपण रोजच मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर टाईप करतो. कधी विचार केलाय का, हा कीबोर्ड नेहमी QWERTY नेच सुरु का होतो? त्यावर A, B, C, D अशी अक्षरं क्रमाने का नसतात? किंवा मराठीत ‘क, ख, ग, घ’ अशी का नसतात? त्याऐवजी, ही अक्षरं Q, W, E, R, T, Y अशा एका विशिष्ट आणि थोड्या विचित्र क्रमाने का असतात? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि यामागे एक खूप मजेशीर गोष्ठ आहे. चला तर मग, आज याच QWERTY कीबोर्ड बद्दल जाणून घेऊया.
टाइपरायटरची गोष्ट आणि QWERTY
आज आपण जो कीबोर्ड वापरतो, तो गेल्या शंभर वर्षांपासून तसाच आहे. त्यावरची अक्षरंही तशीच आहेत.पण ही मांडणी कशी झाली, यामागे एक खास कारण आहे. साधारण 1870 च्या दशकात क्रिस्टोफर लॅथम शोल्स नावाच्या एका अमेरिकन व्यक्तीने पहिलं व्यावसायिक टाईपरायटर मशीन बनवली. सुरुवातीला या टाईपरायटरवर अक्षरं ABCDEF अशा क्रमाने होती. पण त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली.
जेव्हा लोक खूप वेगाने टाइप करायचे, तेव्हा जवळपास असलेली दोन बटणं एकाच वेळी दाबून टाइपरायटरची चाकं अडकायची. याला Typewriter Jam होणे म्हणतात. यामुळे, लोकांना टाइप करताना खूप त्रास व्हायचा,अडचण यायची, त्यांचा वेळ वाया जायचा आणि टाइप करण्याची गती देखील खूप कमी व्हायची.
या समस्येवर उपाय म्हणून, शोल्सनी अक्षरांची जागा बदलण्याचा विचार केला. त्यांनी अशी मांडणी केली, जिथे जास्त वापरली जाणारी अक्षरं दूरदूर ठेवली, जेणेकरून टायपिंग करताना हॅमर अडकणार नाहीत आणि टाईपरायटर जाम होणार नाही. खूप विचार करून आणि अनेक प्रयोग करून त्यांनी QWERTY मांडणी तयार केली.
जी अक्षरे लोक जास्त एकत्र वापरतात, ती थोडी दूर दूर ठेवली. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये ‘T’ आणि ‘H’ ही अक्षरे खूप एकत्र येतात जसे की ‘The’, ‘This’ या शब्दांमध्ये. म्हणून, त्यांनी ही अक्षरे थोडी दूर ठेवली. कॉमन अक्षरं जसं की ‘E’, ‘T’, ‘A’, ‘O’, ‘I’, ‘N’ ही आसपास ठेवली जेणेकरून बोटांना जास्त लांब जावं लागत नाही. अशाप्रकारे, त्यांनी सर्वात जास्त वापरली जाणारी अक्षरे आणि जी अक्षरे एकमेकांच्या पाठोपाठ जास्त येतात, ती दूर दूर ठेवली. यामुळे टाइपरायटर अडकणे थांबले आणि लोक वेगाने टाइप करू शकले.
QWERTY कीबोर्ड फार्मेट आजही तसाच का आहे?
सुरुवातीला ही फक्त एक अडचण टाळण्याची युक्ती होती. पण नंतर लोकांना याच कीबोर्डची सवय झाली. लोक याच कीबोर्डवर वेगाने टाइप करायला शिकले. जेव्हा कॉम्प्युटर आले, तेव्हा लोकांना नवीन कीबोर्ड शिकायला लावण्याऐवजी, टाइपरायटरसारखाच कीबोर्ड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे, लोकांना लगेचच कॉम्प्युटरवर टाइप करणे सोपे झाले. म्हणूनच, आज आपण जे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलवर कीबोर्ड वापरतो, ते सगळे QWERTY कीबोर्ड आहेत.
रेमिंग्टन (Remington) नावाच्या एका मोठ्या टाइपरायटर बनवणाऱ्या कंपनीने जेव्हा आपल्या यशस्वी मशीन्समध्ये QWERTY लेआउटचा वापर केला, तेव्हा हा कीबोर्ड खूप लोकप्रिय झाला. टाइपिंग शिकवणाऱ्या शाळा आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी लोकांना याच QWERTY कीबोर्डवर शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे, हा लेआउट पटकन सर्वांसाठी सामान्य बनला.
वेळेनुसार, याचा वापर इतका मोठ्या प्रमाणावर वाढला की, QWERTY सोडून दुसरा कोणताही लेआउट वापरात आणणे खूप अवघड झाले. याला ‘नेटवर्क इफेक्ट’ (Network Effect) म्हणतात. याचा परिणाम असा झाला की, QWERTY जगभरात सर्वांसाठी वापरला जाणारा एक सामान्य कीबोर्ड बनला.
हेही वाचा:बांधकाम साईटवरच्या हेलमेटच्या रंगांचा अर्थ
दुसरे कीबोर्ड आले, पण QWERTY ला हरवू शकले नाहीत
1930 च्या दशकात, ड्वोराक सिम्प्लिफाईड कीबोर्ड (Dvorak Simplified Keyboard)* नावाचा एक नवीन लेआउट तयार करण्यात आला. हा QWERTY पेक्षा जास्त वेगवान, जास्त सोपा आणि वापरण्यासाठी जास्त आरामदायक होता. यावर टायपिंग करताना हातावर कमी ताण यायचा.
या ड्वोराक लेआउटमध्ये खूप चांगले फायदे असूनही, त्याला कधीच जास्त लोकांनी स्वीकारले नाही. याचं मुख्य कारण तेच ‘नेटवर्क इफेक्ट’. तोपर्यंत, बहुतेक लोक आधीच QWERTY वर टाइप करायला शिकले होते. कंपन्यांनीही QWERTY लाच सामान्य मानले होते. त्यामुळे, नवीन कीबोर्ड शिकणे खूप खर्चिक आणि गैरसोयीचे वाटले. ‘आता कशाला नवीन शिकायचं?’ असं लोकांना वाटू लागलं. यामुळेच, QWERTY हाच सर्वात जास्त वापरला जाणारा लेआउट राहिला आणि आजही हाच कीबोर्ड जगभरात वापरला जातोय.