शिक्षणाचा लातूर पॅटर्न !

Latur Pattern : लातूर पॅटर्नअंतर्गत लातूरमध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवलं जातं, नेमकं हे लातूर पॅटर्न आहे तरी काय याविषयी श्रेष्ठ महाराष्ट्राने लातूरमधले प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक सचिन बांगड यांच्याशी चर्चा केली. जाणून घेऊयात नेमका हा लातूर पॅटर्न आहे तरी काय?
[gspeech type=button]

महाराष्ट्रात गेले 15-20 वर्ष लातूर पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. लातूर मध्ये दहावी – बारावीचा निकाल साधारण दोन हजार सालापासून 100 टक्के लागतो. 12 वी नंतर इंजिनियरिंग, डॉक्टर किंवा आयआयटीमध्ये शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सीईटी (CET) , एनईईटी (NEET), जेइइ (JEE) या परिक्षांमध्येसुद्धा लातूर पॅटर्न अंतर्गत शिकलेल्या विद्यार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण असतं. यामुळे लातूर पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली. नीट 2024 च्या परिक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. यामध्ये लातूर इथल्या केंद्राचाही सहभाग असल्याच्या बातम्या होत्या. मात्र, संपूर्ण चौकशी झाल्यावर लातूरमधल्या परिक्षा केंद्रांवर कोणताही गोंधळ झाला नसल्याचं स्पष्ट झालं. या नीट 2024 परिक्षेत राज्यात लातूरमधल्या विद्यार्थ्यांचं स्थान अव्वल होतं. त्यामुळे नेमकं लातूरमध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवलं जातं, नेमकं हे लातूर पॅटर्न आहे तरी काय याविषयी श्रेष्ठ महाराष्ट्राने लातूरमधले प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक सचिन बांगड यांच्याशी चर्चा केली. 

लातूर पॅटर्न

लातूर पॅटर्न हा कोणताही वेगळा बोर्ड नाही की या पॅटर्न अंतर्गत कोणता वेगळा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना शिकवला जात नाही. 

लातूर पॅटर्नमध्ये 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेत आणि स्पर्धात्मक परिक्षेमध्ये अव्वल येणारे विद्यार्थी हे एसएसई बोर्डातून आणि तेही मराठी माध्यमामधून शिकलेले विद्यार्थी असतात. लातूरमधल्या देशी केंद्र विद्यालय आणि केशवराज विद्यालयाने आपल्या 100 टक्के निकालामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सातत्य ठेवलं आहे. या शाळेतल्या विद्यार्थांना पुढे लातूरमधल्या प्रसिद्ध राजर्षी शाहू महाराज किंवा दयानंद अशा प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. पुढे या महाविद्यालयामधले विद्यार्थी हे बारावीच्या आणि त्यानंतर होणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उच्चशिक्षण घेतात. 

 स्पर्धात्मक परिक्षासाठी इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांची तयारी

महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, स्पर्धात्मक परिक्षा ही एक साखळी आहे. आणि याचं मूळ आहे ते आपल्या पाल्याने भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं याच्या स्पष्टतेमध्ये. आपला असा समज आहे की, स्पर्धात्मक परिक्षा द्यायच्या असतील तर मुलांना सीबीएसई शाळेत पाठवणं गरजेचं आहे. का तर त्याचा अभ्यासक्रम हा या परिक्षांना पूरक असा तयार करण्यात आलेला आहे. मग हाच अभ्यासक्रम एसएससी बोर्डातील विद्यार्थ्यांना शिकवला तर. होय. लातूरमध्ये हेच केलं जातं. 

लातूरमध्ये इयत्ता सहावीपासूनच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पुढे जाऊन स्पर्धात्मक परिक्षा द्यायच्या आहेत अशा मुलांचा फाऊंडेशन कोर्स घेतला जातो. या कोर्समध्ये विज्ञान आणि गणित विषयाचा पाया मजबूत केला जातो. या फाऊंडेशन कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये एसएससी, सीबीएसई आणि आयजी या तिन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करुन एक संयुक्त असा विशेष अभ्यासक्रम विकसीत केला आहे. स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांची विज्ञान आणि गणित विषयाची तयारी ही शाळेपासूनच करुन घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी जरी एसएससी बोर्डाचा असला तरी स्पर्धात्मक परिक्षेची पुढची तयारी करायला त्याला कोणती अडचण येत नाही. 

हे ही वाचा : अंडरग्रॅज्युएशनसाठी परदेशी जायचा ट्रेंड

इंटिग्रेटेड नाही तर कॉलेजमध्येच स्पर्धात्मक परिक्षांची तयारी

स्पर्धात्मक परिक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लातूर अव्वल स्थानी आहे. यामागे इयत्ता सहावीपासूनच विद्यार्थ्यांची यासाठी तयारी करुन घेणं हे तंत्र उपयोगी पडते. याशिवाय लातूरमधले राजर्षी शाहू महाराज आणि दयानंद या दोन महाविद्यालयांचं सुद्धा भरीव योगदान आहे. 

अलिकडे आपण इंटिग्रेटेड कॉलेज अशी एक टर्म ऐकतो. इंटिग्रेटेड कॉलेज याचा अर्थ दहावी झाल्यावर स्पर्धात्मक परिक्षा द्यायची असेल तर, त्यासाठी उत्तम क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायचा आणि याच क्लासेसचा टाय-अप असलेल्या कॉलेजमध्ये अकरावी – बारावीसाठी प्रवेश घ्यायचा. म्हणजे विद्यार्थ्यांनी या क्लासेसला उपस्थिती लावून पूर्णवेळ स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करायची. या क्लासेसमधली उपस्थिती हीच कॉलेजमधली उपस्थिती म्हणून ग्राह्य धरली जाते. कॉलेजमध्ये फक्त प्रॅकटिकल्ससाठी जायचं, अशी ही इंटिग्रेटेड कॉलेजची व्यवस्था आहे. 

मात्र, लातूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज आणि दयानंद या दोन महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो, तिथल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिक्षासाठी बाहेर अन्य शिकवण्या, क्लासेस लावावे लागत नाहीत. या विद्यार्थ्यांच्या बोर्डाची परिक्षा आणि स्पर्धात्मक परिक्षांची तयारी ही कॉलेजमध्येच पूर्ण करुन घेतली जाते. त्यामुळे या महाविद्यालयातले विद्यार्थी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत आणि स्पर्धात्मक परिक्षांमध्येही आपला ठसा उमटवितात. 

फक्त डॉक्टर, इंजिनीयरच.. सरकारी अधिकारी नाही 

लातूर पॅटर्नअंतर्गत विद्यार्थी सहावीला असल्यापासून त्यांची स्पर्धात्मक त्यातही विशेष करुन वैद्यकीय, इंजिनीयरींग आणि आयआयटीची तयारी करुन घेतली जाते. यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी या परिक्षांची विशेष तयारी केली जात नाही. तत्सम क्लासेस वा इन्सिट्यूशन्सही लातूरमध्ये फारसे नाहीत.  मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी हे पुण्यात एमपीएससी आणि यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे मग मराठवाड्यातलं सरकारी सेवा परिक्षाचं केंद्र म्हणून लातूरमध्ये का भर दिला जात नाही? तर सध्यातरी लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय, इंजिनीयरींग आणि आयआयटी या क्षेत्राकडे आहे. पण, एमपीएससी आणि यूपीएससीमधल्या विविध जागांची पोस्ट निघाली की, त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये लातूरमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून येतं. या स्पर्धात्मक परिक्षांमध्ये सुद्धा ते मागे पडत नाहीत. कारण, सहावीपासून घेतल्या जाणाऱ्या फाऊंडेशन कोर्समुळे एमपीएससी आणि यूपीएससी परिक्षेमधले तार्किक आणि गणित, विज्ञान या विषयांची तयारी करणं मुलांना सोपं जातं. त्यांना शिस्तबध्द पद्धतीने अभ्यास करण्याची, विषय व त्यातील संकल्पना समजावून घेण्याची शिस्त लागलेली असते.  त्यामुळे जरी सीईटी, नीट आणि जेईई या परिक्षांवर लक्ष केंद्रित असलं तरी, या अभ्यासाचा उपयोग विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससीसाठी सुद्धा होतो. 

हे ही वाचा : परदेशी शिक्षणासाठी आवश्यक पूर्वपरीक्षा

लातूर पॅटर्न पद्धतीने राज्यात शिक्षणप्रणाली का नाही?

लातूर पॅटर्न म्हणजे काही वेगळं शिकवलं जात नाही तर तेच शिक्षण, अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने आणि शाळेपासूनचं शिकवला जातो. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे जास्त मेहनत घेताना दिसून येतं. त्यामुळे राज्यभरातल्या एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये  अशा पद्धतीने शिकवणं शक्य होऊ शकते. सचिन बांगडे सांगतात की, ही पद्धत आपण राज्यभरात अंमलात आणू शकतो. एसएससी बोर्डातील शाळेतील विद्यार्थ्यांना सहावीपासूनचं गणित आणि विज्ञान या विषयातील ज्या संकल्पना आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत अशा गोष्टी शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली पाहिजे. 

जर लातूरमधल्या एखाद्या कॉलेजला आपल्याला अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करुन घेता येत असेल तर राज्यातल्या इतर सरकारी अनुदान मिळणाऱ्या महाविद्यालयांना हे कसं शक्य होऊ शकतं? यासाठी राजर्षी शाहू महाराज या महाविद्यालयातील शिक्षकांकडून अधिकतर माहिती घेणं, प्रशिक्षण आयोजन करणं, या महाविद्यालयात परिक्षेचे पेपर कसे तयार केले जातात या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यानुसार आपापल्या महाविद्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. 

शिक्षणाची भाषा 

जेव्हा आपण शिक्षण म्हणतो तेव्हा शिक्षण म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला ठोस सांगता येत नाही. ‘शाळेत जायचं वय झालं की शाळेत प्रवेश घ्या आणि जो अभ्यासक्रम आहे तो शिकायला सुरुवात करा’ अशी एक मशिनसारखी पद्धत रुढ झाली आहे. मुळात शिकणं म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती समजून घेणं. एखादी गोष्ट समजून घेणं, त्याचं आकलन होणं गरजेचं असतं. यामध्ये आपली भाषा हा महत्त्वाचा घटक आहे. जर आपण लहानपणापासून मराठी भाषा शिकलो, बोललो आणि अचानक इंग्रजी भाषेत शिकू लागलो तर गोष्टी समजून घेण्यात, त्याचं आकलन होण्यात अडचण येते. त्यामुळे मातृभाषेतून शिकण्याला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. कारण, अनेक इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मुलांना पूर्ण इंग्रजी भाषेतून शिकवण्याऐवजी मराठी किंवा हिंदी भाषेतून गोष्टी समजावून दिल्या जातात. अशात होतं काय, मुलगा संकल्पना हिंदी किंवा मराठी भाषेतून शिकतात. घरी दररोज व्यवहाराची भाषा म्हणून हिंदी किंवा मराठी भाषा बोलतात आणि परिक्षा मात्र इंग्रजी भाषेत देतात. त्यामुळे त्यांना जरी ज्ञान असले तरी ते नेमकं परिक्षेत उतरवण्यात अडचणी येतात. त्यामुळे जर मूल इंग्रजी भाषेत शिकत असेल तर, आई-वडिलांनाही ती भाषा अवगत असणं आणि त्या भाषेत संवाद होणं गरजेचं आहे. तरच मुलाला त्या भाषेत गोष्टी समजून त्याचं आकलन होऊ शकतं. अन्यथा मातृभाषेत शिकणं हे जास्त उपयुक्त आहे. कारण मुळात भाषा ही शिकण्यासाठी असते, ती शिकण्याचा मार्ग म्हणून स्वीकारणं अडचणीचं होऊ शकते. 

दरम्यान, आपल्या विद्यार्थ्यांला पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे याची मुलांशी चर्चा करुन, त्याच्या आवडी – निवडी पाहून शाळेपासूनच त्याविषयी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. कारण लातूर पॅटर्नची अंमलबजावणी राज्यभरात केली जाईल की नाही, याची कल्पना नाही. मात्र वैयक्तिक पातळीवर आपण आपल्या पाल्यांच्या बाबतीत मात्र नक्कीच सुरु करु शकतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ