गेल्या काही वर्षांत जगभरात होणाऱ्या संघर्षात अनेकदा आरोग्यसेवांवरही हल्ले केल्याचं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. काही वेळेला आरोग्य सुविधांमध्ये अडखळे निर्माण केले जातात. यामुळे रुग्णांना आरोग्यसुविधा मिळत नाहीत. पर्यायी रुग्णांना जीव गमवावा लागतो. या अशा घटना म्हणजे ठरवून केलेल्या ‘हत्या’च असतात. या हत्या आरोग्यसेवांवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या केलेल्या हल्ल्यांमुळे होत असतात. त्यामुळे या अशा घटनांकरता ‘हेल्थॉसाइड’ हा शब्द उदयाला आला आहे. जाणून घेऊयात या नवीन शब्दाचा प्रवास.
‘हेल्थॉसाइड’ म्हणजे काय?
बीएमजे ग्लोबल हेल्थ या जर्नलच्या 5 ऑगस्टच्या लेखामध्ये हेल्थॉसाइड (आरोग्यहत्या) आणि वैद्यकीय तटस्थता : कृती आणि चिंतनाचे आवाहन या विषयावर लेख प्रकाशित केला होता. अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बेरूतच्या संशोधकांनी ‘हेल्थॉसाइड’ हा एक नवीन शब्द वापरला आहे. आरोग्यव्यवस्थांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांसाठी संशोधकांनी ‘हेल्थॉसाइड’ हा शब्द वापरला आहे.
‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला जातो. हॉस्पिटल्सवर बॉम्बहल्ले केले जातात. रुग्णवाहिकांना रस्त्यामध्ये अडवलं जातं. आरोग्य सुविधांच्या पुरवठा साखळीमध्ये अडचणी निर्माण करुन त्या रोखल्या जातात, अशा अनेक प्रकारच्या कृत्यांनी आरोग्य सेवेवर हल्ला केला जातो. आणि हे हल्ले नियोजनपूर्वक केले जातात. युनिव्हर्सिटी ऑफ बेरूतच्या संशोधकांच्या मते ही कृत्ये हिंसक आहेत. त्यामुळे अशा कृत्यांविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना कायद्याचं संरक्षण मिळणं गरजेचं आहे.
आरोग्यदूतांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन
आरोग्यसेवांवरील हल्ल्यावर बऱ्याचदा उघडपणे बोलले जात नाही. एखाद्या रुग्णांच्या कुटुंबियांकडून, जमावाकडून रागाच्या भरात हॉस्पिटलवर छोट्या क्लिनिकवर हल्ला केला तर त्याची दखल घेतली जाते. पण जेव्हा व्यापक संघर्षाच्या ठिकाणी हॉस्पिटल्सवर बॉम्बहल्ले करणे, आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्थांवर हल्ला करणे, त्यांच्यावर कार्य थांबविण्यासाठी दबाव आणणे, डॉक्टर्स, नर्सेस यांच्यावर हल्ला करणे, अन्य आरोग्यसुविधा क्षेत्रातील दूतांवरील हल्ले, आरोग्य सुविधाच्या पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण करणे, रस्त्यावरील ट्रॅफिक वा कामांमुळे रुग्णवाहिका अडकवून ठेवणे अशा सगळ्या घटनांचाही या हेल्थॉसाइडमध्ये समावेश होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा घटनांची दखल घेऊन त्या नोंदवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा घटना घडल्यावर डॉक्टरांनी आरोग्य सेवेशी संबंधित स्वयंसेवकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असं आवाहन संशोधकांनी केलं आहे. असा घटनांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा लागू करावा यासाठी सगळ्याच देशांतून आपापल्या सरकारांवर दबाव आणला पाहिजे. तसेच कळत-नकळत सेवा करताना आपल्या हातून असे गुन्हे घडणार नाहीत याचीही काळजी घेतली पाहिजे असं आवाहन संशोधकांनी डॉक्टर आणि नर्सेसना केलं आहे.
‘हेल्थॉसाइड’ सारख्या घडलेल्या घटना
मध्य पूर्वेत गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरूच आहे. याठिकाणी अनेकदा संघर्षामुळे आरोग्यसुविधा यंत्रणा विस्कळीत होते. संशोधकांनी त्यांच्या लेखात इस्त्रायलकडून लेबनॉनवर केले जाणारे हल्ले, त्यामुळे आरोग्य सेवेची झालेली वाताहात, सामान्य लोक कशाप्रकारे उपचारापासून वंचित राहतात अशी सगळी परिस्थिती आकडेवारीसह स्पष्ट केली आहे. लेबनॉन मध्ये सध्या 60 लाख लोकं राहतात. यापैकी 10 लाख सिरीयन आणि 50 लाख पॅलेस्टाईन निर्वासित आहेत. 8 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2024 याकाळात इस्त्रायलने लेबनॉन संघर्ष सुरू होता. यामध्ये सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणं गरजेचं होतं. तिथल्या स्थानिक डॉक्टरांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. मात्र, ते डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षक सांगतात की, परिस्थिती इतकी चिघळली होती, आरोग्य सेवाही विस्कळीत झाली होती. त्यामुळं इच्छा असूनही जखमींना मदत करणं खूप कठीण जात होतं.
निरनिराळ्या युद्धात आरोग्यसंस्थांची अपिरीमित हानी
2006 सालच्या लेबनॉन युद्धात 78 आरोग्यसंस्था जवळपास नामशेष केल्या होत्या. 2 हॉस्पिटल नष्ट केले. लेबनॉन आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर 2023, आणि 27 जानेवारी 2025 मध्ये 217 आरोग्यसुविधा पुरविणाऱ्या लोकांची हत्या केली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या जनरल डायरेक्टर्सचाही समावेश आहे. तसेच 177 रुग्णवाहिकांचं नुकसान केलं आहे. तर 68 हॉस्पिटलवर छोटे- मोठे हल्ले करुन नुकसान पोहोचवलं आहे. तर 237 मेडिक्लसवर हल्ले केले आहेत. अशा या युद्ध स्थितीत 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजारहून जास्त जखमी, कोट्यवधी लोकांना निर्वासित म्हणून स्थलांतर करावं लागलं तर अनेकजण मानसिक रुग्ण झाले आहेत.
इस्त्रायल – हमास संघर्षाचा आरोग्यसेवेवर परिणाम
7 ऑक्टोबर 2023 साली हमास आणि इस्त्रायल संघर्षादरम्यान गाझा पट्टीवरील आरोग्यसंस्थांवर खूप परिणाम झाले. या संघर्षात गाझा इथले 986 आरोग्यसेवकांना मारलं गेलं. यामध्ये 165 डॉक्टर्स, 260 नर्सेस आणि 184 आरोग्य सहकारी, 70 औषध विक्रिते (फार्मासिस्ट), 300 आरोग्य व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी, 85 नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रसंघाने आरोग्यसंस्थेवर केलेल्या या हल्ल्याचा कठोर भाषेत निषेध केला होता. जवळपास 300 आरोग्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना अमानवी वागणूक देत छळ केल्याचंही समोर आलं आहे.
मध्य पूर्वेतल्या या संघर्षमय परिस्थितीत अशा अनेक घटना रोज घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध लागावा म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ बेरूतच्या संशोधकांनी ‘हेल्थॉसाइड’ हा शब्द निर्माण करुन यासाठी योग्य तो कायदा असावा, अशी मागणी केली आहे.