आपत्ती या विषयाचे दोन भाग पडतात. एक मानवनिर्मिती तर दुसरा निसर्ग निर्मित. ‘ॲक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी. देवाच्या इच्छेने घडलेली घटना असा होतो. निसर्ग निर्मित ज्या घटना, संकट येतात त्यांना या संज्ञे अंतर्गत ग्राह्य धरलं जातं. पावसाळ्यात ढगफुटी होणं, पूर येणं, भूस्खलन होणं, भूकंप, ओला किंवा सुका दुष्काळ अशा अनेक घटनांचा यात समावेश आहे.
ज्या घटना मानवाच्या हातात नाही, खूप मोठ्या प्रमाणावर एखादं संकट येतं, जे संकट जाण्यासाठी काही वेळच जाऊ द्यावा लागतो अशा कल्पनेपलीकडच्या घटनांना आणि ज्याच्यासाठी कोणालाच जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, अशा घटनांना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ म्हणजे ‘देवाची करणी’ असं म्हटलं जातं.
ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे नेमकं काय?
ही संकल्पना मूळ स्वरुपात विम्यासंदर्भात आणि कायदेशीर बाबींमध्ये वापरली जाते. एखादी घटना घडल्यावर कोणालाच जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. जी घटना निसर्गामुळे होते, त्याला कोणीच काही करु शकत नाही हे सांगण्यासाठी विमा कंपन्या आणि कायद्यामध्ये ही संज्ञा वापरली जाते.
भारतात याचा उल्लेख कधी केलेला?
27 ऑगस्ट 2020 रोजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषद झाली होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे साऱ्या जगाच्याच अर्थव्यवस्थेची गती मंदावली होती. त्यामुळे आपल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा निश्चितच परिणाम झाला होता. त्यामुळे जीएसटी कर संकलनानंतर केंद्राकडून राज्यांना दिला जाणारा निधी त्यावेळी देणं शक्य नव्हतं.
केंद्राकडून राज्यांना नुकसानभरपाई देता येणार नाही हे सांगताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असा उल्लेख केला होता. या संपूर्ण घटनेनंतर ‘ॲक्ट ऑफ गॉड’ म्हणजे नेमकं काय हे मोठ्या प्रमाणावर गुगलवर सर्च केलं जाऊ लागलं.
निर्मला सीतारमण यांनी या संज्ञेचा उल्लेख केल्यावर विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारवर खूप टीका केली होती. त्यावेळेला, अर्थव्यवस्था बुडीत काढणे, अरुणाचल सीमेजवळ चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करणे अशा काही घटनाही ‘देवाची करणी होती का?’ असे प्रश्न त्यावेळेला उपस्थित केले गेले होते.
मात्र, मुळात ही संज्ञा आधी सांगितल्यानुसार विमा कंपन्यांकडून प्रामुख्यांना वापरली जाते. गाडी, घर अशा काही स्थावर मालमत्तेचा विमा काढला जातो त्यावेळेला त्यामध्ये या ‘ॲक्ट ऑफ गॉड’ अंतर्गतही संरक्षण दिलं जातं. त्यामुळे अशा कोणत्या घटनेत सरंक्षण मिळतं कोणत्या घटनेत मिळत नाही ते जाणून घेऊयात.
हे ही वाचा : वृद्धांना आरोग्यविम्याचा आधार
विमा कंपन्यांच्या ॲक्ट ऑफ गॉड अंतर्गत कोणत्या गोष्टी येतात
ॲक्ट ऑफ गॉड कव्हरेज विमाधारकांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देते. या कव्हरेजमुळे, विमाधारक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवू शकतात आणि मालमत्तेची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करू शकतात. यासाठी पॉलिसीधारकांनी त्यांच्या गरजेनुसार आणि जोखमीनुसार योग्य कव्हरेज निवडणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्ती :
- भूकंप: जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर हादरे येतात, ज्यामुळे इमारती, रस्ते आणि इतर रचनांचे नुकसान होते.
- पूर: जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर पसरते, ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान होते आणि जनजीवन विस्कळीत होते.
- वादळ: जोरदार वाऱ्यांमुळे होणारे नुकसान, जसे की झाडे पडणे, घरांचे छत उडणे, आणि इतर संरचनांचे नुकसान.
- त्सुनामी: समुद्रातील लाटांमुळे येणारे मोठे पूर, ज्यामुळे किनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस होतो.
- उल्कावर्षाव: अंतराळातून येणारे खडक किंवा उल्का पृथ्वीवर पडल्यास होणारे नुकसान.
- अतिवृष्टी: मुसळधार पावसामुळे येणारे पूर आणि इतर नुकसान.
विमा कंपन्यांकडून ॲक्ट ऑफ गॉड मध्ये कोणत्या घटनांना संरक्षण दिलं जात नाही
मानवनिर्मित आपत्ती :
युद्ध, दंगल, दहशतवादी हल्ले आणि इतर मानवी कृतींमुळे होणारे नुकसान.
निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान:
विमाधारकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान विमा कंपन्यांकडून भरुन दिलं जात नाही.