केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने गुरुवार, दिनांक 15 मे 2025 रोजी एप्रिल 2025 महिन्यातला मासिक बेरोजगारीदरा संदर्भात माहिती प्रसिद्ध केली. भारतात यापूर्वी तिमाही किंवा वार्षिक बेरोजगारी दर जाहीर केला जायचा. मात्र यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्याचा बेरोजगारी दर केंद्र सरकारने स्वतंत्ररीत्या जाहीर केला आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने पहिल्यांदा नोकरी संदर्भात सर्व्हेक्षण केलं या सर्व्हेक्षणामध्ये एप्रिल 2025 महिन्यात बेरोजगारी दर 5.1 टक्के असल्याचं समोर आलं आहे. देशात विविध क्षेत्रातील आणि घटकातील बेरोजगारीचं प्रमाण जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून हा आढावा घेतला जातो. यापूर्वी तिमाही आणि वार्षिक सर्व्हेक्षण केलं जायचं. मात्र आता दर महिन्याला हे सर्व्हेक्षण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या सर्व्हेक्षणाला पिरीयड लेबर फोर्स सर्व्हे ( PLFS) असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत दर महिन्याला बेरोजगारी संदर्भात माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जाणून घेऊयात हा मासिक बेरोजगार सर्व्हेक्षण कसं केलं जाणार आहे? आणि बेरोजगारीचा दर आता किती आहे?
मासिक बेरोजगार सर्व्हेक्षण
मासिक बेरोजगार सर्व्हेक्षणामध्ये चालू आठवड्यातला सात दिवसातल्या माहितीचा संदर्भ घेऊन त्यानुसार अहवाल तयार करते. यानुसार एप्रिल 2025 मध्ये देशात बेरोजगारीचा दर 5.1 टक्के असल्याचं समोर आलं. यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या बेरोजगारीचं प्रमाण टक्क्याभराने जास्त असल्याचं आढळलं आहे. पुरुषांचं बेरोजगार प्रमाण 5.2 टक्के आहे तर स्त्रियांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण 5 टक्के आहे.
मासिक बेरोजगार दर
एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त बेरोजगारीचं प्रमाण तरुणांमध्ये आहे. वयवर्ष 18 ते 29 या वयोगटामध्ये 13.8 टक्के तरुण बेरोजगार आहेत. पण त्यातही तरुण मुलांपेक्षा मुलींवर मात्र कामाच्या जबाबदारीचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं. तसंच शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे. शहरात 17.2 टक्के बेरोजगारी आहे तर ग्रामीण भागात 12.3 टक्के बेरोजगारी असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
देशभरात शहरी भागामध्ये 23.7 टक्के महिला बेरोजगार आहेत तर 14.4 टक्के पुरुष बेरोजगार आहेत. त्याउलट ग्रामीण भागामध्ये 10.7 टक्के महिला आणि 15 टक्के पुरुष बेरोजगार आहेत.
हे ही वाचा : एआयमुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येणार हे वास्तव!
श्रमशक्ती सहभागाचं प्रमाण
एप्रिल 2025 मध्ये वयोवर्ष 15 आणि त्यावरील वयातील व्यक्तींचा श्रमशक्ती – कामगार वर्गामध्ये 55.6 टक्के सहभाग होता. श्रमशक्तीमध्ये सहभाग म्हणजे किती लोकांनी या महिन्यात मोबदल्याच्या बदल्यात कामं केलं किंवा कामाला सुरुवात केली. यामध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागातल्या नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. शहरी भागात हे प्रमाण 50.7 टक्के तर ग्रामीण भागात हे प्रमाण 58 टक्के आहे.
केंद्रीय मंत्रायल देशातले बेरोजगारी आणि दरमहिन्याला किती स्त्री – पुरूष नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश करतात, याविषयीची माहिती आता मासिक स्वरुपात सादर करणार आहे. तसंच या सर्व्हेक्षणामध्ये ग्रामीण भागातल्या नमुन्याची संख्याही 250 टक्क्यांने वाढवली असून ग्रामीण भागातल्या रोजगार क्षेत्रावरही भर दिला जाणार आहे. यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातल्या रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भात सर्वसमावेशक अहवाल हा ऑगस्ट महिन्यामध्ये सादर करणार असल्याची माहिती या सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.