गुगलने 2021 ते 2024 या कालावधीत भूकंप ओळखण्यासाठी दोन अब्जाहून अधिक मोबाईल फोनमधल्या मोशन सेन्सर्सचा वापर केला. या आणि 98 देशांमधील लाखो लोकांना या भूकंपासंदर्भात पूर्वसूचनाही दिल्या. सायन्स जर्नलच्या विश्लेषणातून हे समोर आलं आहे.
या विश्लेषणातून असं आढळून आलं की, गुगलच्या सिस्टमने गेल्या चार वर्षात 11 हजार हून जास्त भूकंपांची नोंद केली. ही नोंद पारंपारिक भूकंपमापकांच्या नोंदीशी जुळत आहे. भूकंप संशोधकांनी गुगलच्या या प्रणालीचं कौतुक केलं आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांनी या सिस्टीमवर अवलंबून राहण्याआधी या तंत्रज्ञानामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.
2020 मध्ये, गुगलने अँड्रॉइड फोन वापरून भूकंपाचे धक्के ओळखण्यासाठी क्राउड-सोर्स्ड सिस्टम लाँच केली. यासंदर्भात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून त्याची उपयुक्तता आणि प्रभावीपणा दिसून आला आहे.
दरवर्षी सरासरी हजारो लोकं भूकंपात मृत्यूमुखी पडतात. पण 2019 पासून गुगलच्या मोबाईल-आधारित अलर्ट्सच्या व्यवस्थेमुळे भूकंपग्रस्त भागातील लोकं लवकर सावध होऊन सुरक्षित जागी स्थलांतर करतात. त्यामुळे जीवितहानी कमी होत आहे. असा दावा गुगलने केला आहे.
“गुगलचं हे तंत्रज्ञान खूप प्रभावी आहे. बहुतेक देशांमध्ये भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली नाही. मात्र, गुगलच्या या तंत्रामुळे ही सेवा सर्वांना मिळत आहे.,” अशी प्रतिक्रिया कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भूकंपशास्त्रज्ञ अॅलन हस्कर यांनी व्यक्त केली आहे .
गुगलची भूकंप सूचना प्रणाली कशी काम करते?
अँड्रॉइड भूकंप अलर्ट सिस्टम अचूकतेपेक्षा स्केलला प्राधान्य देते. जगभरात मोठ्या प्रमाणावर अँड्रॉइड स्मार्टफोन्सचा वापर केला जातो. याचा फायदा गुगल घेतं. गुगलचे मोशन सेन्सॉर अँड्रॉइड स्मार्टफोनच्या मदतीने मोशन डेटा गोळा करतात.
गुगलचे अल्गोरिदम सिग्नलचे विश्लेषण करतात. प्रादेशिक भूगर्भीय आणि बांधकामातील फरक तसेच फोन मोशन सेन्सर्समधील फरक लक्षात घेतात. त्यानुसार, भूकंपाचे अलर्ट देतात. तरी, या सिस्टीमच्या माध्यमातून मोठे भूकंप शोधण्याचे आव्हान कायम आहेच.
हेही वाचा : गुगलने लाँच केली ‘क्वांटम विलो चिप’
सिस्टमचं प्रभावी आकलन
2023 साली तुर्कीमध्ये दोन मोठे भूकंम झाले. या सिस्टमवर या भूकंपाविषयी 4.5 दशलक्ष सावधानतेचे इशारे आले होते. मात्र, विश्लेषकांनी जरा कानाडोळा केला. पण अल्गोरिदम अपग्रेड केल्यानंतर, पुनर्विश्लेषणातून असं दिसून आलं की, सिस्टमने दहा दशलक्ष फोनवर तातडीने “टेकअॅक्शन” अलर्ट पाठवले होते.
यावरून असं दिसून येतं की ते 2023 पासून ही प्रणाली सुधारण्यासाठी काम करत आहे. याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. असं मत वॉशिंग्टन विद्यापीठाचे भूकंपशास्त्रज्ञ हॅरोल्ड टोबिन यांनी व्यक्त केलं आहे.