सोशल मीडियावर लाखो चाहत्यांना खूश करण्यासाठी आणि कायम ग्लॅमरस लूकमध्ये राहण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्ती विशेषतः कलाकार चिरकाल तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये व्यायाम आणि आहाराची पथ्येही पाळली जातातच. पण याशिवाय अँटी एजिंग गोळ्या किंवा इंजेक्शन घेतली जातात. या सगळ्या सौंदर्य खुलवणाऱ्या अँटी-एजिंग आणि ओव्हर-द-काउंटर हर्बल सप्लिमेंट्सची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
भारतातली ही बाजारपेठ 2025 ते 2034 दरम्यान 12.10 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रसाधन क्षेत्रामध्ये ही औषधं वापरण्यासंदर्भात कोणतेच नियम नाहीत. अगदी 20 वयोवर्षाच्या तरुणांवरही या औषधांचे उपचार केले जातात.
मात्र, या अँटी एजिंग गोळ्या किंवा इंजेक्शन किती सुरक्षित आहेत याचा कधी विचार केला जातो का? समजून घेऊयात या अँटी एजिंग गोळ्या किंवा इंजेक्शन कशाप्रकारे तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठा धोका निर्माण करु शकतात.
बाजारपेठेतील उत्पादने समजून घेणे
अँटी एजिंग गोळ्यामध्ये सक्रिय घटक असतात. सुरक्षित औषधं म्हणून विकल्या जाणाऱ्या हर्बल सप्लिमेंट्समध्ये स्टिरॉइड्स असतात.
अनेकदा शारिरीकदृष्ट्या एकदम फीट दिसलो पाहिजे म्हणून ‘डाएट’, डिटॉक्स आणि विविध प्रकारच्या हर्बल गोळ्या खाल्ल्या जातात. चमकदार त्वचेसाठी विशेष पावडर, केसांच्या वाढीसाठी कॅप्सूल, वजन कमी करण्यासाठी गोळ्या, डिटॉक्ससाठी हर्बल टी आणि हार्मोन्स संतुलित करण्यासाठी गोळ्या अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत.
वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा उल्लेख करुन या गोळ्या बाजारात सहज विकल्या जातात. ही औषधं, उपचार घ्यावेत की नाही याविषयी डॉक्टरांसोबत कोणतीच चर्चा केली जात नाही. हे उपचार कधी, कशाप्रकारे आणि किती प्रमाणात घ्यावेत याची ही पुरेशी माहिती घेतली जात नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा अनेक विविध प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या घेतल्यानंतर शरीरात हार्मोनल संतुलन बिघडू शकतं. यकृत आणि मूत्रपिंडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. थोडक्यात या सगळ्याचे उलट परिणाम आरोग्यावर होतात.
सुरक्षितता
सौंदर्य जपण्यासाठी घेत असलेल्या औषधांमध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे विविध आजारावरील औषधं ही उपाशी पोटी न घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याप्रमाणे, ही औषधं ही उपाशीपोटी घेऊ नयेत, असं डॉक्टराचं मत आहे. ज्यावेळेला पूर्ण दिवसभर उपवास पाळला जातो त्यावेळी शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन बदलतं, शरीरातील पाण्याची आणि ग्लुकोज पातळी कमी-जास्त होते. या सगळ्या गोष्टींमुळे आपण घेत असलेल्या औषधांचं शोषण आणि पचन व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. त्यामुळे जर उपवास पाळून अशा अँटी-एजिंग वा तत्सम स्वरुपातली औषधांचं सेवन करायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असतं.
हेही वाचा: ग्लूटाथिओन इंजेक्शन्स म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहेत का?
माहितीची शहानिशा करणे
दरम्यान, सौंदर्य टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सगळ्या औषधांमुळे मृत्यू ओढावला जातो असं म्हणणं चुकीचं आहे, असं मत प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन विरल देसाई यांनी मांडलं आहे. ते म्हणतात की, “जगभरात हे सगळे उपचार केले जातात. बोटुलिनम टॉक्सिन (बोटॉक्स), डर्मल फिलर्स (जसे की हायलुरोनिक अॅसिड) आणि मेसोथेरपी सीरम्स सारखी अँटी-एजिंग इंजेक्शन्स ही वैद्यकीयदृष्ट्या मान्यताप्राप्त आहेत. त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जनच्या देखरेखीखाली जगभरात मोठ्या प्रमाणावर ही औषधं वापरली जातात. या सौंदर्यात्मक उपचार पद्धतीत कमीत कमी त्रास आहेत. योग्यरित्या त्या दिल्यास यात काहीच असुरक्षितता नाही. अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेतल्यामुळे कोणाचा लवकर मृत्यू झाला आहे असं दाखवून देणारा कोणताही थेट पुरावा नाही.” तरिही हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच घेतले गेले पाहिजेत.
नियमांची गरज
हर्बल सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्स क्षेत्रात सध्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नियमन करण्याची गरज आहे. यात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालणं, उत्पादनांच्या पॅकेजिंगवर किंवा जाहिरातींमध्ये निराधार दाव्यांना परवानगी न देणं, औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची त्यांच्या प्रमाणाची तपासणी करणं आणि सातत्याने या औषधांची गुणवत्ता तपासणं अत्यावश्यक आहे.