उन्हाळा म्हटलं की जसं आंब्याचा हंगाम असतो तसंच लिचीचाही हंगाम असतो. उन्हाळ्यात लिची खाण्याची मजा देखील काही वेगळीच असते. या दिवसांत बाजारात भरपूर लिची दिसते. पण आजकाल बाजारात दिसणाऱ्या सगळ्या लिची चांगल्याच असतात असं नाही. काही दुकानदार लिची जास्त लालभडक, फ्रेश दिसावी किंवा ती खराब होऊ नये म्हणून तिला बाहेरून रंग, केमिकल लावतात.
यामुळे लिची दिसायला चांगली फ्रेश वाटली तरी आपल्या आरोग्यासाठी मात्र धोका असू शकतो. म्हणून, आपण जी लिची खातोय ती नैसर्गिक पद्धतीने तयार आहे की तिच्यावर कृत्रिम गोष्टींचा वापर केला आहे, हे ओळखता येणं फार गरजेचं आहे. पण टेन्शन घेऊ नका. हे काम तुम्ही घरच्या घरीच खूप सोप्या पद्धतीने करू शकता. कसं ते पाहूया..
1. लिचीचा रंग बघा
नैसर्गिकरित्या तयार झालेल्या लिचीचा रंग कधीच पूर्णपणे लालभडक नसतो. तिच्या सालीवर तुम्हाला लाल, गुलाबी, हिरवा आणि थोडा तपकिरी असे एकत्र रंग दिसतील.
लिचीचा रंग थोडा मिक्स असतो, एकाच रंगाचा नसतो. जर तुमच्या लिचीचा रंग खूप जास्त चमकदार आणि पूर्ण लाल किंवा लिची खूपच चकाकत असेल, तर त्या लिचीवर नक्कीच बाहेरून रंग लावला असण्याची शक्यता जास्त आहे. दुकानदार गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी हे असं करतात.
2. लिचीची वरची साल खरखरीत असावी
दुसरा सोपा पर्याय म्हणजे लिचीला हात लावून बघा. चांगल्या, नैसर्गिक लिचीची साल थोडी खरखरीत असते. तिच्यावर बारीक बारीक बंप्स असतात आणि ती हाताला थोडी जाडसर लागते. पण, जर लिचीची साल तुम्हाला गुळगुळीत , मेणासारखी किंवा तेलकट वाटली तर समजून जा की लिची ताजी दिसावी म्हणून तिच्यावर मेण किंवा तेल लावलेलं आहे.
3. लिची पाण्यात टाकून बघा
आणखी एक सोपा उपाय म्हणजे पाणी. एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात काही लिची टाका. जर लिची नैसर्गिकरित्या पिकलेली असेल, तर ती एकतर पाण्यात बुडेल किंवा वर तरंगेल. पण पाण्याचा रंग अजिबात बदलणार नाही. पण जर पाणी लगेच लाल किंवा गुलाबी रंगाचं व्हायला लागलं किंवा लिची विचित्र पद्धतीने तरंगत असेल. तर याचा अर्थ तिच्यावर बाहेरून रंग किंवा केमिकल वापरले असण्याची शक्यता जास्त आहे.
4.केमिकलचा वास येतो का बघा
नैसर्गिक आणि ताज्या लिचीचा गोड, फळांसारखा छान सुगंध येतो. पण जर लिचीला उग्र, केमिकलसारखा वास येत असेल तर त्या लिचीवर नक्कीच केमिकल वापरलेलं आहे. बाहेरून केमिकल लावलेल्या लिचीला पेंटचा, रॉकेलचा किंवा कृत्रिम पदार्थांचा वास येऊ शकतो. हे पदार्थ आपल्या पोटात गेले तर आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात.
5.लिची कापून बघा
तुम्ही जर लिची कापून बघितली तर नैसर्गिकपणे पिकलेल्या लिचीच्या आतला गर पांढरा, थोडासा पारदर्शक , रसाळ असतो. पण जर आतला गर लालसर दिसत असेल किंवा तो कोरडा आणि रंग उडालेला दिसत असेल, तर त्या लिचीवर बाहेरून रंग किंवा इतर कृत्रिम पदार्थ वापरले असण्याची शक्यता आहे. तसेच, जी लिची कापल्यावर कडक किंवा रबरासारखी वाटेल ती अजिबात खाऊ नका.
6. कापूस किंवा टिशूचा वापर
एक ओला टिशू पेपर किंवा कापसाचा बोळा घ्या आणि लिचीच्या सालीवर हलक्या हाताने घासा. जर त्या टिशूवर किंवा कापसाच्या बोळ्यावर रंग लागला, तर याचा अर्थ लिचीला बाहेरून कृत्रिम रंग लावलेला आहे. ही खूप सोपी पद्धत आहे आणि यामुळे तुम्ही लिची खाण्यापूर्वी लगेच ओळखू शकता.
7. बिगर-हंगामी लिचीपासून दूर राहा
लिची नैसर्गिकरित्या फक्त उन्हाळ्यातच येते, म्हणजे भारतात साधारणपणे मे ते जुलै या महिन्यांत. जर तुम्हाला ऑफ-सिझनमध्ये लिची बाजारात दिसली, तर ती केमिकल लावून साठवलेली किंवा कृत्रिमरित्या पिकवल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, नेहमी हंगामात येणारी फळेच विकत घ्या.
कृत्रिम प्रकारे तयार केलेली लिची टाळण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे विश्वासू दुकानदार, स्थानिक शेतकऱ्यांच्या बाजारातून किंवा मान्यताप्राप्त ‘ऑरगॅनिक’ विक्रेत्यांकडूनच लिची खरेदी करा.