कॅन्सरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोठ्यांपासून लहान मुलांनाही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होत असल्याचं आढळून येत आहे. एकीकडे या आजारावरील उपचार पद्धतीवरही संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे कॅन्सरसारखा आजार का होतो? आणि यापासून संरक्षण करण्यासाठी काय काय काळजी लोकांनी घेतली पाहिजे, याविषयी जनजागृती केली जाते. याचाच एक भाग म्हणून आता प्लास्टिक आणि कागदी कपांवर राज्यातील काही जिल्ह्यात बंदी घातली जात आहे.
बुलढाणानंतर परभणी जिल्ह्याने प्लास्टिक, कागदी कपांवर घातली बंदी
प्लास्टिक किंवा कागदी कपांमध्ये चहा प्यायल्याने कॅन्सरचा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन्ही पद्धतीच्या कपांवर बंदी घालण्याचे आदेश परभणी जिल्हा कार्यालयातून दिनांक 30 डिसेंबर 2024 मध्ये दिले होते. त्यापूर्वी दिनांक 17 डिसेंबर 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये या दोन्ही पद्धतीच्या कपांवर बंदी घातली होती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये या कपांसह प्लास्टिक आणि कागदापासून बनवल्या जाणाऱ्या अन्य डिस्पोझेबल वस्तूंवरही बंदी घातली आहे. यामध्ये कागदी ताटं, स्ट्रॉ, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक काटे- चमचे, कागदी वाट्या आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तुंवरही बंदी घातली आहे.
प्लास्टिक इतकेच कागदी कप आणि प्लेट हानीकारक!
प्लास्टिकच्या वस्तुमध्ये गरम अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते हे एव्हाना आपल्या सगळ्यांनान माहीत आहे. त्यामुळे आपण प्लास्टिक पिशव्या, पॅकेजिंग किंवा प्लास्टिक कपांमधून चहा पिण्याचं टाळतो. या प्लास्टिक कपांना पर्याय म्हणून आपण पटकन कागदी कपांतून चहा मागतो. पण हे कागदी कपही प्लास्टिक कपांइतकेच हानीकारक आहेत. हे कागदी कप आणि प्लेटस् आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हानीकारक आहेत.
स्वीडनच्या गोटेन्बर्ग विद्यापीठातील प्राध्यापक बेथनी कार्नी अलमोथ्र यांनी याविषयी संशोधन पेपर प्रसिद्ध केला आहे.
डिस्पोझेबल कागदी वस्तूंवर प्लास्टिकचा थर
कागद हे फॅट आणि पाणी प्रतीरोधक नसतं. त्यामुळे अन्नपदार्थ खाण्यासाठी कागदापासून वस्तू बनवताना त्याला प्लास्टिकचा थर लावणं गरजेचं असतं. हा प्लास्टिकचा थर पॉलीलॅक्टाइड (पीएलए) पासून बनवलेला असतो. हा बायोप्लास्टिकचा एक प्रकार आहे. हे बायोप्लास्टिक मका, ऊस आणि कसावा यांच्या चोथ्यापासून तयार केलं जातंं.
कागदी कपांची मागणी पाहता या तीन पिकांपासून जीवाश्म इंधन निर्माण करण्याऐवजी 99 टक्के पॉलीलॅक्टाइड तयार केलं जात आहे. हे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल म्हणून गणलं जातं. बायोडिग्रेडेबल म्हणजे असा घटक जो नैसर्गिक वातावरणात जीवाणू किंवा बुरशीच्या प्रादुर्भावाने विघटीत होतो. मात्र तरिही, या प्लास्टिक घटकांच्या संपर्कात आलेलं गरम अन्न खाणं किंवा पेय पिणं हे शरीरासाठी विषारीच आहे, असं संशोधकांचं मत आहे. कारण, या पॉलीलॅक्टाइडमधलं मायक्रोप्लास्टिक हे या अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरिरात जातं. यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
कागदापासून तयार केलेल्या पॅकेजिंगचा धोका!
प्लास्टिकमध्ये आरोग्याला धोकादायक अशा घटकांचा समावेश असतो. याबाबत मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे प्लास्टिक पॅकेजिंगमधले अन्नपदार्थ न खाण्याविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण असेच काही विषारी घटक हे कागदापासून तयार केलेल्या पॅकेजिंगमध्येही असतात, याबद्दलची माहिती लोकांना नसते. त्यामुळे सर्रासपणे कागदी पॅकेजिंगचा वापर केला जातो. या पॅकेजिंगमधून हे विषारी घटक माणसांच्या आणि प्राण्यांच्या शरीरात जाऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात.
संशोधक बेथनी कार्नी अलमोथ्र यांच्या टीमने या कागदी पॅकेजिंगचा फुलपाखरांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. त्यांनी काही कप हे जेथे डास आणि फुलपाखरांच्या अळ्यांची पैदास होते अशा ओला गाळ असलेल्या खड्ड्यांमध्ये काही आठवड्यासाठी टाकून ठेवलेले. ठरावीक काळानंतर त्याचं परीक्षण केल्यावर लक्षात आलं की या कपमध्ये असलेल्या प्लास्टिक घटकाचा या डासांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम झाल्याचं आढळून आलेलं.
त्यामुळे या कागदी पॅकेजिंग वा कपमधून कोणतेही गरम अन्नपदार्थ खाण्याने शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण जाऊन आरोग्यावर परिणाम होतात. तर हे पॅकेजिंग वापरून झाल्यावर ते उघड्यावर तसेच फेकून दिले तर त्याचा प्राण्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे प्लास्टिक वा कागदी पॅकेजिंग वस्तू न वापरण्याचं आवाहन या संशोधकांकडून आणि आता विविध सरकारकडूनही केलं जात आहे.