प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्याची आणि तिच्या नावाचा प्रतिमांचा आणि एआय निर्मित प्रतिमांचा गैरवापर थांबण्याविषयी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीवेळी या खटल्यातील प्रतिवाद्यांविरोधात अंतरीम आदेश काढणार असल्याचं न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी सांगितलं.
अलीकडे एआय तंत्रज्ञानाच्या साहय्याने किंवा अन्य अॅपच्या मदतीने अनेकांचे फोटो व्हिडीओ एडीट करुन गैर कामासाठी वापरले जातात. तर काहीक वेळेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनच असे फोटो मिळवून त्याचा गैरवापर केला जातो. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याही फोटोंचा आणि नावाचाही अश्लील कामांसाठी गैरवापर केल्याचं उघड झालं. त्यामुळे ऐश्वर्या राय हिने तिच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्काचे रक्षण करण्या अंतर्गत हा खटला दाखल केला आहे. जाणून घेऊयात काय आहे हा प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क.
प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क म्हणजे काय?
प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव, चित्र, आवाजासारख्या ओळखपत्रांचा व्यावसायिक वापर नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. ज्यामुळे त्याचा गैरवापर टाळता येतो. हा अधिकार एखाद्या व्यक्तीला त्याच्या ओळखीच्या व्यावसायिक वापरावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतो आणि या हक्कामुळेच कोणीही व्यक्ती आपली प्रतिमा, नाव, स्वाक्षरी, आवाज आणि इतर ओळखण्यायोग्य गोष्टींचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देऊ शकते किंवा नाकारू शकते.
व्यक्तिमत्व हक्काअंतर्गत कोणत्या गोष्टी येतात?
व्यक्तिमत्व हक्कांमध्ये व्यक्तिचं नाव, फोटो, आवाज अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा समावेश असतो.
नाव आणि फोटो : एखाद्या व्यक्तीचे नाव, फोटो किंवा चित्राचा व्यावसायिक वापर नियंत्रित करण्याचा अधिकार.
आवाज : एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचा वापर जाहिरातींमध्ये किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी करण्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार.
स्वाक्षरी आणि समानता : एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी किंवा तत्सम अन्य वैयक्तिक चिन्हे यांचा वापर नियंत्रित करण्याचा अधिकार.
इतर ओळखपत्रांचे संरक्षण : व्यक्तीच्या ओळखीचे इतर बाबीं, जशा की विशिष्ट वस्तू किंवा गुणधर्म, ज्यांच्याद्वारे व्यक्तीची ओळख पटते, त्यांचं संरक्षण करण्याचा अधिकार.
हा हक्क का महत्त्वाचा असतो ?
गैरवापर रोखणे : या हक्कांमुळे व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांच्या नाव, चित्र किंवा आवाजाचा गैरवापर करणे टाळता येतो.
आर्थिक फायदा नियंत्रित करणे : व्यक्तीला त्याच्या ओळखीचा वापर करून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यावर नियंत्रण ठेवता येते.
प्रतिष्ठेचे संरक्षण : एखाद्या व्यक्तीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी हे अधिकार महत्त्वाचे आहेत.
व्यक्तिमत्व हक्क म्हणजेच सेलिब्रिटी हक्क आहे का?
व्यक्तिमत्त्वात एखाद्याची स्वाक्षरी, प्रतिमा, समानता, आवाज आणि स्वतःच्या ओळखीचे इतर गुण समाविष्ट असतात. व्यक्तिमत्त्व हक्क हे कोणत्याही सेलिब्रिटीचे मुख्य घटक असतात, कारण हे अधिकार मिळविण्यासाठी एखाद्याला सेलिब्रिटी असणे आवश्यक असते. म्हणूनच व्यक्तिमत्त्व हक्कांना कधीकधी सेलिब्रिटी हक्क असेही म्हणतात.
सेलिब्रिटींना या हक्काची गरज का भासते?
हे अधिकार सेलिब्रिटींसाठी महत्त्वाचे असतात. कारण त्यांच्या नावांचा फोटोंचा, चिंत्रांचा, आवाजाचा वेगवेगळ्या कंपन्यांकडून गैरवापर होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे प्रसिद्ध व्यक्ती/सेलिब्रिटींनी त्यांचे व्यक्तिमत्व हक्क जपण्यासाठी हा विशेष हक्क आहे. तरी या हक्काचा लाभ घेण्यासाठी त्यांना त्यांची नावनोंदणी करणं गरजेचं असते.
सेलिब्रिटी घडवण्यात अद्वितीय वैयक्तिक गुणांची मोठी यादी दिलेली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तिचं नाव, टोपणनाव, रंगमंचाचे नाव, चित्र, प्रतिमा आणि कोणतीही सहज ओळखता येईल वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा समावेश असतो.