थायलंडमधली खोन नृत्यनाट्यकला नेमकी कशी असते?

Khon Art : भारतात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये कथा सादर केली जाते. काहीसा अशाच प्रकारचा नृत्यप्रकार हा थायलंडमध्ये सादर केला जातो. रामकथेतली रामकियन ही कथा थायलंडमध्ये तिथल्या खोन या नृत्यनाट्यकलेमध्ये सादर केली जाते. जाणून घेऊयात ही नृत्यनाट्यकला नेमकी कशी असते?
[gspeech type=button]

भारतात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये कथा सादर केली जाते. काहीसा अशाच प्रकारचा नृत्यप्रकार हा थायलंडमध्ये सादर केला जातो. रामकथेतली रामकियन ही कथा थायलंडमध्ये तिथल्या ‘खोन’ या नृत्यनाट्यकलेमध्ये सादर केली जाते. जाणून घेऊयात ही नृत्यनाट्यकला नेमकी कशी असते?

खोन थायलंडमधली प्राचीन कला

खोन या कलेला थायलंडमध्ये अनन्य साधारण महत्त्व आणि प्रतिष्ठा आहे. इसवी सन 1350-1767 या काळात ही कला थायलंडमध्ये विकसीत झाली. भरतनाट्यम या नृत्यकलेप्रमाणे याही कलेत डौलदार हालचालीच्या साहय्याने कथा कथन केली जाते. यावेळी पारंपरिक विधी, संगीत, निवेदन आणि गीत याच्या मदतीने ही कला सादर केली जाते. यासाठी कथेतल्या पात्रानुसार वेगवेगळे मुखवटे, दागदागिणे आणि भरजरी कपडे परिधान केले जातात. 

खोन या शब्दाचा अर्थ काय आहे?

थायलंडमधील रामाकियान या महाकाव्यातील कथेच्या सादरीकरणासाठी खोन हा नाट्यप्रकार विकसीत झाला आहे. हे महाकाव्य रामायणावर आधारीत आहे. यामध्ये चेहऱ्यावर कथेतल्या पात्राप्रमाणे मुखवटे लावून नृत्यातून कथा सादर केली जाते. 

खोन हा शब्द पाली भाषेतल्या क्ल किंवा कोल या शब्दापासून तयार झालेला आहे. यामध्ये ढोलकीच्या वादनावर नृत्य सादर करतात. पूर्वीच्या कालखंडात हा खोन नाट्यनृत्यप्रकार हा धार्मिक विधीचा भाग होता. तेव्हा त्यातून विष्णूचा महिमा सादर करायचे. जेव्हा ही कला धार्मिक विधी म्हणून साजरी केली जायची तेव्हा तिथे सामान्य प्रेषकांना, लोकांना समावून घेतलं जायचं नाही. काही काळानंतर या कलेमध्ये राम सतुतीला महत्त्व प्राप्त झालं. 

या कथेत फ्रा म्हणजे (राजा/देव), नांग (स्त्रिया), याक (राक्षस) आणि लिंग (वानर) या पात्रांचा समावेश असतो. पूर्वीच्या काळात या नृत्यातील सगळे पात्र हुबेहुब वेशभूषा करून नाट्य सादर करायचे. पण अलीकडे केवळ राजा आणि स्त्रिया पात्रातील कलाकारच थाय संस्कृतीतील भित्तीचित्रांपासून प्रेरणा घेऊन विशेष असं रुप धारण करतात. तर राक्षस आणि वानर पात्रातील कलाकार हे पारंपरिक मुखवटे घालून कला सादर करतात. 

रामायणावर आधारीत अन्य कलाविष्कार

दक्षिण आशियातील देशांवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडू लागल्यावर  रामायणाची कथा त्या त्या ठिकाणच्या राजघराण्यांमध्ये लोकप्रिय झाली. दक्षिण आशियातल्या प्रत्येक देश आपल्या मूळ संस्कृतीनुसार ही रामायणाची कथा सादर करु लागले. त्यानुसार, थायलंडमध्ये भगवान रामाची कथा ही रामाकियान या नावाने ओळखली जाऊ लागली. ही कथा सादर करण्यासाठी खोन हा नाट्यनृत्यप्रकार उदयास आला. 

बर्माम इथे यामा झाटडॉ, कंबोडियामध्ये लखोन खोल आणि लाओसमध्ये ही रामायण कथा फ्रा लक फ्रा लाम या कलाविष्कारामध्ये सादर केली जाते. 

वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण

खोनच्या या कला सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैली आहेत. बदलत्या काळानुसार त्यात बदल घडत गेले आहेत. या समृद्ध परंपरेने शाही दरबारातील ‘खोन लुआंग’ पासून उघड्या मैदानावर सादर होणाऱ्या ‘खोन क्लांग प्लांग’, बांबूच्या बाकावर बसून सादर होणाऱ्या ‘खोन नांग राव’, पडद्यासमोर सादर होणाऱ्या ‘खोन ना जॉर’, लखोन नायवर आधारित ‘खोन रोँग नाय’ तसेच विशेष नेपथ्य आणि साहित्य वापरून सादर होणाऱ्या ‘खोन चक’ अशा विविध पद्धती आहेत. 

सामान्य लोकांद्वारे तयार झालेलं एक वेगळं रूप म्हणजे ‘खोन सोद’ यात कलाकार मुखवटा उचलून तात्काळ पद्यरचना सादर करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर खोनची परंपरा जवळपास लोप पावण्याच्या मार्गावर होती. मात्र, थायलंडची राणी माता सिरिकित यांच्या नेतृत्वाखाली ही कला  पुनर्जीवित झाली.

कला प्रशिक्षण

खोन या कलेच्या प्रशिक्षणाला बालवयातच सुरूवात केली जाते. या कलेतील नर्तकांना त्यांच्या शारीरिक रचना आणि हालचालींच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच विशिष्ट व्यक्तिरेखा दिली जाते. हे प्रशिक्षण लहान वयातच सुरू होते. कारण कलाकारांचं शरीर व्यायामपटूंसारखं तयार केलं जातं. चांगल्या हालचालींसाठी लवचिकता, ताकद आणि बारकावे लक्षात घेण्याची क्षमता आवश्यक असते. युद्धाच्या प्रसंगांमध्ये जेव्हा कलाकार एकमेकांवर चढून युद्धकौशल्य दाखवतात तेव्हा हालचाली अधिक अवघड आणि प्रभावी असतात. 

चुई चाय हा नृत्यप्रकार अत्यंत कुशल नर्तकांद्वारे सादर केला जातो. हा प्रकार सौंदर्य आणि नजाकतीचं प्रतीक मानला जातो. आजच्या खोन सादरीकरणांमध्ये जरी गाणं, निवेदन आणि संगीत यांचा समावेश अधिक प्रमाणात झालेला असला तरीही देहबोली हीच या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खोनच्या हालचाली वाचण्यात पारंगत प्रेक्षक फक्त नृत्य पाहून संवाद काय आहे हे समजू शकतात.

कला सादरीकरणाची सुरूवात कशी होते?

व्यासपीठावर ही कला सादर करताना सर्वप्रथम कलाकार खोन गुरूंना वंदन करतात. याची सुरूवात विशेष ‘होम रोँग’ नावाच्या संगीत प्रस्तावनेने होते.  यात ‘साथुकर्ण’ हे गीत सुरू असताना कलाकार, संगीतकार किंवा नर्तक  दीप आणि धूप अर्पण करून गुरूंना वंदन करतात. जर ते शक्य नसेल, तर डोक्याच्या वर हात जोडून वंदन करण्याची परंपरा आहे. खोन गुरूंमध्ये केवळ जिवंत किंवा मृत मानवी शिक्षकच नव्हे, तर भगवान शंकर, गणेश आणि विष्णू यांचाही समावेश होतो.

होम रोँग झाल्यानंतर ‘बर्क रोँग’ (बेर्ग रोँग) नावाचं पारंपरिक प्रारंभिक नृत्य सादर केलं जातं. या लोकप्रिय नृत्यात भगवान रामाचा सेनापती हनुमान  म्हणजे पांढरं वानर आणि निलाफट म्हणजे काळा वानर यांच्यातील लढाईचा छोटा भाग दाखवला जातो.

‘ख्रॉब ख्रू’ हा विधी खोन नर्तकांसाठी एक दीक्षाविधी आहे. या विधीत गुरू विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ऋषीचा मुखवटा, भैरव मुखवटा आणि सेर्ड (दक्षिण थायलंडचा पारंपरिक मुकुट) असे तीन मुखवटे ठेवतात. जेव्हा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात आणि पुढील टप्प्यावर जातात तेव्हा हा विधी पार पाडला जातो. 

‘वाई ख्रू’ हा खोनसाठी आणखी एक महत्त्वाचा विधी आहे. हा वार्षिक समारंभ गुरूंना वंदन करण्यासाठी आयोजित केला जातो. कलाकार यावेळी आपल्याकडून झालेल्या चुका क्षम्य कराव्यात अशी प्रार्थना करतात आणि आशीर्वाद मागतात. तर नवीन विद्यार्थी ‘राम थवाय मुए’ हे नृत्य सादर करून खोनच्या प्रशिक्षणाच्या प्रवासात प्रवेश करतात.

मुखवटे आणि पोशाख

या कला प्रकारामध्ये कलेतील पात्रांचे मुखवटे, रुप हे मुख्य आकर्षण असतं. या कथेत वापरण्यात येणाऱ्या मुखवट्यांना पवित्र स्थान असतं. धार्मिक विधींमध्ये हे मुखवटे वेदीवर ठेवले जातात आणि देवतांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांची पूजा केली जाते. कलाकारांनी त्यांना दिलेल्या मुखवट्यांना आदराचं स्थान देणं बंधनकारक असतं. कथेतल्या पात्रानुसार, त्याच्या शारिरीक रचना, प्रतिष्ठा आणि स्वभावानुसार मुखवट्यांच्या आकार, रंग आणि अन्य तपशीलामध्ये फरक असतो. 

संपूर्ण खोन नाट्यसमूहासाठी 100 पेक्षा अधिक राक्षसांचे मुखवटे आणि 40 पेक्षा अधिक वानरांचे मुखवटे असतात. हे मुखवटे पारंपरिक हस्तकलेतील अनेक कौशल्यांमध्ये प्रावीण्य असलेल्या विशेष प्रशिक्षित कारागिरांकडून तयार केले जातात. 

कलाकारांचे कपे ही पात्रानुसार नेमून दिलेल्या रंगातच तयार केले जातात. जसं की, भगवान राम आणि इंद्र (युद्धाचे देव) हिरवा रंग, ब्रह्मा (सृष्टीचे देव) पांढरा रंग आणि फ्रा लक (रामाचा भाऊ) पिवळा रंग परिधान करतात. पारंपरिक पोशाखांसाठी वापरलं जाणारं कापड हे चांदी आणि सोन्याच्या जरीसह तयार केलेलं खास रेशीम कापड असतं. 

खोनला वाद्यांची जोड

खोनचं हे संगीत पी फाट या वाद्य वृंदाद्वारे वाजवलं जातं. यामध्ये पाई नाय – छोटा ओबो, रणाद एक – मध्यम बाँसच्या पट्ट्यांचे झायलोफोन, रणाद थुम – जाड पट्ट्यांचा झायलोफोन, खोंग वोंग याय – गोल चौकटीत मोठ्या घंटा, खोंग वोंग लेक- लहान घंटा), क्लोंग थाड (मोठे ढोल), ता-पोन (दोन तोंडाचे साजेलेले ढोल), क्रॅप (लाकडी टाळ्या), आणि चिंग (लहान मंजीरी) यांचा समावेश असतो. युद्धाच्या दृश्यांमध्ये सैनिकांच्या पावलांचा आवाजासाठी क्रॉंग वापरले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रसंगानुसार इतर वाद्यही यात वापरली जातात.

खोनमधलं गायन

खोनमध्ये लखोन नाय या आणखी एका उच्च दर्जाच्या नाट्यकलेतलं गायन अंतर्भूत केलं आहे.  लखोन नायमध्ये निवेदनाऐवजी सुरेल गायनातून कथाकथन केलं जातं. खोनमधील गायन दोन गायक मंडळांद्वारे सादर केलं जातं.

पटकथा लिखान

रामाकियन महाकाव्य आणि रामायणावर आधारित इतर अनेक साहित्यकृती थायलंडमध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. मात्र, अयुथाया साम्राज्याच्या 1767 मधील पतनानंतर बहुतेक ग्रंथ नष्ट झाले.  त्यामुळे 1782 ते 1809 मध्ये राजा राम पहिले यांच्या कारकिर्दीत रामाकियनची पुन्हा रचना केली गेली.  त्यांनीच बँकॉकमधल्या वॉट फ्रा काओ (एमराल्ड बुद्ध मंदिर) इथल्या भित्तिचित्र दालनात रामाकियन चित्रांची मालिका रेखाटण्याचे आदेश दिले. ‘बोट लखोन रूएंग रामाकियन’ (रामाकियनसाठीची नाट्य पटकथा) ही राजा राम पहिले यांनी संकलित केलेली आवृत्ती आजवरची सर्वात सुसंगत मानली जाते. 

आजच्या खोन सादरीकरणांमध्ये मुख्यतः या ग्रंथावर आधारित मजकूर वापरला जातो. इतर प्रसिद्ध कवींनीही खोनसाठी पूरक पटकथा लिहिल्या आहेत. रामाकियनमधील अनेक प्रसंग हे भगवान रामाच्या शौर्यगाथेवर आधारित असतात. या सादरीकरणांचा उद्देश विष्णूच्या अवताराच्या स्तुतीचा असतो आणि म्हणूनच खोनमध्ये मुख्यत्वे चांगल्याने वाईटावर मात केल्याचे संदेश देणारे प्रसंग सादर केले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ