सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित मध्ये समावेश करावा, कारगिल आणि लेह या दोन जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावं आणि लडाखमधिल सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाव्या या प्रमुख मागण्यांसाठी गेले पाच वर्ष आंदोलन करत आहेत. अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून वांगचूक हे याच मुद्द्यांवरून उपोषण करत आहेत. या 15 दिवसात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र बुधवारी अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात चार जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी झाले आहेत.
नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी पडली आणि तिथल्या जेन- झी पिढीतले तरुण देशातली वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार हे मुद्दे घेत रस्त्यावर उतरली. त्यांनी पूर्ण सरकार उलथवून लावलं. लडाख मध्येही तशीच परिस्थिती निर्माण होत आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे. या एका पाठोपाठ घडणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख केंद्र सरकारनं ‘अरब स्प्रिंग आंदोलन’ असा केलेला आहे? जाणून घेऊयात हे ‘अरब स्प्रिंग स्टाईल आंदोलन’ काय आहे?
हुकूमशाही सरकार विरोधातला प्रक्षोभ
सन 2010 च्या दरम्यान अरब देशांमध्ये लोकशाही समर्थकांनी तिथल्या राजेशाही आणि हुकूमशाही सरकारविरोधात एका पाठोपाठ निदर्शनं, उठाव, आंदोलनं, बंड पुकारली. अरब प्रदेशातील विविध देशातील या सर्व आंदोलनाच्या मालिकेला ‘अरब स्प्रिंग’ असं नाव दिलं होतं. याची सुरूवात ट्युनिशियापासून झाली होती. ट्युनिशियानंतर लिबिया, इजिप्त, येमेन सीरिया आणि बहरीन या देशांमध्येही हुकूमशाही विरोधात लोकांनी उठाव केला. पुढे मोरोक्को, इराक, अल्जेरिया, लेबनॉन, जॉर्डन, कुवेत, ओमान आणि सुदानमध्येही निदर्शने झाली.
तर जिबूती, मॉरिटानिया, पॅलस्टाईन, सौदी अरेबिा आणि पश्चिम सहारा या देशांमध्ये कमी प्रमाणात लोकांनी सत्ताधारी विरोधात आवाड उठवला होता. या संपूर्ण अरब प्रांतामध्ये एकाच वेळी या घटना घडत होत्या. त्यामुळे लिबिया, इजिप्त, येमेन, सीरियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, दंगली आणि यादवी गृहयुद्ध घडली.
‘स्प्रिंग’ या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ असा होतो की, पानगळती होऊन नवीन पालवी फुटण्याचा काळ. मध्य पूर्वेतल्या अनेक अरब देशांमध्ये राजेशाही आणि हुकूमशाही राजवट होती. या जूलमी राजवटीला उलथवून लावून देशात लोकशाही सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक लोकशाही समर्थक एकत्र येत त्यांनी ही चळवळ उभी केलेली. ही चळवळ अरबमधल्या एका देशापुरती मर्यादीत राहिली नाही. तर त्याचं लोण आसपासच्या देशांतही पसरलं. एकप्रकारे अरबमधल्या प्रत्येक देशांमध्ये जुनी सत्ता जाऊन नवीन लोकशाही सत्ता स्थापन होणार असं ते वातावरण होतं. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांनी या संपूर्ण क्रांतीमय परिस्थितीला ‘अरब स्प्रिंग’ असा शब्द वापरला होता.
अरब स्प्रिंगचे प्रणेते मोहम्मद बोआझिझी
मोहम्मद बोआझिझी हे ट्युनिशियातला रस्त्यावर सामान विकणारा एक सर्वसाधारण तरुण होते. तिथल्या स्थानिक महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मालाची जप्ती आणि छळाला तो कंटाळून गेला होता. त्यामुळे त्यांनी स्वत:ला पेटवून घेतलं होतं. ही घटना देशभर पसरली. लोकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. बोआझिझीच्या मृत्यूनंतर जनतेचा संताप आणि तुरळक हिंसाचार तीव्र झाला. त्यामुळे ट्युनिशियाचे तत्कालीन अध्यक्ष झीन एल अबिदिन बेन अली यांना 23 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर 14 जानेवारी 2011 रोजी पायउतार व्हावं लागलं.
ट्युनिशियातील या घटनेनंतर हुकूमशाही सत्ता बदलली. यातून प्रेरणा घेत अरबमधल्या आसपासच्या राष्ट्रामध्येही अशाप्रकारे आंदोलने, निदर्शने आणि उठाव होऊ लागले. या निदर्शनांमध्ये अनेक पुरुषांनी त्यांच्या स्वतःच्या हुकूमशाही सरकारांचा अंत करण्याच्या प्रयत्नात बोआझिझीच्या आत्मदहनाच्या कृतीचे अनुकरण केलं.
अरब स्प्रिंगचे परिणाम
सरकार विरोधात बोआझिझीने केलेल्या कृतीतून धडा घेत अनेक राष्ट्रामध्ये आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये काही देशांमध्ये यश मिळालं तर सिरीया सारख्या देशांत आजही नागरी युद्धाचा विद्धांस पाहायला मिळतो.
‘अरब स्प्रिंग’ला तात्काळ प्रतिसाद मिळाल्यानंतर सत्ता संघर्ष हा सुरूच राहिला. नेतृत्व बदललं आणि राजवटींना जबाबदार धरलं गेलं. अरब जगात सत्तेची पोकळी निर्माण झाली. शेवटी, धार्मिक अभिजात वर्गाकडून सत्तेचं एकत्रीकरण आणि अनेक मुस्लिम-बहुल राज्यांमध्ये लोकशाहीला वाढता पाठिंबा देणाऱ्या समर्थकांमध्ये वादग्रस्त लढाई झाली.
येमेनमधील परदेशी राज्यकर्त्यांच्या प्रति-क्रांतिकारी हालचाली, बहरीन आणि येमेनमधील प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लष्करी हस्तक्षेप आणि सीरिया, इराक, लिबिया आणि येमेनमधील विनाशकारी गृहयुद्धांमुळे अरब स्प्रिंग ही लोकप्रिय चळवळ भ्रष्टाचार संपवेल, जनतेचा राजकीय सहभाग वाढवेल आणि अधिक आर्थिक समता आणेल या आशा फोल ठरल्या.
आजही अरब स्पिंग चळवळ जिवंत आहे
आजही जगात अरब स्प्रिंगप्रमाणे आंदोलनाच्या घटना घडतात. एका तपापूर्वीच अरबमध्ये ज्या – ज्या देशात भ्रष्टाचार, असमानता, आर्थिक दुर्बलता अशा ज्या – ज्या कराणांसाठी आंदोलनं छेडली होती त्याच कारणांसाठी आजही तिथले सामान्य नागरिक सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आहेत. याचाच परिणाम म्हणून 2018 मध्ये इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी आणि 2022 मध्ये लेबनॉनचे साद हरीरी यांनी राजीनामा दिला. आणि 2019 मध्ये सुदानचे अध्यक्ष ओमर अल-बशीर आणि अल्जेरियाचे अब्देलअझीझ बुतेफ्लिका यांना पदावरून हटवण्यात आले. या अलिकडच्या आंदोलनाला दुसरे ‘अरब स्प्रिंग’ म्हणून गणलं जातं. अल्जेरिया, सुदान, इराक, लेबनॉन, इजिप्त आणि सीरियामध्ये इथे आजही सुरू असलेला संघर्ष या चळवळीचाच भाग म्हणून ग्राह्य धरला जातो. या घटनांवरुन हुकूमशाही आणि शोषणाविरुद्धच्या राजकीय, सामाजिक लढाई आजही सुरू असल्याचं दिसून येतं.
सद्यघडीला या अरब प्रांतात एका दशकापूर्वी सुरू झालेल्या अरब स्प्रिंगची परिस्थिती म्हणून पाहिलं तर 2024 साली सीरियन गृहयुद्धात बंडखोरांच्या हल्ल्यामुळे अखेर असद राजवटीचा नाश झाला. तर लिबियामध्ये परदेशी सत्तांनी हस्तक्षेप करत गृहयुद्ध थांबवलं. तर येमेनमध्ये आजही गृहयुद्ध सुरू आहे.
भारतातही अरब स्प्रिंग चळवळ सुरू होतेय का?
लडाखमध्ये सोनम वांगचुक यांनी ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणातला सहभाग यामुळे या आंदोलनाला अरब स्प्रिंग स्टाईल आंदोलन असं संबोधलं जात आहे. भारतात यापूर्वी ‘लोकपाल बिल’ या विधेयकासाठीही राष्ट्रीय पातळीवर मोठं आंदोलन झालेलं. मात्र त्यावेळी हा शब्द वापरला गेला नव्हता. यावेळेस हा शब्द वापरण्यामागचं आणखीन कारण आहे ते म्हणजे काही दिवसापूर्वी शेजारील देश नेपाळमध्ये झालेलं आंदोलन.
नेपाळमध्ये ओली सरकारने एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सविरोधात निर्बंध लादले. आधीच देशातला वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी यासारख्या कारणांमुळे तिथला तरुण संतप्त होता. मात्र, सोशल मीडियावरील निर्बंध या एका कारणांच्या निमित्ताने संपूर्ण तरुणवर्ग एकत्र होत रस्त्यावर उतरला. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या आंदोलनात जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. तरुण आणखीन चवतळले आणि भ्रष्टाचारी ओली सरकारला सत्तेवर पायउतार होण्यास भाग पाडलं. ही घटना शांत होत आहे, तोवरच लडाख मध्ये आंदोलन सुरू झालं. शेजारच्या देशांमध्ये लागलीच नागरी हक्कांसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाच्या साधर्म्यामुळे या आंदोलनाला ‘अरब स्प्रिंग स्टाईल आंदोलन’ असं विशेष संबोधन वापरलं जात आहे.