पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्ताने देशभरात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ राबविण्यात येणार आहे. मध्यप्रदेश इथल्या धार इथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महिला व बालकांसाठी हे विशेष आरोग्य शिबिरं असणार आहेत. देशातल्या प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये आणि अंगणवाडीमध्ये आरोग्य तपासणी, मार्गदर्शन शिबिरं भरवण्यात येणार आहेत.
महिलांसाठी वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य सेवांची तरतूद
कुटुंबातील महिला सदृढ, सशक्त असेल तर पूर्ण कुटुंब निरोगी राहतं. यामुळे प्रत्येक कुटुंबातील महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं यासाठी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे.
या शिबिरांमध्ये कान, नाक, डोळे, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा या स्वरुपाची सामान्य तपासणी केली जाणार आहे. तसेच तोंडाचा, स्तनांचा आणि सर्व्हायकल कर्करोगाची तपासणी ही केली जाणार आहे. लसीकरण सेवा पुरविण्यात येणार आहे, गरोदर महिलांसाठी प्रसुतिपूर्व तपासणी आणि सेवा, रक्तक्षय पातळी, क्षयरोग तपासणी, सिकल सेल रक्तक्षय, मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा अशा सगळ्या आरोग्य तपासणींसह आरोग्याविषयी विशेष सल्ला देण्यासाठी शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे.
आरोग्य सेवांची सहज उपलब्धता
केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध आरोग्य सेवा पुरविल्या जातात. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले कार्ड नागरिकांना सहज मिळावेत यासाठीही शिबिर आयोजित केले जाणार आहेत.
यामध्ये माता आणि बालक संरक्षण (MCP) कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये नावनोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड आणि पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन
अतिलठ्ठपणा या आजाराचं प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारत सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम देखील सुरू केली आहे. या ‘स्वास्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या’ माध्यमातूनही साखर आणि खाद्यतेलाच्या सेवनात 10 टक्के घट करुन आरोग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.
याशिवाय स्थानिक आणि प्रादेशिक अन्न पदार्थांना पाठिंबा देणे, आहारात अशा पदार्थांचा समावेश वाढविणे, लहान बालकांच्या आहाराची सुरूवातीपासून कशाप्रकारे काळजी घ्यावी, नवजात बालकांना आईचं दूध पाजण्यावर भर देणं, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता, पोषण आणि संपूर्ण आहार घेणं या अशा विषयांवर मार्गदर्शन शिबिरं आयोजित केली जाणार आहेत.
नागरिकांचा सक्रिय सहभाग
या आरोग्यदायी शिबिरांसोबत रक्तदान शिबिरांचं, निक्षय मित्र म्हणून स्वेच्छानोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरं आणि अवयव दान नोंदणी करण्यासाठीही शिबिरं आयोजित केली जाणार आहेत.