वामकुक्षी म्हणजेच दुपारची विश्रांती आणि शतपावली म्हणजे जेवणानंतर चालणे या दोन्ही सवयींचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते. आयुर्वेदानुसार आणि आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासातून या दोन गोष्टींचे फायदे स्पष्ट झाले आहेत.
वामकुक्षी म्हणजे काय?
दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर थोडा वेळ विश्रांती करणे म्हणजे वामकुक्षी. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त मानली जाते.
वामकुक्षीचे फायदे
डाव्या बाजूला झोपल्याने अन्न जठरात राहते आणि व्यवस्थित पचते. यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारते. तसचं थोड्या वेळाच्या झोपेमुळे मानसिक ताण कमी होतो आणि कामातील सतर्कता वाढते.
दुपारच्या विश्रांतीमुळे मेंदू शांत राहतो, थकवा दूर होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. नैसर्गिक पद्धतीने शरीराला ऊर्जा मिळते, यामुळे चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण कमी होते
वामकुक्षी कधी आणि किती वेळ घ्यावी?
वामकुक्षी फक्त दुपारी जेवणानंतर 15-20 मिनिटांसाठीच घ्यावी. ही झोप 1 ते 3 या वेळेत घ्यावी. अर्ध्या तासाहून अधिक झोपल्यास लठ्ठपणा किंवा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. रात्रीच्या जेवणानंतर वामकुक्षी घेऊ नये त्याऐवजी शतपावली करावी.
शतपावली आरोग्यासाठी महत्त्वाची सवय
रात्रीच्या जेवणानंतर चालणे, म्हणजेच शतपावली, ही सवय आपल्या आरोग्यदायी जीवनसाठी महत्त्वाची आहे. जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात, त्यासाठी शतपावली करणे हा उत्तम उपाय आहे.
शतपावलीचे फायदे
शतपावली केल्यास आपले पचन सुधारते त्यामुळे गॅस आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतात. चालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते , रक्तातील साखर म्हणजेच डायबेटिस नियंत्रणात राहतो. तसचं, रक्ताभिसरण सुधारते, यामुळे तणाव कमी होतो आणि शांत झोप लागते.
शतपावली कधी करावी?
– रात्रीच्या जेवणानंतर 15-20 मिनिटे सावकाश चालावे.
– शक्य असल्यास दुपारच्या जेवणानंतरही चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दुपारी वामकुक्षी घेणे आणि रात्री शतपावली करणे, या दोन्ही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. योग्य पद्धतीने पचनक्रिया चालल्यास शरीर निरोगी राहते. त्यामुळे या आरोग्यदायी सवयींचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत समावेश करणे गरजेचे आहे.