प्रत्येक महिलेला, मुलींना लिपस्टिक लावायला आवडतेच. पण, तुम्हाला हे माहीत आहे का? जी लिपस्टिक तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करते, तीच तुमच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडवू शकते. विशेषतः काही स्वस्त आणि लोकल मार्केटमधील लिपस्टिक्समध्ये असे काही केमिकल्स असू शकतात, जे आपल्या शरीरासाठी खूप हानीकारक असतात.
लिपस्टिकमध्ये दडलेले केमिकल्स कोणते?
लिपस्टिक्समध्ये आढळणाऱ्या काही प्रमुख केमिकल्सपैकी एक म्हणजे बिस्फिनॉल ए (BPA).हे केमिकल सहसा प्लास्टिकच्या पॅकेजिंगमध्ये वापरलं जातं. जेव्हा आपण ही बिस्फिनॉल ए असणारी लिपस्टिक लावतो, तेव्हा हे BPA आपल्या शरीरात प्रवेश करतं. शरीरात गेल्यावर ते आपल्या शरीरातील एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनसारखं काम करतं. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन पूर्णपणे बिघडतं.
यामुळे काय होऊ शकतं?
जेव्हा आपल्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, तेव्हा त्याचे अनेक वाईट परिणाम दिसू लागतात.
– मासिक पाळी अनियमित होते किंवा उशिरा येते.
– चेहऱ्यावर जास्त मुरुम (pimples) येऊ शकतात.
– काही मुलींमध्ये चेहऱ्यावर किंवा हनुवटीवर अनावश्यक केस वाढायला लागतात. याला हिर्सुटिझम (hirsutism) म्हणतात.
म्हणूनच, जर तुमची मासिक पाळी उशिरा येत असेल किंवा अशा काही समस्या असतील, तर कदाचित त्याचं एक मोठं कारण तुमची लिपस्टिक असू शकते.
BPA सोबतच, लिपस्टिकमध्ये आणखी काही केमिकल्स असतात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यातले दोन प्रमुख आहेत मिथाईलपॅराबेन आणि प्रोपाइलपॅराबेन. हे दोन्ही केमिकल्स प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरले जातात. म्हणजे लिपस्टिक खराब होऊ नये म्हणून त्यांना त्यात टाकतात. पण हे केमिकल्स देखील आपल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडवू शकतात. त्यामुळे लिपस्टिक खरेदी करताना या दोन गोष्टी नक्की तपासा.
हेही वाचा : रोज मेकअप करणं कितपत योग्य?
योग्य आणि चांगली लिपस्टिक कशी निवडायची?
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लिपस्टिक खरेदी करायला जाल, तेव्हा फक्त तिचा रंग आणि किंमत पाहू नका, तर पॅकेजिंगवर दिलेले घटक नक्की वाचा.
लिपस्टिकच्या पॅकेजिंगवर ‘BPA-free’ आणि ‘Paraben-free’ असं लिहिलेलं आहे का ते पाहा. असं लिहिलं असेल तर ती लिपस्टिक तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे. काही विश्वसनीय प्रमाणपत्रे असतात, जी उत्पादनाची गुणवत्ता दर्शवतात. भारतात, तुम्ही खालील प्रमाणपत्रे पाहून लिपस्टिक खरेदी करू शकता
- ECOCERT
- COSMOS Organic/Natural
- USDA Organic
- PETA India Cruelty-Free
शक्य असेल तर अशी लिपस्टिक निवडा ज्यात नैसर्गिक घटक असतील. जसे की, शिया बटर, जोजोबा तेल, नारळाचं तेल किंवा व्हिटॅमिन ई. हे घटक तुमच्या ओठांना पोषण देतात आणि हानिकारक केमिकल्सपासून दूर ठेवतात.
तसंच स्वस्त आणि लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या लिपस्टिक्समध्ये हानिकारक केमिकल्स असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, थोडी महाग असली तरी चांगल्या ब्रँडची लिपस्टिक घ्या.