केळ हे असं फळ आहे जे आपल्याला बाराही महिने बाजारात मिळतं आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच ते आवडतं. पण तुम्हाला माहितेय का, आपण जी केळी रोज खातो, ती तर फक्त केळीचा एक प्रकार आहे. आपल्या देशात केळीच्या अशा भरपूर जाती आहेत. आणि गंमत म्हणजे, प्रत्येक जातीच्या केळ्याचे फायदे देखील वेगळे आहेत. काही केळी पोटासाठी उत्तम आहेत, काही त्वचेसाठी, तर काही हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर मग, आज आपण अशाच खास केळींबद्दल जाणून घेऊया.
1. नेंद्रन केळी
ही केळी दिसायला मोठी आणि लांब असतात. नेंद्रन केळ्यांमध्ये ‘रेसिस्टंट स्टार्च’ नावाचा एक खास घटक असतो, जो आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियासाठी खूप फायदेशीर असतो. म्हणूनच केरळमध्ये लहान मुलांना पहिला ‘घन आहार’ म्हणून ही केळी देतात. तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवायची असेल, तर ही केळी तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
2. रोबस्टा केळी
आपण रोज खातो ती पिवळी धम्मक, लांब केळी त्यांनाच रोबस्टा केळी म्हणतात. ही केळी खाल्ल्याने आपली त्वचा, हाडं आणि सांधे मजबूत होतात. यातील पोषक तत्वांमुळे केसांची वाढ चांगली होते आणि त्वचेचा पोत सुधारतो.
3. वेलची केळी
ही छोटी, गोड आणि सुगंधी केळी पाहिल्यावर खाण्याचा मोह आवरत नाही. दिसायला लहान असली तरी या केळ्यांचे फायदे मोठे आहेत. वेलची केळी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात, केस आणि नखं वाढायला मदत करतात आणि पचनक्रियाही सुधारते. जेवणाआधी वेलची केळी खाल्ल्यावर जास्त फायदा होतो.
4.पूवन केळी
तुम्हाला कधी खूप थकल्यासारखं किंवा चिडचिड होतं असेल तर पूवन केळी खाऊन बघा. ही केळी खाल्ल्याने शरीरात ‘सेरोटोनिन’ नावाचा हॉर्मोन वाढतो.जे “हॅप्पी हॉर्मोन” म्हणून ओळखले जातात. ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो आणि तणाव कमी होतो. यात भरपूर पोटॅशियम असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडतं. विशेषतः मासिक पाळीच्या काळात पोट फुगणे आणि थकवा जाणवत असेल, तर ही केळी नक्की खा.
5.ग्रीन मॉरिस केळी
कच्ची असताना हिरवी आणि पिकल्यावर पिवळी होणारी ही केळी पचनक्रियेसाठी खूप चांगली आहेत. विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी ती खूप फायदेशीर आहे. ही केळी ‘रोबस्टा’ किंवा ‘बेंगळूर बनाना’ या नावाने देखील ओळखली जातात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन C, B6 आणि पोटॅशियम भरपूर असते.
6.कर्पूरवल्ली केळी
तामिळनाडू आणि केरळमध्ये मिळणारी ही औषधी केळी आहेत. पोटदुखी, अतिसार यासाठी घरगुती उपाय म्हणून या केळ्यांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनदा काळी मिरी, तूप घालून ही केळी खाल्ल्यास पोटाच्या समस्यांपासून नक्कीच आराम मिळेल.
7. लाल केळी (Sivappu Vazhai)
ही केळी लालसर असते आणि इतर केळ्यांपेक्षा थोडी जास्त गोड व वेगळी. यात लोह आणि बी-6 विटॅमिन भरपूर असते – त्यामुळे मासिक पाळीतील त्रास, केस गळतीसाठी खूप गुणकारी. यामध्ये फायबर असल्यानं तुम्हाला लवकर भूक लागणार नाही.
प्रत्येक केळीचा एक खास उपयोग आहे. काही केळी तुम्हाला ताकद देतात, काही पोट दुरुस्त करतात, तर काही तुमची त्वचा आणि केस चांगले ठेवतात. त्यामुळे रोज एकच प्रकारची केळी खाण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या केळी खात राहा आणि निरोगी राहा.