आजकाल सुंदर दिसणं ही फक्त गरज नाही तर अनेक महिलांसाठी रोजची सवय झाली आहे. विशेषतः ऑफिस, कॉलेज किंवा कोणत्याही बाहेरच्या कामासाठी जाताना अनेक महिला मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. एका संशोधनात असं दिसून आले की, अनेक महिला मेकअपला त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग मानतात. काही महिलांना तर मेकअप न करता बाहेर जाणं अशक्यच वाटतं.
मेकअप केल्याने आपण नक्कीच सुंदर, आकर्षक दिसतो. आपला आत्मविश्वासही वाढतो. फाउंडेशन, लिपस्टिक, काजळ आणि ब्लश यामुळे चेहर्याला उजळपणा मिळतो. पण याचा अति वापर आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे.
रोज फाउंडेशन वापरणं टाळा
चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी आणि त्वचेचा रंग एकसारखा दिसण्यासाठी फाऊंडेशनचा वापर केला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का ? दररोज फाउंडेशन वापरल्याने त्वचेवर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तरुणपणी जरी त्वचेवर हे परिणाम जाणवले नाहीत, तरी कालांतराने अनेक महिलांना यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच फाउंडेशनचा वापर जपून आणि विचारपूर्वक करणे महत्वाचं आहे.
तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे (Open Pores) कधीकधी बंद होतात. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
मेकअप करताना फाउंडेशन या open pores मध्ये जाऊन बसतो आणि त्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही. परिणामी फाउंडेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही केमिकल्समुळे त्वचेवर सूज, खाज, पुरळ किंवा लालसरपणा येऊ शकतो सेन्सिटिव्ह त्वचेसाठी हे अधिक धोक्याचं ठरू शकतं.
सेन्सिटिव्ह त्वचेसाठी फाउंडेशनमधील रसायने अधिक हानिकारक ठरू शकतात. यामुळे काही महिलांना लालसरपणा, खाज, जळजळ किंवा त्वचा सुकल्यासारखी वाटते. तेलकट स्किनवर वापरलेले फाउंडेशन स्किनवरील चिकटपणा जास्त वाढवतो. तर याउलट कोरडी स्किन असेल तर फाउंडेशनमुळे स्किन अजून निर्जीव बनते.
त्वचेचा नैसर्गिक निखार हरवतो
सतत मेकअप केल्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. चेहरा थकलेला व निस्तेज दिसू लागतो. या सवयीचा परिणाम असा होतो की स्वतःचा मेकअप न केलेला चेहरा पाहून आपला आत्मविश्वास कमी होतो.
शास्त्रज्ञ सांगतात की रोज मेकअप करणे हे एक मानसिक व्यसन बनू शकते. यामुळे स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. मेकअप न करता बाहेर जाणं कठीण वाटतं, जे आरोग्यासाठी आणि मानसिकदृष्ट्याही धोकादायक ठरू शकतं.
मेकअपवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय
रोज फाउंडेशन टाळा, फक्त गरज असेल तेव्हाच वापरा.
त्वचेची योग्य काळजी घ्या. रोज चेहरा स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
‘नो मेकअप डे’ ठरवा, आठवड्यातून किमान एक दिवस मेकअपपासून विश्रांती घ्या.
मेकअपचे नवीन प्रोडक्ट वापरण्याआधी ‘पॅच टेस्ट’ करा. त्यामुळे त्वचेवर होणारी रिऍक्शन आधीच कळते.
त्वचेनुसार प्रोडक्ट निवडा, आपली त्वचा कोरडी आहे की तेलकट, हे लक्षात घेऊन मेकअपची निवड करा.