लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते आपल्या लाडक्या गौराईच्या येण्याचे.गौरी-गणपतीचा सण म्हणजे आपल्याकडे घरी एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. प्रत्येक जण पारंपरिक पेहरावात नटून थटून तयार असतो. महिला मंडळी तर जास्तच उत्साहात असतात. पण दरवर्षी तीच तीच नऊवारी साडी किंवा पारंपरिक ड्रेस घालून कंटाळा आला असेल तर यंदा काहीतरी वेगळं आणि हटके ट्राय करायला काय हरकत आहे?
चला तर मग, पाहूया असे काही खास ड्रेस पॅटर्न जे तुम्हाला या उत्सवात इतरांपेक्षा वेगळे आणि उठून दिसायला मदत करतील.
1. मराठमोळ्या नऊवारी साडीचा लूक
जर तुम्हाला अस्सल मराठमोळा लूक करायचा असेल तर नऊवारी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही साडी नेसणं थोडं कठीण वाटत असलं तरी काही सोप्या टिप्सनी तुम्ही ती छान कॅरी करू शकता.
नऊवारी साडीवर पारंपरिक पैठणी किंवा सिल्कचा ब्लाउज खूप छान दिसतो. त्याचबरोबर नथ, ठुशी, हिरव्या बांगड्या, कंबरपट्टा आणि चंद्रकोर लावली की तुमचा लूक पूर्ण होईल.जर तुम्हाला थोडा आधुनिक टच द्यायचा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचा डिझायनर ब्लाउजही निवडू शकता.
नऊवारीवर खोपा किंवा अंबाडा खूप छान दिसतो. किंवा तुम्ही केस मोकळे सोडून मागे गजरा लावल्यास तुमचा लूक अजून खुलून दिसेल. मेकअप हलका आणि सॉफ्ट लिपस्टिक छान दिसेल. या लूकसोबत कोल्हापुरी चप्पल किंवा सोनेरी-चांदीचे सँडल एकदम परफेक्ट वाटतील.
2. पारंपरिकतेला आधुनिक फॅशनची जोड
जर तुम्हाला नऊवारी साडी नेसायची नसेल किंवा तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करू इच्छित असाल तर पारंपरिकतेला नवीन फॅशनची जोड देत काही खास पेहराव तुम्ही निवडू शकता.
- पारंपरिक प्रिंट्स असलेला जंपसूट:
छोट्याखानी सण-समारंभासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. पिंक, रस्टी शेड्स, ऑफ-व्हाईट आणि यलो अशा शेड्स सणावाराला उठून दिसतात. हे इंडो-वेस्टर्न जंपसूट खूप कम्फर्टेबल वाटतील आणि स्टायलिशही दिसतील.
- ट्रेडिशनल स्लिट कुर्ता:
हा कुर्त्याचा प्रकार खूप कम्फर्टेबल आणि सुंदर दिसतो. दिसायला थोडाफार अनारकलीसारखाच असल्यामुळे याला अनारकलीची परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणता येईल.
- पेप्लम टॉप आणि स्कर्ट:
शॉर्ट लेंथचा पेप्लम टॉप आणि त्यावर थ्री-फोर्थ किंवा फुल लेंथचा स्कर्ट हे कॉम्बिनेशन फेस्टिव्ह सीझनसाठी एकदम बेस्ट आहे. स्कर्ट प्लेन असेल तर उत्तम, नाहीतर सिल्की फ्लोई प्लाझो तुम्हाला हटके लूक देईल.
- वॉटरफॉल कुर्तीज:
ज्यांचे लेअर्स दिसतात अशा कुर्तीज म्हणजे वॉटरफॉल कुर्तीज. या कुर्तीज शॉर्ट आणि लाँग अशा दोन्ही प्रकारात येतात. या कुर्तीज फ्लोई प्लाझोजवर खूप उठून दिसतात.
- पँट स्टाईल साडी :
साडी नेसण्याची एक नवीन पद्धत जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यात साडीला पारंपरिक पेटीकोटच्या ऐवजी पँटवर नेसले जाते. तुम्ही पारंपरिक सिल्क साडीला सिगारेट पँट, धोती किंवा लेगिन्सवर नेसू शकता. यामुळे तुम्हाला साडीचा पारंपरिक लूक मिळेल आणि त्याचबरोबर कम्फर्टही मिळेल. यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि पारंपरिक दागिने खूप उठून दिसतात.
- लॉंग स्कर्ट आणि शॉर्ट कुर्ती:
हा एक अतिशय आरामदायक पण तरीही फेस्टिव्ह लूक आहे. एम्ब्रॉयडरी केलेला किंवा प्रिंटेड लॉंग स्कर्ट निवडा आणि त्यावर एक साधी पण स्टायलिश शॉर्ट कुर्ती घाला. तुम्ही यावर एक पारंपरिक एथनिक जॅकेटही वापरू शकता. हा लूक सोपा असला तरी खूप आकर्षक दिसतो.
- कस्टम मेड ड्रेस:
जर तुम्हाला हटके आणि इतरांपेक्षा वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रेस डिझाईन करू शकता. यात तुम्ही पैठणी सिल्क किंवा पारंपरिक प्रिंट्सचा वापर करून एखादा फ्लोई गाऊन, अनारकली किंवा लांब कुर्ती डिझाईन करू शकता. यामुळे तुम्ही डिझाईन केलेला ड्रेस कोणाकडेच नसेल.
गौरी-गणपतीच्या या सणात पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मेळ साधत तुम्ही नक्कीच सगळ्यांमध्ये उठून दिसाल.