आपल्या भारतीय संस्कृतीत साडीचं महत्त्व खूप खास आहे. प्रत्येक साडीची स्वतःची एक वेगळी गोष्ट असते. साडीची विणकाम शैली, रंग, डिझाईन आणि इतिहास साडीला आणखी खास बनवतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशातील अशा काही साड्या आहेत ज्यांना युनेस्कोचं (UNESCO) संरक्षण मिळालं आहे, म्हणजेच युनेस्को कडून या साड्या जपल्या आहेत. आज आपण अशाच काही खास साड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या वॉर्डरोबची शान वाढवतीलच, पण त्यामागची कला आणि इतिहासही तुम्हाला समजेल
-
कासावू साडी
केरळची ओळख म्हणजे कासावू साडी. ही साडी पाहिली की डोळ्यासमोर येते ती तिची पांढरी किंवा ऑफ-व्हाईट रंगसंगती. त्यांच्या बॉर्डरवर सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांनी नक्षीकाम केलेलं असतं. ही साडी इतकी सुंदर दिसते की कोणत्याही शुभ कार्यासाठी ती अगदी परफेक्ट आहे. रेशीम आणि सुती कापडात मिळणाऱ्या या साड्या खूप आरामदायी असतात. केरळच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांची ती एक प्रतीक आहे.
-
चंदेरी साडी
मध्य प्रदेशात तयार होणारी चंदेरी साडी तिच्या डिझाईन्स, चांगल्या प्रतीचे कापड आणि हलक्या वजनामुळे खूप प्रसिद्ध आहे. या साडीला मध्य प्रदेशचं रत्न म्हटलं जातं. चंदेरी सिल्क, कॉटन आणि सिल्क-कॉटन अशा तिन्ही प्रकारांत ही साडी मिळते. तिच्यावर असलेल्या बारीक बुट्ट्या आणि नाजूक जरीचं काम यामुळे या साडीला एक शाही लूक येतो. त्यामुळे चंदेरी साडी नेसल्यावर तुम्ही नक्कीच इतरांपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक दिसाल.
-
मुगा सिल्क साडी
आसामची मुगा सिल्क साडी तिच्या नैसर्गिक सोनेरी-पिवळ्या रंगामुळे आणि चमकदार पोतामुळे खूप लोकप्रिय आहे. ‘मुगा’ म्हणजे ‘पिवळा’ आणि म्हणूनच या रेशमाचा रंग नैसर्गिकरित्या सोनेरी असतो. या साडीची खासियत म्हणजे ती जितकी जुनी होते, तितकी तिची चमक वाढत जाते. ही साडी वर्षांनुवर्षं वापरली तरी खराब होत नाही. एखाद्या खास पार्टीसाठी किंवा लग्नसमारंभासाठी मुगा सिल्क साडी एक उत्तम पर्याय आहे.
-
बनारसी साडी
बनारसी साडी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते तिचे भरजरी रेशीम, सोनेरी किंवा चांदीच्या जरीचं भरगच्च काम आणि रॉयल लुक. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात तयार होणाऱ्या या साड्यांचा इतिहास खूप जुना आहे. आजही या साड्या लग्नांमध्ये आणि मोठ्या समारंभांमध्ये नेसल्या जातात. तिचा पोत इतका सुंदर असतो की नेसणारी प्रत्येक स्त्री खूपच आकर्षक दिसते. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये किमान एक तरी बनारसी साडी असायलाच हवी.
-
संबलपुरी इकत साडी
ओडिशाची संबलपुरी इकत साडी तिच्या विणकाम तंत्रासाठी ओळखली जाते. इकत म्हणजे धाग्यांना आधी रंगवून मग त्यांचं विणकाम करणे, ज्यामुळे डिझाईन तयार होतं. यात रंगीत धाग्यांचा वापर करून विविध पारंपरिक नक्षीकाम तयार केलं जातं. प्रत्येक संबलपुरी इकत साडी एक कलाकृती असते. या साड्या खासकरून शुद्ध रेशमापासून बनवल्या जातात आणि त्या दिसायला खूपच सुंदर आणि युनिक असतात.
-
कांजीवरम सिल्क साडी
तामिळनाडूच्या कांचीपुरम शहरातून येणारी कांजीवरम साडी तिच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी, लखलखीत रंगांसाठी आणि उत्तम दर्जाच्या रेशम धाग्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या साड्यांवर असलेले पारंपरिक डिझाईन्स, मंदिरांचे नक्षीकाम आणि प्राणी-पक्ष्यांची चित्रे यांना खूप मागणी असते. कांजीवरम साडी तिच्या टिकाऊपणासाठी आणि भरगच्च पोतासाठी ओळखली जाते.
-
चिकनकारी साडी
उत्तर प्रदेशचीच अजून एक सुंदर कलाकृती म्हणजे चिकनकारी साडी. ही साडी तिच्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या भरतकामासाठी प्रसिद्ध आहे. पांढऱ्या धाग्यांनी, पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाच्या कपड्यावर विविध डिझाईन्स तयार केली जातात, जी खूपच आकर्षक दिसतात. चिकनकारी साड्या दिसायला खूपच मोहक आणि एलिगंट असतात. आणि त्या हलक्या आणि आरामदायक असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा अगदी रोजच्या वापरासाठीही वापरता येतात.
-
पटोला साडी
गुजरातच्या पाटन शहरात तयार होणारी पटोला साडी तिच्या अनोख्या ‘डबल इकत’ तंत्रासाठी ओळखली जाते. या तंत्रात ताणा (warp) आणि बाणा (weft) दोन्ही धाग्यांना आधी रंगवून मग त्यांना विणले जाते, यामुळे दोन्ही बाजूंनी एकसारखे डिझाईन दिसते. पटोला साड्या खूपच महाग असतात आणि त्यांना बनवायला खूप वेळ देखील लागतो. त्यांचे चमकदार रंग आणि आकर्षक डिझाईन्स त्यांना इतर साड्यांपेक्षा वेगळे बनवतात.