केस म्हणजे आपल्या सौंदर्यात भर घालणारी एक खास गोष्ट.योग्य हेअरस्टाईल निवडणं म्हणजे आपला पूर्ण दिवसाचा ‘टोन’ सेट करण्यासारखं आहे. मग तो दुपारचा कॅज्युअल ब्रंच असो, रात्रीची पार्टी असो किंवा रोजची छोटी-मोठी कामं असोत. केसांच्या स्टाईलमुळे खूप फरक पडतो.
प्रवासात असताना फक्त केसांची स्टाईल जरी तुम्ही बदलली तरी तुमचा लूक पूर्णपणे बदलतो. तुम्हाला कपडे बदलायची गरज पण लागत नाही. म्हणूनच आपण आपल्या कपड्यांवर जेवढं लक्ष देतो, तेवढंच केसांच्या स्टाईलवरही दिलं पाहिजे. अशाच काही सोप्या पण स्टायलिश हेअरस्टाईल्स, ज्या तुम्ही अगदी सहज करू शकता, त्या आपण आता पाहूया.
1.मिनी टॉप नॉट हेअरस्टाईल
ही स्टाईल करायला खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसते. कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांपर्यंत, सगळ्यांसाठी ही एकदम परफेक्ट आहे.
सगळ्यात आधी तुम्ही तुमचे केस स्ट्रेटनरने सरळ करून घ्या.जर केस थोडे कुरळे असतील, तर ते सेट होतील.त्यानंतर केसांना छान चमक यावी आणि ते कुरळे होऊ नयेत म्हणून थोडं सीरम किंवा हलकी स्टायलिंग क्रीम लावा. यामुळे केसांना चांगलं फिनिशिंग मिळतं.
आता सगळे केस डोक्याच्या अगदी वरच्या बाजूला घ्या आणि एक उंच पोनीटेल हेअरबँडने घट्ट बांधा. चेहऱ्यावरून काही केस मोकळे सोडा. यामुळे तुमचा लुक अजून छान आणि नैसर्गिक दिसेल.
त्यानंतर पोनीटेलला स्वतःभोवती गोल फिरवून एक छोटा ‘टॉप नॉट’ म्हणजेच अंबाडा तयार करा. त्याचं टोक आतमध्ये घालून टोकाला नीट बॉबी पिन्स लावा. अंबाडा थोडा मोठा आणि गोल दिसण्यासाठी अलगद थोडा सैल करा. आणि केस व्यवस्थित राहण्यासाठी त्यावर हेअरस्प्रे किंवा जेल वापरा.
2. स्कार्फ पोनीटेल
प्रवास, ब्रंच किंवा संध्याकाळच्या पार्टीसाठी ही स्टाईल खूपच छान दिसते. साध्या पोनीटेलला थोडा ट्विस्ट देण्यासाठी स्कार्फचा वापर केल्याने एक वेगळाच लुक मिळतो.
तुमचे केस व्यवस्थित विंचरून घ्या. जर तुमचे केस ओले असतील, तर ‘वेट-टू-ड्राय स्ट्रेटनर’ वापरून केसांना सरळ करा. केस कोरडे असले तरी तुम्ही हा स्ट्रेटनर वापरू शकता. त्यानंतर केस मानेच्या मागच्या बाजूला नीट घेऊन हेअरबँडने पोनीटेल बांधा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोनीटेल उंच किंवा खाली बांधू शकता.
तुमचा स्कार्फ 1-2 इंच रुंद अशा लांब पट्टीमध्ये घडी करा. स्कार्फचा रंग आणि प्रिंट तुमच्या कपड्यांना मॅच होणारी असेल तर हेअरस्टाईल अजूनच छान वाटेल. हा स्कार्फ पोनीटेलच्या सुरुवातीपासून पोनीटेलभोवती घट्ट गुंडाळा, जेणेकरून हेअरबँड दिसणार नाही. पुरेसा स्कार्फ गुंडाळल्यावर, खाली एक गाठ किंवा बो बांधा आणि स्कार्फची टोकं पोनीटेलसोबत खाली मोकळी सोडा.
हेही वाचा: तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा योग्य आहे? जाणून घ्या सोप्या टिप्स
3. हाफ-अप क्लॉ क्लिप स्टाईल.
ही स्टाईल खूप रोमँटिक आणि बोहो ‘व्हाईब’ देते. ज्यांना केस पूर्ण बांधायचे नसतात आणि थोडे मोकळे सोडायचे असतात, त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे. डेटवर जाताना किंवा अगदी घरातही तुम्ही ही स्टाईल करू शकता. वेस्टर्न कपड्यांवर ही स्टाईल खूप छान दिसते.
तुमच्या केसांचा वरचा अर्धा भाग, म्हणजे कपाळापासून डोक्याच्या मध्यभागापर्यंतचे केस घ्या आणि हाफ पोनीटेल करत आहात तसे केस एकत्र करा. त्यानंतर केसांना हलकेच ट्विस्ट करून डोक्याच्या मागच्या बाजूला एक छोटा अंबाडा तयार करा. हा अंबाडा खूप घट्ट नसावा. अंबाड्याला हेअरइलास्टिक किंवा 2-3 बॉबी पिन्स नीट लावून घ्या. आता या अंबाड्यावर तुमची मोठी फ्लॉवर किंवा बो असलेली क्लॉ क्लिप लावा. क्लिप अशी असावी की ती तुमच्या लुकला अजून सुंदर करेल. नंतर चेहऱ्याच्या बाजूने काही केस मोकळे सोडून त्यांना हलके कर्ल करा. यामुळे तुमचा ‘लूक’ अधिक रोमँटिक दिसेल.
4. स्कार्फसह वेव्हज
ही स्टाईल तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाताना, मित्र मैत्रिणींसोबत सोबत कॅज्युअल आऊटिंगला किंवा अगदी दुपारच्या जेवणसाठी बाहेर पडतानाही ही हेअरस्टाईल करू शकता. केस मोकळे सोडून त्यावर स्कार्फ बांधल्याने एक वेगळाच लुक तुम्हाला मिळेल.
सर्वात आधी केस टॉवेलने कोरडे करून घ्या, पण ते पूर्ण कोरडे नसावेत. थोडे ओलसर असले तरी चालतील. केसांना हलका वेव्ही लुक तयार करा. यासाठी तुम्ही वेव्हिंग मशिन किंवा अगदी वेण्या घालूनही वेव्हज तयार करू शकता. वेव्हज केल्यावर बोटांनी किंवा मोठ्या दातांच्या कंगव्याने केस हलके विंचरा, ज्यामुळे ते नैसर्गिक दिसतील आणि वेव्हज एकमेकांत छान मिसळतील.
आता तुमचा स्कार्फ त्रिकोणी आकारात घडी करा किंवा त्याची लांब पट्टी तयार करा. स्कार्फ डोक्यावर रुमालासारखा ठेवा, असं केल्याने त्याची दोन्ही टोकं मानेच्या मागे येतील किंवा पोनीटेलच्या खाली येतील.
त्यानंतर स्कार्फ मानेच्या मागच्या बाजूला किंवा पोनीटेलच्या थोडं वर बांधा आणि त्याची टोकं मोकळी सोडा. चेहऱ्याच्या समोरचे काही केस हलकेच मोकळे सोडा.
तर, या आहेत 4 सोप्या हेअरस्टाईल्स ज्या तुमचा मूड आणि पूर्ण ‘लूक’ बदलू शकतात. पुढच्या वेळी बाहेर जाताना किंवा घरात असतानाही काहीतरी वेगळं करून बघायचं असेल, तर या स्टाईल्स नक्की करून बघा.