भारतीय सण-उत्सवांमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना पावसाळ्याच्या मध्यावर येतो आणि निसर्गसंपत्ती, वनौषधी, ऋतुनुसार मिळणाऱ्या भाज्या यांचा साठा याच वेळी सर्वाधिक असतो. धार्मिक दृष्ट्या श्रावणात अनेक व्रते, उपास आणि सामूहिक सण साजरे होतात. या व्रतांमागे अध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक असे तीनही पैलू दडलेले असतात. प्रत्येक व्रताच्या दिवशी विशिष्ट अन्नपदार्थ तयार केले जातात, जे ऋतुमानाशी सुसंगत आणि शरीरासाठी हितकारक असतात.
चणे आणि दाणे
पूर्वी शाळांमध्ये श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी अर्धा दिवस शाळा असायची. या दिवशी विद्यार्थ्यांना चण्याचं वाटप केलं जायचं. काही घरांमध्ये दर शुक्रवारी जराजिवतीचं पूजन करतात. उत्तरप्रदेशमध्येही ही प्रथा पाहायला मिळते. या पूजेच्या नैवेद्यात चणे-दाणे, फळे, तुपातले लाडू देतात. चणे व दाणे हे प्रथिने, लोह आणि ऊर्जा देणारे अन्न असल्याने पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. चणे हे प्रथिने व तंतुमय पदार्थांनी भरपूर असतात, तर शेंगदाणे हे आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने व लोहाचा उत्तम स्रोत आहेत. पावसाळ्यात या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास थकवा कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पुरणपोळी, मोदक, तंबीट
नागपंचमीच्या सणाला महाराष्ट्राच्या विविध प्रांतात वेगवेगळे पदार्थ केले जातात. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तंबीटाचे लाडू, विदर्भात पुरणपोळी, खान्देशात खीर तर कोकणात उकडीचे मोदक आणि पातोळ्या केल्या जातात. या सर्वच गोड पदार्थांमध्ये किंवा त्यांच्या सोबत भरपूर तूप खाल्लं जातं. तूपामुळं या पदार्थांचं पचन हलकं होतं. या पदार्थांमधले घटक पाहिले तर लक्षात येतं की हे पदार्थ प्रथिनयुक्त आहेत. शिवाय तंबीटामध्ये तीळही असतात. तीळामध्ये उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असल्याने पावसाळ्यातील दमट हवेत सांधेदुखीपासून बचाव होतो.
नारळी भात, नारळाच्या वड्या
श्रावण पौर्णिमेला समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. घरोघरी नारळीभात, नारळाच्या वड्या हे पदार्थ आवर्जून केले जातात. नारळामध्ये तंतुमय पदार्थ, मिनरल्स आणि मध्यम शृंखलेचे फॅट्स असल्याने पचन सुधारते व ऊर्जा टिकवून ठेवते. किनारपट्टीवर मासेमार समुदायासाठी हा दिवस नवा हंगाम सुरू होण्याचा उत्सव असतो.
काला
श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी दही, लोणी, पोहे, फळे यांचा मिश्रित ‘काला’ केला जातो. पावसाळ्यात पचनसंस्था काहीशी मंदावते यावेळी हलका आहार घेतल्यानं पोटाला आराम वाटतो. त्यामुळं काला खाल्ल्यानं भूकही भागते, खाण्याचं समाधान, पौष्टिकता यासोबतच हलका आहार या सर्वच गोष्टी साध्य होतात.
कुठलाही धर्म चालीरीती किंवा रिवाज असू देत सात्विक भोजनावर भर दिला जातो. आहाराद्वारे निरोगी राहण्याचा प्रयत्न केला जातो. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी या चालीरीती किंवा रिवाज आपल्या पूर्वजांनी सुरू केले आहेत, हे जर लक्षात ठेवले तरी याचा अतिशय चांगल्या रीतीने उपयोग आपल्या आयुष्यात आपण करून घेऊ संस्कृतीचेही जतन होईल आणि आपल्या आरोग्याचे रक्षण होईल.
3 Comments
परंपरागत खाद्य संस्कृती किती वैज्ञानिक होती,हे या लेखातून सिद्ध होतंय. ह्याचे अवलंब आता प्रकर्षाने होणे आवश्यक आहे,तेव्हा च पुढची पिढी आरोग्यदायी असेल.
आपले पूर्वज खरे तर आहार तज्ज्ञ होते
छान उपयुक्त लेख आहे