आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या होळी उत्सव 

Holi Festival : होळी सणाच्या अगोदरच्या महिन्यात आकाशात चंद्र दिसला की, स्फुर्तीने ‘कुर्रर्र’ अशी आरोळी देवून ढोल आणि मांदल वाद्यावर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी बांधव 'दांडाचा महिना' म्हणतात. या दांडा महिन्यापुर्वी आदिवासी बांधव शेतातील सर्व कामे संपवून घेतात. दांडा महिन्याच्या एक महिन्यानंतर होळीचा सण असतो. 
[gspeech type=button]

” कुर्रर्र…काय रा मेलो काय गावो 

         गावो उवीने गीते….

         बारा मोयनाम आवली उवी बाय 

         बारा मोयनाम आवे वो ssss 

         मेवू भोंग-यू लेती आवी उवी बाय 

         मेवू भोंग-यू लेती आवे वो sss “

कुर्रर्र हा नाचताना, गाताना वापरला जाणारा स्फूर्तिदायक शब्द आहे. या लोकगीताचा अर्थ असा आहे की, “काय गावू आणि काय राहू देवू, होळीची महिमा अपरंपार आहे. बारा महिन्यांनी आली होळीबाई. बारा महिन्यांनी आली! मेळा, भोंगऱ्या सोबत घेवुन आली होळीबाई.”

सातपुडा पर्वतरांगातील होळी सण

होळी हा सातपुडा पर्वतरांगातील आदिवासी बांधवांचा सर्वात महत्वाचा उत्सव आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान इथल्या आदिवासी समाजाच्या विविध सणावारामध्ये होळी सणाला आणि त्याआधी साजरा केला जाणाऱ्या भोंगऱ्या उत्सवाला मुख्य स्थान आहे. 

आदिवासी बांधवांमध्ये होळी म्हणजे नुसतं नाच गाणं नाही तर सांस्कृतिक वैभव आणि लोकशाही जीवनमुल्यांनी भरलेला सण असतो. या सणाच्या निमित्ताने श्रम, समुह, बंधुता, प्रेम, विश्वास, सहकार्य ही मानवी मूल्ये आदिवासी बांधव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त करतात. वसंत ऋतूमध्ये झाडावर नवीन पालवी फुटत असते तसंच नवचैतन्य हे या सणाच्या निमित्ताने या बांधवामध्ये निर्माण होत असते. गीत, पौराणिक कथा, नृत्य, संगीत अशा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतीक, आध्यात्मिक कार्यक्रम या भोंगऱ्या होळीत पाहायला मिळतात.

भोंगऱ्या होळी सणाची कथा

आदिवासीची पौराणिक कथेत होळी, भोंगऱ्या बाबत आजही मौखिक स्वरुपात इतिहास सांगितला जातो. ज्यात होळी आणि दिवाळी ह्या दोन बहिणी असल्याचे सांगितले जाते. होळीचे दोन मुले म्हणजे भोंगऱ्या आणि मेळादा असल्याचे या पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यानिमित्ताने हे सण साजरे केले जातात.   

भोंगऱ्यांचं आयोजन कधी करतात?

होळी सणाच्या अगोदरच्या महिन्यात आकाशात चंद्र दिसला की, स्फुर्तीने ‘कुर्रर्र’ अशी आरोळी देवून ढोल आणि मांदल वाद्यावर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी बांधव ‘दांडाचा महिना’ म्हणतात. या दांडा महिन्यापुर्वी आदिवासी बांधव शेतातील सर्व कामे संपवून घेतात. दांडा महिन्याच्या एक महिन्यानंतर होळीचा सण असतो. 

होळीतील घुट आणि बुरोगली संपेपर्यंत कुठलाही सण उत्सव किंवा लग्नांचे सोहळे साजरे केले जात नाही. घराच्या बांधणीला ही सुरुवात करत नाहीत. 

भोंगऱ्या उत्सव

होळीचा दांडा रोवला की, परिसरात सगळीकडे होळीची तयारी सुरू होते.  दररोज रात्री खळ्यावर (मोकळ्या जागेत) ढोल-मांदल पावीचा सूर परिसरात निनादत असतो. होळीत नाचणारे बावा बुद्या, गेऱ्या, राय, काली पाव्वी (होळीची आचार संहिता) नित्यनियमाने पाळतात.  

या उत्सवामध्ये जे बावा बुद्या असतात, त्या व्यक्तिंना पाच दिवस उपवास पाळावा लागतो. खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. संपूर्ण अंगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा किंवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. 

होळीच्या 15 दिवस आधीपासून गेरची भूमिका वठवणारे व्यक्ति नृत्याच्या तयारीला सुरुवात करतात. या पारंपारिक लोकनृत्यासाठी लागणारी सामुग्री रानातूनच जमा केली जाते. नृत्यात सहभागी होणाऱ्या लोकांना गेर असं म्हटलं जातं. ही गेर लोकं घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात. जवळपास 15 दिवस सलग नृत्याचा सराव करतात. 

या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बुद्या, वन्य प्राणी, चेटकीण किंवा काली यांचा समावेश असतो. एका संघात जवळपास 20 ते 250 लोकांचा समुह नृत्य सादर करतात. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नृत्यात सहभाग घेतात.

काय असतो भोंगऱ्या बाजार

होळी सणा अगोदर येणारा आठवडा बाजार, हाट म्हणजे ‘भोंगऱ्या हाट’ असतो. सातपुडा पर्वतरांगामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या क्षेत्रात हा भोंगऱ्या बाजार खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये

मध्यप्रदेशमधले खेतिया, पानसेमल, बडवानी, झाबुआ, अलिराजपुर, महाराष्ट्रातील धडगांव, तोरणमाळ, फलाई, म्हसावद, गुजरात राज्यातील कवाठ, पावी जेतपूर, झाब, तेलवमाता आणि राजस्थान मधली काही क्षेत्रांचा समावेश आहे. 

या बाजारामध्ये परिसरातील लोक ढोल आणि मांदल घेवून एकत्र जमतात. होळीला लागणारं सगळं सामान या भोंगऱ्या परिसरात खरेदी करतात. या भोंगऱ्या आठवडी बाजारामध्ये लोकं आपापल्या नातेवाईकांना होळीचं आमंत्रण देतात. एकमेकांना पान खावू घालून आपुलकीने एकमेकांशी भेटीगाठी घेतात. 

भोंगऱ्या बाजाराशी संबंधीत लोकगीत

भोंगऱ्या बाजारा बाबत संतोष पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील आदिवासी पावरी भाषेतील ‘भोंग-यू ‘ कवितेत केलेलं भोंगऱ्याचे वर्णन पुढीलप्रमाणे : 

   ” गुलाल्यामा गुलाल उडाव्या 

     इन आट मा नाचणे आव्यू आमू भोंग-यू 

     आटवावा आट कोरताह

     ढूलो वाला ढुल वाजताह 

     मेवू फि-यू 

     पाटिल, कारभारी, ढायला, पु-या  

     बोठा नाचणे आव्या भोंग-यू “

भावार्थ :- गुलाल्यात गुलाल उधळवून होळीचा संदेश देत भोंगऱ्या हाटला सुरुवात होत असते. भोंगऱ्या बाजारात आलो आम्ही ढोल, पावी, मांदळ घेवून. लोकं होळीचा बाजार करत आहेत. ढोल वाजत आहे. वाजत गाजत मिरवणूक फिरत आहे. आसपासच्या गावातील पाटिल, कारभारी आले आहेत. म्हातारे तरुण-तरुणी सर्वच येतात. समतेने एकत्र नाचतात. गातात.

हे ही वाचा  : धुलीवंदनादिनी नाशिकची वीर दाजीबा बाशिंग परंपरा

भोंगऱ्या मेळा

भोंगऱ्या हाट मध्ये हाट बरोबर ढोल, मांदल ही पारंपारिक वाद्य घेवून दुपारी बारा एकच्या सुमारास सगळे एकत्र जमतात. वाजत गाजत मोठी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीला ‘मेवू’ म्हणजे मेळा असं म्हणतात. आसपासच्या परिसरातील शंभर दीडशेहून अधिक ढोल असतात. 

या भोंग-या हाटच्या मेळ्यात प्रथम फिरण्याचा मान विशेष रुतबा, सन्मान असलेल्या गावाकडे असतो. बाकी गावातील लोक या मुख्य गावातील लोकांच्या मागे फिरत असतात. गावातील कारभारी, पाटिल पंच आपल्या पारंपरिक पेहरावात असतात. हातात पारंपारिक वाद्य, शस्र आणि पळस फुलांचा गुच्छा, जांबळाची लहान लहान फांदी घेऊन गावकरी या मेळात नाचत असतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील 'नवापूर' हे रेल्वेस्थानक दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे. हे रेल्वे स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेले आहे. या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ