महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध आंब्याच्या जाती आहेत. यामध्ये हापूस हा सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. इतर जातींमध्ये पायरी, तोतापुरी, केसर, नीलम, मालगोवा, लंगडा आणि आम्रपाली यांचा समावेश होतो. भौगोलिक स्थितीनुसार आंब्याच्या खूप जाती आहेत. जातीनुसार आंब्याचा आकार, रंग आणि चवीमध्ये सुद्धा बदल असतो.
देशात आंब्याच्या उत्पादनात आणि निर्यातील महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातल्या हापूस आणि केसरी आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. अलिकडे जपानचा मियाझाकी हा आंबा सुद्धा त्याच्या रंगाच्या वैविध्यामुळे प्रसिद्ध झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हा आंबा आता फक्त जपानमध्येच नाही तर, आपल्या पुण्यातही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पुण्यात मियाझाकी आंब्याची लागवड
पुण्यातले फारुक इनामदार या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या देशातल्या आंब्यांची लागवड आपल्या शेतात केली आहे. दौंड तालुक्यातल वरवंड इथे त्यांची शेती आहे. या शेतामध्ये त्यांनी दूर्मीळ असलेल्या आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आंब्यांची लागवड केली आहे. यामध्ये जपानच्या मियाझाकी आंब्याचाही समावेश आहे.
इनामदार यांनी त्यांच्या 20 गुंठा जागेमध्ये जवळपास 120 आंब्यांची झाडं लावली आहेत. यापैकी 90 झाडं ही आंतरराष्ट्रीय जातीच्या आंब्यांची झाडं आहेत. तर तीस झाडं ही भारतातल्या आंब्यांच्या जातीची आहेत.
1.5 लाख रुपये किलो किंमतीचा मियाझाकी आंबा
इनामदार यांच्या या आंब्याच्या बागेतला सगळ्यात महागडा आंबा हा जपानचा मियाझाकी आंबा आहे. हा आंबा जपानमध्ये 2.7 लाख रुपये प्रती किलो दराने विकला जातो. तर भारतात या आंब्याची प्रति किलो किंमत ही 1.5 लाख रुपये आहे. महागड्या आंब्यांची किंमत ही प्रती किलो जास्तीत जास्त हजार रुपयांमध्ये असते. पण जपानच्या मियाझाकी जातीतल्या आंब्यांची किंमत ही थेट लाखामध्ये आहे. एका किलोमध्ये साधारण चार ते सहा आंबे येतात. एका आंब्याचं वजन हे जवळपास 300 ग्रॅम असतं.
हे ही वाचा : धनगराने शोधला मुंबई-पुणे महामार्ग!!
हज यात्रेतून मिळाली प्रेरणा
फारुक इनामदार यांना हज यात्रेतून देशोविदेशातले आंब्यांच्या जाती गोळा करण्याची प्रेरणा मिळाली. ते हज यात्रेला गेलेले तेव्हा तिथे वेगवेगल्या जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यांनी वेगवेगळ्या देशातून तिथल्या प्रसिद्ध आंब्यांची रोपे आयात केली आणि त्यांची लागवड करायला सुरुवात केली. दोन वर्षानंतर या रोपट्यांचं झाडामध्ये रुपांतर होऊन आंबे यायला सुरुवात झाली.
या वेगवेगळ्या जातींमध्ये रेड आफ्रिकन, रेड तैवान, अरुणिका, बनाना मॅंगो, ऑस्ट्रेलियातले ए2 आर2, बांगलादेशमधले काटोमोनी, शहाजहान आणि जपानच्या मियाझाकी अशा प्रसिद्ध आंब्यांच्या झाडांचा समावेश आहे.
‘कोयातूर’ जास्त उत्पादन देणारा आंबा
या वेगवेगळ्या आंब्यांच्या लागवडीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन हे कोयातूर जातीच्या आंब्यांपासून मिळत असल्याची माहिती इनामदार यांनी दिली. या आंब्यांची प्रती किलो किंमत ही दीड हजार ते 5 हजार रुपये असते.
आंब्यांची विक्री नाही
जगातल्या विविध जातीतल्या आंब्यांची लागवड करुन आता इनामदार यांना उत्पादन मिळत आहे. या आंब्यांना मागणी ही मिळत आहे. तरी यावर्षी एकही आंबा न विकण्याचा निर्णय इनामदार यांनी घेतला आहे. हे सर्व आंबे ते स्वत: साठी वापरायचे असं त्यांनी ठरवलं आहे. तसंच लागवडीचं क्षेत्र वाढवून आणखीन परदेशातल्या आंब्यांची लागवड करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे.