तुम्ही कधी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास केला असेल तर खंडाळा घाटात एका छोट्या मंदिरापाशी थांबला असालच. हे मंदिर आहे, हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगरांचं. पण कोण होते हे शिंग्रोबा? आणि त्यांच्या नावाने हे मंदिर का उभं आहे?
या मंदिरामागे थक्क करणारी आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या मेंढपाळाने बलिदान दिलं. चला तर मग, आज याच अज्ञात वीराची गोष्ट जाणून घेऊया.
बोरघाटातील मेंढपाळ आणि इंग्रजांची अडचण
बोरघाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर आणि कपारीत शिंग्रोबा नावाचा एक धनगर राहत होता. तो आपल्या मेंढ्यांना चरायला नेहमी याच भागात आणत असे. त्यामुळे त्याला या दऱ्याखोऱ्यांची, निसर्गाची आणि कड्याकपारींची अगदी खडा न् खडा माहिती होती. जमिनीच्या भुसभुशीतपणापासून ते कठीण खडकांपर्यंत, त्याला सगळं काही माहीत होतं.
1853 सालची ही गोष्ट आहे. इंग्रजांनी मुंबई ते ठाण्या पर्यंत असलेली रेल्वे लाईन पुण्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक समिती नेमली. ही समिती रेल्वे मार्ग कसा काढायचा, याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात आली. पण त्यांना काही केल्या पुढचा मार्ग सापडत नव्हता. हे लोक रोज यायचे आणि इकडे-तिकडे चाचपडत बसायचे. मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचे.
शिंग्रोबा झाडाच्या आडोशाला बसून रोज त्यांची ही मजा बघत असे. अखेरीस इंग्रज वैतागले आणि काम अर्धवट सोडून परत जाण्याच्या तयारीला लागले. जेव्हा इंग्रज परत जायच्या विचारात होते, तेव्हा शिंग्रोबाने त्यांना विचारले, ” मी तुम्हाला बघतोय, तुम्ही बऱ्याच दिवसापासून काहीतरी शोधताय. मी काही मदत करू शकतो का?”
इंग्रजांनी आपली अडचण त्याला सांगितली, “आम्हाला मुंबई-ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय. पण काही केल्या योग्य मार्ग सापडत नाहीये. म्हणून आता हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार आहे आमचा.”
हे ऐकताच शिंग्रोबा हसला, आणि म्हणाला एवढंच होय. या मी दाखवतो रस्ता तुम्हाला. इंग्रजांना हे ऐकून आश्चर्य आणि आनंदही झाला. ते शिंग्रोबाच्या मागे चालू लागले आणि शिंग्रोबाने त्यांना घाटावर जाण्याचा सोपा मार्ग दाखवला.
मार्ग सापडल्याचा आनंद इंग्रज कमिटीला झाला. आणि त्यांनी शिंग्रोबाला विचारले, “आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. तुला काय पाहिजे असेल ते माग, आम्ही तुला ते देऊ.”
शिंग्रोबाने विचार केला आणि म्हणाला,” मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!”
हे ऐकताच इंग्रज चवताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंग्रोबाचा घात केला. आणि स्वातंत्र्यासाठी एका धनगराचा बळी गेला. शिंग्रोबाने दिलेल्या माहितीच्या आधारे, इंग्रजांनी सह्याद्रीचे काळसर असे मोठं मोठे डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार केला आणि त्यावरून रेल्वेगाड्या डौलाने धावू लागल्या.
ज्या ठिकाणी इंग्रजांनी कपटाने शिंग्रोबाला मारले, त्या जागेवर 1929 साली एक मंदिरवजा स्मारक बांधण्यात आले. तेव्हापासून शिंग्रोबा हे धनगरांचे आधुनिक दैवत म्हणून प्रसिद्ध झाले. आजही या मंदिराविषयी अनेक रितीरिवाज आणि गोष्टी प्रचलित आहेत.
आजही देशावरून जेव्हा धनगर बांधव कोकणात मेंढ्या घेऊन उतरतात, तेव्हा शिंग्रोबाच्या मंदिरात ही लोकं मेंढीच्या पान्हातून थेट दुधाच्या धारेचा अभिषेक घालतात. मंदिरात तांदळा स्वरूपात शेंदुराने माखवलेला मोठा तांदळा आहे. आत त्रिशूल आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी ठेवलेली आहे.
नवी मुंबई-पुणे महामार्ग अस्तित्वात नव्हता, तेव्हा खंडाळा घाट चढताना एसटी बसेस आणि इतर गाड्या काही क्षणासाठी इथे थांबायच्या. त्यावेळी प्रत्येकजण आपल्या खिडकीतून बाहेर शिंग्रोबाला नाणे अर्पण करण्यासाठी धडपड करत असे. आजही अनेकजण या घाटातून प्रवास करताना थोडा वेळ थांबून शिंग्रोबाचे दर्शन घेऊनच पुढच्या प्रवासाला लागतात.
एका साध्यासुध्या मेंढपाळाने आपल्या देशासाठी दिलेल्या त्यागाची आठवण करून देणारे हे शिंग्रोबा मंदिर, बोरघाटातून प्रवास करताना आपल्याला निश्चितच एक वेगळी ऊर्जा देऊन जाते.