‘साहस’ या शब्दांची ऑक्सफर्ड शब्दकोशातली व्याख्या ‘an experience or event that is very unusual, exciting or dangerous’ अशी आहे. अर्थात विलक्षण थरारक किंवा धोकादायक असा अनुभव किंवा प्रसंग; साहस, धाडसी कृत्य. अर्थात ही झाली व्यावहारिक व्याख्या. प्रत्यक्ष आयुष्यात पेचप्रसंग निर्माण होऊन आयुष्य कसोटीला लागल्याने तावूनसुलाखून बाहेर पडलेले बावनकशी लोकही खरे साहसीच म्हणायला हवेत. आपल्या साहसवीराची कथा अशीच आहे.
अवघ्या चार वर्षांत नवनाथ झांजुर्णे ( वय 69) यांचं आयुष्य बदललं आणि कसं?? त्यांनी 30 किलो वजन कमी केलं आणि तब्बल 95 किलो वजन बाळगून असलेल्या थुलथुलीत शरीराचा अक्षरशः कायापालट करत हाफ आयर्नमॅनमध्ये सहभाग घेण्यापर्यंत प्रगती केली. हा प्रवास ‘मनात आलं आणि वजन कमी केलं’ असा सहज आणि लहरी नव्हता.
आयर्नमॅन म्हणजे नेमकं काय?
‘आयर्नमॅन’ हा फिटनेसच्या जगातला मोठा ब्रँड आहे. मूळची अमेरिकेतली ही कंपनी/संस्था आता जगभर विस्तारली आहे. आयर्नमॅन म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा असते. सुरुवातीला 3.9 किमी स्विमिंग, त्यानंतर कपडे बदलून 180.2 किमी सायकलिंग, त्यानंतर पुन्हा कपडे आणि शूज बदलून 42.2 किमी फुल मॅरथॉन, असा संपूर्ण 226.3 किमीचा प्रवास 16 ते 17 तासांत पूर्ण करणं अपेक्षित असतं. आणि यात ‘हाफ आयर्नमॅन’ असाही एक उपप्रकार असतो, ज्यात आयर्नमॅनच्या संपूर्ण क्रमानेच पण निम्मं अंतर पूर्ण करणं गरजेचं असतं. भारतात फक्त गोव्यात हाफ आयर्नमॅन स्पर्धा आयोजित केली जाते. उच्च प्रकारचा फिटनेस आणि तंदुरुस्तीचा मापदंड म्हणून आयर्नमॅनकडे बघितलं जातं.
निरोगी राहण्याच्या महत्त्वातून मॅरेथॉनकडे
कोव्हिडमुळे सगळं जग बंद पडलेलं असताना नवनाथ झांजुर्णे यांनी त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचे काही जीवलग मित्र गमावले. आणि त्या घटनेमुळे त्यांना साथीच्या काळात निरोगी राहण्याची गरज लक्षात आली. अतिरिक्त वजन आणि वयोमानामुळे होणाऱ्या व्याधी, उदा. गुडघेदुखी वगैरे त्रास त्यांना होत होते. वेदनांमुळे त्यांना चालता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यात आधी वजन कमी करत फिटनेस या एकमेव गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं.
जागतिक पातळीवर यश
2022 मध्ये कोल्हापुरातील बर्गमन ट्रायथलॉनमध्ये त्यांनी आपल्या परिश्रमाला दिशा मिळताना बघितलं. तिथे त्यांनी ‘हाफ आयर्नमॅन’ 10 तासांत यशस्वीरित्या पूर्ण केली. यामुळे उत्साह वाढून त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये तुर्कीमध्ये हाफ आयर्नमॅन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश मिळालं नाही. मात्र या जागतिक स्पर्धेच्या संयोजकांनी त्यांच्या प्रयत्नांना दाद म्हणून नवनाथ झांजुर्णे यांना स्पर्धेचे पदक आणि प्रमाणपत्र देऊन अधिकृत फिनिशर म्हणून जाहीर केलं.
90 किलोवरून 65 किलो वजन
या विजयासाठी झांजुर्णे यांचा मार्ग संघर्षाने भरलेला होता. तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर तुर्कस्तानमध्ये अपयशाला सामोरे जावे लागल्याने झांजुर्णे यांनी स्वतःची अपयशातून सुटका करण्याचा निर्धार केला. प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झांजुर्णे यांनी आपल्यातील उणीवा आणि कमकुवत बाजू ओळखून त्या सुधारल्या. प्रशिक्षक हेमंतसोबत नियमित जिम सेशन केल्याने त्यांना स्नायूंमध्ये पुन्हा नव्याने ताकद निर्माण करण्यास मदत झाली. 90 किलोवरून 65 किलोपर्यंत उतरवलेल्या वजनानेही त्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
बहरीनमधील स्पर्धेतील आव्हानं
28 नोव्हेंबर रोजी त्यांनी बहरीनमध्ये हाफ आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत 90km बाईक राइड, 21.1km धावणे आणि 1.9km पोहणे अशा सलग स्पर्धा होत्या. झांजुर्णे म्हणतात, “सायकल चालवताना मला जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागला आणि पोहताना पाण्याने भरलेल्या खड्डे अशा आव्हानांचा सामना करावा लागला. पण मी धीर धरला.” खुल्या विभागात 8 तास, 32 मिनिटे आणि 37 सेकंदात ही शर्यत 8 च्या कट ऑफ वेळेपेक्षा थोडी जास्त आहे. वाढलेले वय, लहानवयात अंगठ्याला झालेली दुखापत, वाकलेली कोपरं, गुडघ्याच्या समस्या आणि खांद्यावर शस्त्रक्रिया असूनही झांजुर्णे यांनी निर्धाराने ध्येयाचा पाठलाग केला. त्यांना त्यांच्या चिकाटीचे फळ मिळालं. कारण आता त्यांना भारतातील सर्वात ज्येष्ठ आयर्नमॅन म्हणून स्वतःचा अभिमान वाटतो.
तयारीसाठी कुटुंबियांची मदत
झांजुर्णे त्यांच्या अतुलनीय साहसाचे आणि कामगिरीचं श्रेय त्यांच्या कुटुंबाला देतात. त्यांची पत्नी उषा हिने त्यांच्या आरोग्याची खातरजमा करून काटेकोर चौरस आहाराची काळजी घेतली. त्यांचा मुलगा डॉ. राहुलने मानसिक तयारीसाठी मदत केली आणि त्यांना यश मिळवण्यासाठी स्वक्षमतेवर विश्वास ठेवण्यास जोरदार प्रोत्साहन दिलं.
झांजुर्णे यांची सून डॉ. स्मिता पाच वेळा आयर्नमॅनमध्ये सहभागी झाली आहे. सूनबाईंनी त्यांना नुसतं प्रोत्साहनच दिलं नाही तर बहरीनमध्ये त्यांच्यासोबत स्पर्धाही केली. अगदी त्यांच्या नातवंडांनी, सईबाई आणि शिवबा यांनी शर्यतीच्या वेळी हातात प्रेरणादायी फलक घेऊन फूटपाथवर त्यांच्याबरोबर काही अंतर धावत त्यांचा जयजयकार केला.
“स्पष्ट ध्येय आणि दृढनिश्चयाने यश मिळवता येते हा माझा विश्वास या स्पर्धेने दृढ केला आहे. या वयातही आणि मोठी शारीरिक आव्हानं असली तरी यश मिळवणं शक्य आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी तरुण पिढीला प्रेरित करताना मला आनंद होतो. माझं कुटुंब आणि प्रशिक्षक यांचा प्रयत्न आणि पाठिंबा अविस्मरणीय आहे.” असं झांजुर्णे यांना वाटतं.
समवयस्कांसाठी फिटनेस बुस्टर
आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन शर्यत पूर्ण करण्याचे त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आहे. झांजुर्णे यांना त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीनंतर विश्रांती घेण्याची इच्छा नाही. पुण्यात ते राहत असणाऱ्या हडपसर येथील हाउसिंग सोसायटीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मर्यादा, क्षमता ताणून फिटनेस साध्य करण्यासाठी ते प्रोत्साहन देत असतात. 69 व्या वर्षी आपण आयर्नमॅन शर्यत पूर्ण करू शकतो, तर इतर लोकही ते करू शकतात, असं झांजुर्णे यांचं सांगणं आहे. त्यांनी आता फुल आयर्नमॅनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.