‘मृच्छकटिकम्’ या संस्कृत नाटकात फार सुंदर वचन आहे. साहसे श्रीः प्रतिवसति! अर्थात साहसात लक्ष्मीचा निवास असतो. म्हणजेच ज्या व्यक्ती साहसी असतात, खंबीर निर्णय घेतात किंवा विपरीत परिस्थितीला कणखरपणे सामोरे जातात, त्यांना यश आणि समृद्धी मिळते. आजच्या आपल्या साहसवीराची कहाणी हे वचन सार्थ ठरवते. लोक शारीरिक अपंगत्व हे आव्हान मानतात. पण खरं अपंगत्व हे मनात असतं. जर आपण आपल्या मर्यादांना ताणू शकलो, तर आपण काहीही साध्य करू शकतो.
गोव्यातील 31 वर्षीय टिंकेश कौशिक हा समुद्रसपाटीपासून 17,598 फूट उंचीवर असलेल्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी बनला आहे. 11 मे 2024 रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणाऱ्या टिंकेशने शारीरिक अपंगत्व असूनही त्याच्या मानसिक बळामुळे हे यश मिळवलं.
नवव्या वर्षी गमावले दोन्ही पाय आणि एक हात
हरियाणातील झज्जर येथील टिंकेश नऊ वर्षांचा असताना पतंग उडवत होता. पण त्याचा पतंग वायरमध्ये अडकला आणि त्याला 11,000 व्होल्टचा धक्का बसला. ही धडक इतकी भीषण होती की, गुडघ्याखालील त्याचे पाय आणि कोपराच्या वरचा डावा हात कापावा लागला. टिंकेश सहा महिने हॉस्पिटलमध्ये होता. तरीही त्या दुःखद घटनेने टिंकेशला सामान्य आयुष्य जगण्यापासून रोखलं नाही. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील त्याच्या पालकांनी त्याला पूर्ववत बरं करण्यासाठी फार संघर्ष केला. त्याच्या कृत्रिम पायांसाठी निधी उभा करण्यात ते यशस्वी झाले आणि टिंकेशच्या स्वप्नांना त्यांनी आधार दिला.
पालकांचे प्रयत्न आणि आधार
खरंतर त्याच्या पालकांना सांगण्यात आलं होतं की तो जगण्याची शक्यता नाही. परंतु, त्यांनी असं काहीही ऐकण्यास नकार दिला. “या काळात माझे वडील आणि आई माझा सर्वात मोठा आधार होता. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच मला जिवंत ठेवलं आणि या अपघातातून वाचण्यास मदत केली,” टिंकेश सांगतो. तो त्याच्या नेहमीच्या रुटीनमध्ये परत यावा यासाठी त्याच्या कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले. तीन वर्षे टिंकेशला उपचार घ्यावे लागले. त्या काळात त्याची आई त्याला कडेवर घेऊन शाळेत घेऊन जायची. टिंकेश त्याच्या मित्रांसोबत खेळू शकत नव्हता किंवा त्याच्या वयाची इतर मुले करत तसा दंगा-मस्ती करू शकत नव्हता.
नोकरी मिळण्यास अडचणी ते फिटनेस कोच
पुढे 2015 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर, टिंकेशने एक वर्ष नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला,परंतु त्याला फारसं यश मिळालं नाही. सक्तीच्या निष्क्रियतेमुळे शारीरिक व्यायामाचा अभाव अर्थातच होता. परिणामी त्याचं वजन खूप वाढलं होतं. तेव्हाच त्याने आपल्या आरोग्यावर आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याचे प्रशिक्षक कमल शर्मा यांनी खरोखरच त्याला मानसिक आणि शारीरिक ताकद मिळविण्यात आणि त्याची क्षमता ताणून वाढवण्यास मदत केली. त्यानंतर त्याने मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि नेपाळमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि बंजी जंपिंग केलं. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने हे सर्व साध्य केलं!
ट्रेकिंगचा प्रवास
त्यानंतर तो गोव्यात आला आणि फिटनेस प्रशिक्षक म्हणून काम करु लागला. मग त्याने हिमालय पर्वताचं दर्शन घेण्याचं स्वप्न बघितलं. त्याला सुरुवातीला वाटलं की हा ट्रेक सोपा असेल कारण तो फिटनेस कोच आहे. पण जेव्हा त्यानी प्रत्यक्ष तयारी सुरू केली तेव्हा खरी आव्हानं जाणवली.
त्याला गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव नव्हता. बेस कॅम्पला जाण्यापूर्वी त्याने तयारी केली होती. तो सांगतो, “मी व्यवसायाने फिटनेस कोच आहे आणि मला वाटलं की माझ्यासाठी हा ट्रेक सोपा असेल. मी प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू केलं. पहिल्या दिवशी माझ्या कृत्रिम अवयवांसोबत खूप वेदना अनुभवल्या. मला ट्रेकिंग करणं फार आव्हानात्मक वाटलं. दुसऱ्या दिवशी मात्र मी निश्चय केला की, मला हा ट्रेक करायचाच आहे. आणि खरंच सांगतो, हा एक करता येण्याजोगा ट्रेक आहे. मध्येच एकदा माझी तब्येतही बिघडली होती. मला अक्यूट माऊंटन बाऊट (Sickness) होता. मात्र माझ्या मानसिक ताकदीमुळे तो ट्रेक मी पूर्ण करू शकलो.”
90 टक्के लोकोमोटर अपंगत्व असलेला पहिला ट्रिपल अँप्युटी ट्रेकर
ही मोहीम पूर्ण केल्यानंतर लगेचच त्याने त्याच्या Instagram हँडलवर पोस्ट केलं होतं : “आज 11 मे 2024 रोजी, मी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेकिंगचे आव्हान पूर्ण केले. 90 टक्के लोकोमोटर अपंगत्व असलेली पहिला ट्रिपल अँप्युटी म्हणून ही कामगिरी केली आहे.” त्याच्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता. तो म्हणतो, “मी ते माझ्यासाठी केलं आणि एका विशिष्ट कारणासाठी केलं. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद.”
कृत्रिम अवयव मिळवून देण्यास मदत
एक यशस्वी फिटनेस ट्रेनर,जो आता वयाच्या 31 व्या वर्षी ब्लेड रनर बनला, पॅरासायकलिस्ट, TEDxहैदराबाद स्पीकर, ॲथलीट ॲम्बेसेडर आणि अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे. टिंकेशने -‘टिंकेश ॲबिलिटी फाउंडेशन'(TAF) या त्याच्या फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून तो कृत्रिम उपकरणं किंवा कृत्रिम पाय आवश्यक असलेल्या लोकांना मदत करतो.
भारतात सर्वसमावेशक क्रीडाप्रणालीची आवश्यकता
TEDxHyderabad सारख्या प्लॅटफॉर्मचा भाग होण्याचा त्याला सन्मान मिळाला आहे. त्याला विश्वास आहे की त्याने आपली कहाणी शेअर करण्याची आणि अनेकांच्या आयुष्यात प्रभाव निर्माण करण्याची संधी या टॉकद्वारे मिळाली आहे. टिंकेशला मॉडेलिंग, अभिनय आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्याला असं वाटतं की अपंग लोकांकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. त्याला बॉलीवूडमध्ये काम करून पहायचं आहे. त्याला वाटतं की OTT प्लॅटफॉर्म ही एक चांगली सुरुवात असू शकेल. अपंगत्व म्हणजे असमर्थतता नाही, या वस्तुस्थितीचा तो पुनरुच्चार करतो. त्याला त्याच्यासारख्या गरजू लोकांना शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षित करण्यासाठी एक समावेशक क्रीडाप्रणाली तयार करायची इच्छा आहे. कारण आरोग्य आणि निरोगीपणाच्या बाबतीत ते जवळजवळ पूर्णपणे मागे राहिले आहेत, असंही त्याला वाटतं.