ठाण्याचे पारशी आणि कावसजी पटेल अग्यारी !  

Thane : ठाण्याच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रात भरघोस योगदान देणाऱ्या पारशी लोकांचे प्राचीन धर्मस्थान ठाण्याच्या केंद्रवर्ती भागात नव्या आकर्षक स्वरुपात उभे आहे.
[gspeech type=button]

आपला मायदेश सोडून हिंदुस्थानच्या आश्रयाला आलेल्या पारशी लोकांना गुजराथमधील स्थानिक राजाने विचारलं की, आमच्या विपुल लोकसंख्य़ेत तुम्हाला जागा कशी होणार ? तेव्हा पारशी लोकांनी दूधाने भरलेल्या ग्लासात साखर टाकली आणि उत्तर दिलं की, या दूधात विरघळून त्याची गोडी वाढवणाऱ्या साखरेसारखे आम्ही हिंदुस्थानात मिसळून जाऊ.

पोर्तुगिजांमुळे सोडलं ठाणं, ब्रिटिशांमुळं परतले

पारशी लोकांच्या या समरस होण्याच्या वृत्तीची प्रचिती मिळते आपल्या ठाण्यात. ठाण्याचा ऐतिहासिक वारसा समृध्द करण्यात पारशी लोकांचा वाटा फार महत्वाचा आहे. शिलाहारांच्या काळापासून श्रीस्थानक अर्थात ठाणे हे भरभराटीला आलेलं बंदर असल्याने इथे नाना धर्मांचे, समाजाचे, देशांमधले लोक येत-जात होते. त्यातले काही स्थायिक झाले. पोर्तुगिजांनी 16 व्या शतकात धर्मांतराचा वरवंटा फिरवला. तेव्हा ठाण्यातील पारशी लोकांनी ठाणे सोडून जाणं पसंत केलं असं सांगितलं जातं. पुढे 18 व्या शतकात ब्रिटिशांनी ठाणे मराठ्यांकडून जिंकून घेतलं आणि स्वतःचा कारभार सुरू केला. तोपर्यंत मुंबईच्या बेटांवर इंग्रजांनी आपला जम व्यवस्थित बसवला होता. आणि हा जम बसवताना त्यांना पारशी समाजातील कर्तबगार व्यक्तिंची मदत झाली होती. त्यामुळेच नव्याने ताब्यात आलेल्या ठाण्याचा कारभार पाहाण्यासाठी ब्रिटिशांनी मुंबईतल्या ‘कावसजी जहांगिर ’ या पारशी गृहस्थांना ठाण्यात नेमलं. कावसजी जहांगीरजी ठाण्याचे पटेल ( पाटील) म्हणून काम पाहू लागले.

ठाण्याचे ‘पाटील’ कावसजी जहांगीर

अशा प्रकारे सन 1774 मध्ये ठाण्यात पुन्हा एकदा पारशी समाजाचे लोक राहायला आले. कावसजी जहांगिरजी यांच्यावर पटेल म्हणून जकात गोळा करणे, सरकारी पैशांचा हिशोब ठेवणे आणि सार्वजनिक खर्च – रस्ते, दिवाबत्तीसाठी करणे याची जबाबदारी होती. त्या काळापर्यंत ठाण्यातील विणकरांचा व्यवसाय संपुष्टात आलेला होता. त्यामुळे शहराचे मुख्य उत्पन्न हे कोळी लोकांची मासेमारी हेच होते. पटेल या कोळ्यांकडून जकात पैशांमध्ये तसेच माशांच्या स्वरुपात ही वसूल करत असत. कावसजी ठाण्याचे पटेल झाल्यामुळे आणखी काही पारशी कुटुंबे ठाण्यात येऊन स्थायिक झाली.

हे ही वाचा: ठाण्यातील ज्यू समाजाचे प्रार्थना मंदिर – ‘शाआर हाशामाइम’

अग्यारीत अठराव्या शतकापासून ‘अग्नी’ तेवत

या सगळ्यांच्या उपासनेची, धार्मिक कृत्ये करण्याची सोय व्हावी म्हणून कावसजींनी पुढाकार घेऊन, स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करुन सन 1780 मध्ये ठाण्यात पारशी लोकांची ‘अग्यारी’ बांधली. अग्निपूजक असलेल्या पारशी लोकांसाठी त्यांच्या प्रार्थनामंदिरातील प्रज्वलित अग्निचे महत्व अनन्यसाधारण असते. ठाण्याच्या अग्यारीमध्ये पवित्र अग्नि प्रज्वलीत करण्यासाठी गुजराथमधील उदवाडा येथिल भारतातील सर्वात प्राचीन अग्यारीमधून अग्नि आणण्यात आला होता. तेव्हा म्हणजे 245 वर्षांपूर्वी विधिवत प्रज्वलीत केलेल पवित्र अग्नी आजही ठाण्याच्या कावसजी पटेल अग्यारीमध्ये जळतो आहे. सन 1843 मध्ये या अग्यारी शेजारीच ‘ओट्ला’ म्हणजे समाजगृह बांधण्यात आले. पुढे 1929 मध्ये या समाजगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

पहिल्या निवडणुकीतील लोकप्रतिनिधी

कावसजींनी अग्यारी बांधली तेंव्हा ठाण्यात अगदी मोजके पारशी राहात होते. सन 1881च्या जनगणनेनुसार ठाण्याची लोकसंख्या होती 14,456 आणि त्यात पारशी होते 260. मात्र संख्येने कमी असूनही पारशी समाज ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा वर्तुळात मिसळून गेल्याचे पाहायला मिळते. सन 1863 मध्ये ठाण्याची नगरपालिका स्थापन झाली. तेव्हा पहिल्या कमिशनर्स(सभासद)मध्ये रुस्तमजी कावसजी, दादाभाई होमरसजी यांचा समावेश होता. तसेच 1885 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत मतदानातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये नसरवानजी बमनजी हे होते. त्यानंतर बमनशा तारापोरवाला यांनी ठाणे नगरपालिकेचे अध्यक्षपदही भूषविले.

पहिली इंग्रजी शाळा, रुग्णालय आणि पहिले सभागृह

टेंभीनाक्यावर ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी शाळा सन 1821 मध्ये सुरू झाली. पुढे या शाळेला बैरामजी जिजिभाई यांच्या ट्रस्टने देणगी दिली आणि ही शाळा बि.जे.हायस्कूल म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ठाण्यातील टेंभीनाक्यावरील ‘वाडिया हॉस्पिटल’ सन 1865 मध्ये सुरू झाले ते रुस्तमजी आर्देसर वाडिया यांनी दिलेल्या देणगीमधूनच. 1929 मध्ये ठाण्यातील खानबहादूर बापुजी कावसजी दिवेचा यांनी लोकांसाठी म्हणून कलेक्टर ऑफिससमोर सभागृह बांधायला घेतले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नंतर ते काम त्यांच्या वडिलांनी कावसजी बैरामजी दिवेचा यांनी पूर्ण केले आणि ठाण्याला ‘टाउन हॉल’ मिळाला.

हे ही वाचा : ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर

अग्यारीच्या पुनर्बांधणीसाठी रहिवाशी इमारत

काळाच्या ओघात कावसजी पटेल यांनी बांधलेली अग्यारी जुनी झाली. त्यामुळे नवी इमारत बांधणे गरजेचे होते. मात्र नव्या इमारतीसाठी निधी गोळा करणे सोपे नव्हते. त्यासाठी अग्यारी भोवती असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग करण्यात आला. 1993-94 मध्ये या जागेवर पारशी समाजातील लोकांसाठी ‘पटेल अपार्टमेंट’ ही दहा मजली इमारत उभी राहिली. जोडीला ‘माझदा कॉम्प्लेक्स’ हे व्यापारी संकुल उभारण्यात आले. त्यामुळेच अग्यारी पुनर्बांधणी प्रकल्पाला चालना मिळाली. 2014 मध्ये नव्या रुपातली अग्यारी उभी राहिली. मात्र अजून ‘ओट्ला’ नव्या रुपात बांधायचा बाकी आहे.

ठाण्याच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रात भरघोस योगदान देणाऱ्या पारशी लोकांचे प्राचीन धर्मस्थान ठाण्याच्या केंद्रवर्ती भागात नव्या आकर्षक स्वरुपात उभे आहे. या अग्यारीमुळेच समोरच्या रस्त्याला ‘अग्यारी लेन’ असे नाव मिळाले आहे. ठाण्याच्या वारसा स्थानांपैकी एक महत्वाचे स्थान म्हणून कावसजी पटेल अग्यारी ओळखली जाते.

5 Comments

  • Deepak Mandke

    Great ; nice itihas of Thane

  • Smita joshi

    अभ्यासपूर्ण माहिती

  • चंद्रशेखर तारे.

    उत्तम माहीती.

  • चंद्रशेखर तारे.

    उत्तम माहीती.

  • सुरेश घाडगे.

    छान माहिती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

5 Responses

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी हे प्रा. संतोष राणे
Thane : आंबेडकरी समाजासाठी 14 एप्रिल ही नुसती दररोजच्या धबडग्यातली एक तारीख नसून हा एक लाखमोलाचा दिवस असतो. रोजघडीच्या कामातून
सन 1832 मध्ये मद्रासमध्ये आणि 1851 मध्ये रुरकी येथे छोटा लोहमार्ग सुरू करुन, त्यावरुन बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांची वाहतूक सुरू झाली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ