ठाणे स्टेशनजवळचं डॉ. भानुशाली ह्यांचं हॉस्पिटल आणि आलोक हॉटेल ह्यांच्या बरोबर मध्यभागी त्या जुन्या काळात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता. ठाणे स्टेशनातून पश्चिमेकडे निघालो की सुरूवातीलाच हा पुतळा चटकन दिसायचा. त्यावेळीठा ण्यात आजच्याइतकी दाट लोकवस्ती नव्हती. रहदारी नव्हती. वाहनांची वर्दळही नव्हती.
पुर्वी इथेच ठाण्याच्या कानाकोपऱ्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तमाम अनुयायी 13 एप्रिलच्या रात्री बारा वाजता एकत्र यायचे. ठाण्यातल्या हजारोंचा तांडा तेथे जमायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचे. मेणबत्ती प्रज्वलित करायचे. मानवंदना द्यायचे. ते मोठं धीरगंभीर वातावरण असायचं. आपल्या समाजाला ताठ मानेने जगण्याचा मानवाधिकार आणि सन्मान मिळवून देणाऱ्या विश्वविख्यात क्रांतिकारकाच्या प्रति असलेला तो आदरभाव असायचा. तोपर्यंत 14 एप्रिल उजाडलेलं असायचं. डॉ. आंबेडकर जयंतीला ठाण्यात तिथून सुरूवात व्हायची. तिथून बाबासाहेबांचे हे अनुयायी ठाण्यातल्या आपल्या राहत्या ठिकाणी जायचे आणि तिथे मग त्यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा व्हायचा.
उत्सवाचं वैचारिक रूप
आंबेडकरी समाजासाठी 14 एप्रिल ही नुसती दररोजच्या धबडग्यातली एक तारीख नसून हा एक लाखमोलाचा दिवस असतो. रोजघडीच्या कामातून बाबासाहेबांचं विशेष स्मरण, विशेष चिंतन करण्याचा दिवस असतो. त्यावेळी ठाण्यात काही ठिकाणी सभा व्हायच्या, व्याख्यानं व्हायची. विषम जातीची समाजरचना समूळ नष्ट व्हावी आणि त्या ठिकाणी समतेवर आधारलेला समाज निर्माण व्हावा, अशा आशयाची त्यातून भाषणं व्हायची. त्यासाठी ठाण्यातली सगळी भावकी जमा व्हायची.
बाबासाहेबांच्या अशाच एका जयंतीला बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या शंकरराव खरात ह्यांनी बाबासाहेबांच्या आठवणींचा जागर सर्वांसमोर अतिशय ओघवत्या शैलीत मांडला. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक घटना, गोलमेज परिषद, पुणे करार, धर्मांतराची घोषणा, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा असे बाबासाहेबांच्या जीवनातले वेगवेगळे विषय उलगडून दाखवले. त्यांच्या भाषणाने तेव्हा बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांच्या जीवनसंदेशाची जणू ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या ह्या भाषणाने सर्वांना इतकं खिळवून ठेवलं की त्यांनी भाषणाचा समारोप करायला घेतला तेव्हा समोरच्या श्रोत्यांनी त्यांना बोलत राहण्याची विनंती केली.
आंबेडकर रोडवरचा उत्सव
अर्थात, ठाण्यात तेव्हा आंबेडकर जयंती जोरदार साजरी व्हायची ती खोपटकडून सरळ रस्ता जाणाऱ्या पुढच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर. तिथल्या शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा पदस्पर्श झाला असल्याचं इथले जुनेजाणते लोक सांगतात. त्यात इथे बाबासाहेबांच्या अनुयायांची दाट वस्ती असल्यामुळे ह्या ठिकाणी आंबेडकर जयंतीला उत्साहाचा महापूर येतो. इथली जयंती एका दिवसापुरती नसते. ती सलग तीन दिवस चालते. कोणे एके काळी तिथले नगरसेवक रमेश पंडीत ह्यांच्या पुढाकाराने जयंती साजरी व्हायची. त्याच एका काळात इंदुमती खांबे ह्यांचा ठाण्यातल्या सामाजिक क्षेत्रावर ठसा होता. त्या जवळच्याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीला होत्या. त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजकार्याची आठवण ठाण्यातल्या जनतेला आजही आहे. पुढे त्यांचे चिरंजीव सुनील खांबेंनीही ह्या जयंतीत हिरीरीने सहभाग घेतला आणि आंबेडकर रोडवरच्या ह्या जयंतीची परंपरा पुढे नेली.
आंबेडकर रोडवरची ही जयंती साजरी होताना तीन दिवस तिथे वेगवेगळ्या स्पर्धांची रेलचेल असते. गाण्यांचा-पोवाड्यांचा जलसा होतो. पुर्वी तिथे कव्वाल्यांचा सामना व्हायचा. एकमेकांबरोबर गाण्याचा जंगी मुकाबला झडायचा. मध्यरात्र उलटून गेल्यावरही ह्या जंगी जलशासाठी लोक मोठ्या संख्येने हजर असायचे.
आंबेडकर जयंती चे बदलत रूप
आज मात्र ठाण्यातल्या आंबेडकर जयंतीचं स्वरूप बऱ्याच अंशी बदललं गेलं आहे. तसं ते सगळीकडे बदललं आहे. पुर्वी ठाण्यात आंबेडकर जयंती साजरी होताना ध्वनीक्षेपक म्हणजे लाउडस्पीकर्स लावले जायचे. आज मात्र डीजे लावले जातात. फटाक्यांची आतषबाजी होते. डीजेचा आवाज आसमंत व्यापून राहतो. पुर्वी ह्याचं स्वरूप इतकं आवाजी नसायचं. अर्थात, आज नव्या पिढीचं नवं राज्य आहे हे ह्यानिमित्ताने समजून घ्यायला हवं!