नाटक हे मराठी माणसाच्या जीवनातलं मानाचं पान आहे. जगाच्या पाठीवर मराठी माणूस कुठेही राहायला जावो, तो नाटकासाठी जीव टाकल्याशिवाय राहणार नाही. ठाण्यात सुरूवातीच्या काळात राम गणेश गडकरी रंगायतन अस्तित्वात नव्हतं आणि मासुंदा तलाव उघडाबोडका होता. तेव्हा ठाण्यातला मराठी माणूस नाटक बघण्याशिवाय स्वस्थ बसला नाही. तो तेव्हा मो. ह.विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रात्रीचे नाट्यप्रयोग बघायला गर्दी करू लागला.
खुल्या मैदानात खुर्च्या आणि पुठ्यांवर नंबर
अर्थात, ह्या दोन शाळांमध्ये बंदिस्त हॉल वगैरे नव्हता. होतं ते खुलं मैदान. शनिवारी रात्री किंवा मग एखाद्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे नाट्यप्रयोग व्हायचे. शनिवारी शाळा संध्याकाळी सहाऐवजी दुपारी तीन वाजता सुटायच्या. त्यानंतर तिथे ट्रकमधून खुर्च्या आणल्या जायच्या, त्या उतरवून शाळेच्या मैदानात रांगेत लावल्या जायच्या. त्यावर नंबराचे पुठ्ठे लावले जायचे. एक नाटकाचा प्रयोग होण्यासाठी तेव्हा हा इतका द्राविडी प्राणायाम करायला लागायचा. पण ठाण्यातली नाटकवेडी माणसं आपली नाटकाची भूक भागवण्यासाठी हा द्राविडी प्राणायाम आनंदाने सहन करायची.
नाटकाची भूक भागवायला मुंबईवर अवलंबून
कोण होती तेव्हाची ही नाटकवेडी माणसं? एक होते घंटाळीतले रमेश मोरे आणि दुसरे होते श्रीरंग सोसायटीतले जयंत कोल्हटकर. रमेश मोरे ठाण्यातल्या एक्स्लो कंपनीत नोकरीला होते तर जयंत कोल्हटकर ठाण्यातल्याच सॅन्डोज ह्या फार्मासिटीकल कंपनीत. त्यांचं नाटकांवर फार प्रेम होतं. त्यावेळी मुलूंडचं कालिदास नाट्यगृहंही नव्हतं. ठाण्यातल्या नाटकवेड्या माणसाला आपली नाटक पहाण्याची हौस भागवण्यासाठी तेव्हा दादरचं शिवाजी मंदिर आणि प्रभादेवीचं रवींद्र नाट्यमंदिर ह्याशिवाय दुसरा आधार नव्हता. ठाण्यातल्या नाटकवेड्या माणसाला रेल्वेने ही दोन नाट्यगृहं गाठण्याची सर्कस करणं परवडणारंही नव्हतं आणि ते तसं वेळखाऊही होतं. गिरगावात साहित्य संघ मंदिरही होतं. पण गिरगावातून ठाण्यात राहायला आलेल्या माणसालाही तिथे नाटक पहाणं म्हणजे दुर्गम भागात प्रवास करण्यासारखं होतं. नाटकवेड्या ठाणेकरांच्या मनातली ही खंत रमेश मोरे आणि जयंत पाटील ह्यांनी जाणली आणि ठाण्यातल्या शाळांमधल्या मैदानांवर नाटकं सुरू केली.
हे ही वाचा : ठाणे स्टेशन – गोदाम ते सॅटिस!
नाटकाचे बॅनर 15 दिवस आधी स्टेशनला, गणपुले स्पोर्टसमध्ये तिकिट विक्री
ह्या नाटकांची जाहिरात तेव्हा वर्तमानपत्रांत नाटकाचा प्रयोग होण्याच्या तीन-चार दिवस आधी झळकायची. पण त्याच्या पंधरा-वीस दिवस आधी त्याचे बॅनर ठाणे स्टेशन किंवा मोक्याच्या ठिकाणी लागायचे. नाटकाची तिकिटविक्री ठाणे स्टेशनजवळच्या गणपुले स्पोर्ट्स ह्या खेळाचं साहित्य विकणाऱ्या दुकानात केली जायची. तेव्हा टीव्ही एकतर प्रत्येकाच्या घरात प्रकट झालेला नव्हता. प्रकट झालेला असलाच तर तो एकच एक चॅनेल मिरवणारा टीव्ही काळ्या आणि पांढऱ्या ह्या दोनच रंगातला होता आणि तो संध्याकाळी सुरू होणारा होता. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की, तेव्हा मनोरंजनाच्या दुनियेला प्रचंड मर्यादा होत्या. त्याचा परिणाम मराठी माणसाला नाटक हे पुस्तकाच्या पानात जपलेलं मोरपीस वाटण्यात व्हायचा.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
साहजिकच, ठाण्याच्या शाळांत होणाऱ्या ह्या नाटकांचे प्रयोग तिकीटबारीवर जराही मार खायचे नाहीत. नाटकाच्या तिकीटांना तुफान मागणी असायची. काशिनाथ घाणेकर, रमेश देव, निळू फुले, श्रीराम लागू, आशालता वाबगावकर, आशा काळे, बाळ धुरी, प्रभाकर पणशीकर, पद्मा चव्हाण, बाळ कोल्हटकर ही तेव्हा लोकप्रिय नटमंडळी असायची. गुंतता ह्रदय हे, सुर्यास्त, तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले, जंगली कबुतर, छिन्न, लग्नाची बेडी, देव दीनाघरी धावला, तो राजहंस एक, वाहतो ही दुर्वांची जुडी ही नाटकं तेव्हा लोकांचा जीव की प्राण असायची. काशिनाथ घाणेकर हे तर तेव्हा लोकप्रियतेच्या इतक्या शिखरावर होते की नाटक संपल्यावर लोकांचा त्यांच्याभोवती प्रचंड गराडा पडायचा.
हे ही वाचा : सिनेमा पहाणारं ठाणं!
शिवसेना प्रचारसभेत नाट्यगृहासाठी बाळासाहेबांना ठाणेकराची चिठ्ठी
…पण पुढे ठाण्यातल्या नाट्यरसिकांची नाट्यगृहाबद्दलची वानवा संपली. कारण मासुंदा तलावाच्या काठावर राम गणेश गडकरी रंगायतन ही देखणी वास्तू उभी राहिली. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असताना हे गडकरी रंगायतन उभं राहिलं. गावदेवी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची सभा असताना एका ठाणेकरांनी त्यांना व्यासपीठावर चिठ्ठी पाठवली, ज्यात त्याने ठाणेकरांसाठी एक नाट्यगृह हवं असल्याची गरज बोलून दाखवली. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणात त्याचा खास उल्लेख केला. शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर सर्वात प्रथम शिवसेनेच्या हातात सत्ता कुणी दिली असेल तर ती ठाण्याच्या जनतेने, असं शिवसेनाप्रमुखांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक म्हटलं. आणि पुढे ठाण्यात ठाणेकरांसाठी एक सुंदर, आलिशान नाट्यगृह उभारण्याचं जाहीर वचन दिलं.
गडकरी रंगायतनची उभारणी
काही काळात नाट्यगृह उभारण्यासाठी जागेची निवड करण्यात आली. तेव्हा सतिश प्रधान हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्याच कारकिर्दीत हे नाट्यगृह आकाराला आलं. 1977-78 च्या सुमारास ह्या नाट्यगृहाचा पडदा खुला झाला तेव्हा त्याच्या उद्घाटनाला स्वत: शिवसेनाप्रमुख आले. ठाणेकरांनी आमच्याकडे ह्या नाट्यगृहाची मागणी केली आणि त्या मागणीबरहुकूम आम्ही हे नाट्यगृह तुमच्या हाती सुपूर्द केल्याचं त्या भाषणात म्हटलं…आणि त्यानंतर ह्या नाट्यगृहात मराठी नाटकं, गीतसंगीताच्या मैफली सादर होऊ लागल्या.
रंगायतनचा आकर्षक पडदा
ह्या नाट्यगृहाचा मखमली पडदा महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही नाट्यगृहातल्या पडद्यांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारे बनवण्यात आला. गडकरी रंगायतनचं तो खास आकर्षण ठरला. नटवर्य काशिनाथ घाणेकरांचं एक चरित्रात्मक पुस्तक बाजारात आलं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ म्हणून गडकरी रंगायतनच्या ह्या मनमोहक पडद्याचं खास छायाचित्र छापण्यात आलं होतं.
मो.ह. विद्यालयाची रिहर्सल रूम होतकरूंकरता
गडकरी रंगायतन झालं आणि एक मात्र झालं. मो. ह. विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल ह्या दोन शाळांमध्ये होणाऱ्या नाटकांचे ते दिवस संपले. तिथल्या मैदानातल्या नाटकांचं एक पर्वच संपलं. गडकरी रंगायतन झाल्यामुळे तिथली रिहर्सल रूम ठाण्यातल्या होतकरू रंगकर्मींना आपला नाट्याविष्कार दाखवण्यासाठी सहजपणे उपलब्ध होऊ लागली. ठाण्यात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा तिथे होऊ लागल्या. कलासरगम, मित्रसहयोग, आदर्श मित्रमंडळ, संस्था मुलुंड वगैरे नाट्यसंस्थांकडून उत्तमोत्तम नाटकं गडकरी रंगायतनच्या रंगमंचावर सादर होऊ लागली.
हे ही वाचा : …हे ठाणं त्यांचं नाही!
ऑर्केस्ट्रांना रंगायतनमध्ये मज्जाव
तो एक ऑर्केस्ट्राचाही जमाना होता. प्रमिला दातारांचा सुनहरी यादें, महेशकुमार ॲन्ड हिज पार्टी, मेलडी मेकर्स, विनोद गिध ह्यांचा झंकार, कलाकार असे गीतसंगिताचा नजराणा घडवून आणणारे ऑर्केस्ट्रे सादर होऊ लागले. एकदा 31 डिसेंबरच्या रात्री असाच एक ऑर्केस्ट्रा रंगात आला असताना ठाणेकरांच्या रसिकतेला डाग लागावा असा प्रकार घडला. काही लोक त्या गाणंबजावण्याची मजा घेत असताना अचानक खुर्च्यांवर उभे राहून नाचू लागले. त्या गडबडीत काही खुर्च्यांची नासधुस झाली. त्यामुळे काही काळ गडकरी रंगायतनमध्ये ऑर्केस्ट्रांना मज्जाव करण्यात आला.
पुढे ठाण्याचा विस्तार होऊ लागला तसं ठाण्याच्या वैभवात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची भर पडली आणि गडकरी रंगायतनसोबत हे नाट्यगृहही ठाणेकरांची नाट्यसेवा करू लागलं. ठाणेकरांच्या नाट्यसेवेत तो निश्चितच आणखी एक मानाचा तुरा ठरला.