शिलाहारांची राजधानी असलेलं ठाणे शहर हे त्या काळातलं भरभराटीला आलेलं बंदर होतं. नंतरच्या काळातही सागरी मार्गावरचं शहर हीच ठाण्याची ओळख होती. अगदी 18 व्या शतकात ब्रिटिशांनी ठाण्यावर आपलं शासन सुरू केलं, तेव्हाही ठाण्याच्या किनाऱ्यावरून माल आणि प्रवासी वाहतूक होत असे. मुंबईहून ठाण्यात यायला सोयीचा मार्ग जलमार्गच होता. एका बाजूला खाडीचा किनारा आणि दुसऱ्या बाजूला येऊरचा डोंगर अशा भौगोलिक रचनेमुळे ठाण्यातून बाहेर – मग कोकणात किंवा देशावर कुठेही जायचे असेल तरी खाडी ओलांडावीच लागायची. त्यामुळेच ठाण्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने वाट मिळाली ती 1853 मध्ये रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर.
कळवा पूलामुळे ठाणं जोडलं कोकण आणि देशाशी
मात्र रेल्वेमार्गाने जरी ठाणे शहर बाहेरच्या जगाशी जोडलेलं असलं तरी, ठाण्याहून कळव्याला जायचं झालं तर तेंव्हा होडी किंवा तर (तराफा) याचाच पर्याय उपलब्ध होता, कारण 1853 साली ब्रिटिश सरकारने ठाण्याच्या खाडीवर कल्याणच्या दिशेने रेल्वेमार्गासाठी पूल बांधला पण अन्य वाहनांसाठी असा पूल नव्हता. रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी ठाणे आणि कळवा यांना जोडणारा पहिला पूल बांधण्यात आला. या कळवा पूलामुळे खऱ्या अर्थाने ठाणे शहर कोकणातील गावांना आणि देशावरील गावांना जोडलं गेलं.

कळवा पूलाचा खर्च रु.1,68,864/-
सन 1882 मध्ये प्रसिध्द झालेल्या ठाण्याच्या पहिल्या गॅझेटियरमधील नोंदीनुसार या पुलाच्या बांधणीसाठी तेंव्हा रु.1,68,864/- इतका खर्च आला होता. हा खर्च लोकल फंडातून करण्यात आला होता. तेव्हा बांधलेला पूल 300 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद होता. तेंव्हा ठाणे-मुंबईत तर सोडाच पण आख्ख्या भारतात मोटार कार आलेली नव्हती, त्यामुळे बैलगाडी, टांगे, बग्गी, छकडा, धमण्या यांचीच काय ती वाहतूक या पुलावरुन होत असणार. हा पूल नव्हता तेव्हा ठाण्याहून कळव्याला जाण्यासाठी मचवे, शिडाच्य़ा होडीचा वापर केला जात असे. हा पूल बांधल्यामुळे ठाण्याहून कळवा, भिवंडी, कल्याण, पनवेल, खोपोली, पुणेपर्यंत जाण्याचा जवळचा रस्ता निर्माण झाला.
हेही वाचा – ठाण्यातील पहिली सरकारी इंग्रजी शाळा : बी.जे.हायस्कूल
सध्याचा पूल शंभर वर्षांहूनही जुना
पुढे सुमारे सदतीस वर्षांनंतर सन 1914 मध्ये विठ्ठल सायन्ना यांनी या पुलाचे नूतनीकरण केले आणि पुलाचे आयुष्य वाढवले. आज जो जुना कळवा पूल म्हणून ओळखला जातो तो विठ्ठल सायन्नांच्या कामामुळेच शंभराहून अधिक वर्षे वाहतुकीचा भार सक्षमपणे पेलू शकला. या पुलाच्या एकूण चौदा कमानी आहेत. मधली मुख्य कमान आकाराने सर्वात मोठी आहे आणि तिच्यावर बुरुजासारखा भाग बांधलेला आहे. ब्रिटिशराजमध्ये बांधलेल्या लोकोपयोगी वास्तूंमध्ये हा पूल सर्वात महत्वाचा मानला जातो. या पुलाने ठाण्याच्या इतिहासातील काही अविस्मरणीय क्षण नक्कीच अनुभवले आहेत. सन 1930 मध्ये घणसोलीत जो मिठाचा सत्याग्रह झाला, त्यात गोऱ्या सोजिरांच्या लाठ्या-काठ्यांनी जखमी झालेले सत्याग्रही याच पुलावरुन घणसोलीच्या मिठागरातले मीठ घेऊन ठाण्यात आले असतील.
नारळी पौर्णिमेची थाटामाटातली जत्रा
स्वातंत्र्योत्तर काळात या पुलावर भरणारी नारळी पौर्णिमेची जत्रा आणि दरवर्षी अश्विन शुध्द प्रतिपदेला वाजत गाजत थाटामाटात येणारी टेंभी नाक्यावरच्या देवीची मिरवणूक आता जुन्या ठाणेकरांच्या आठवणीचा हिस्सा बनून राहिली आहे.139 वर्षे ठाण्याच्या वाहतुकीचा भार वाहिल्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये या ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक कायमची थांबवण्यात आली. आता हा इतिहासाचा साक्षिदार त्याच्या अंगावर वाढणाऱ्या झाडा झुडपांसह निवांत उभा असतो, त्याच्या खालून वाहणाऱ्या खाडीतून फक्त पाणीच नाही तर काळ वाहून गेलाय.
दोन नव्या पुलांनी घेतली जुन्या पुलाची जागा
1995 मध्ये कळवा खाडीवर नवा पूल बांधण्यात आला. त्यानंतर सुमारे एकवीस वर्षांनी पहिल्या पुलावरील सर्व वाहतूक पूर्ण थांबवण्यात आली. मात्र झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमुळे हा नवा पूलही अपुरा पडू लागल्याने, वारंवार होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी या परिसरात तिसरा पूल बांधण्याच्या हालचाली 2014 पासूनच सुरू झाल्या. शासकीय पध्दतीने (?) ही योजना मार्गी लागायला सुमारे आठ-नऊ वर्षे लागली आणि आधुनिक पध्दतीचा नवा कळवा पूल 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. या नव्या पुलांमुळे सगळ्यात पहिला बांधलेला पूल मात्र दुर्लक्षित ठरला आहे. तो वाहतुकीसाठी उपयोगी नाही पण हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून त्याची निगा राखायला हवी. त्याच प्रमाणे त्याची डागडूजी केल्यास नारळी पौर्णिमेसारख्या उत्सवांना तो पूल वापरता येऊ शकेल. अर्थात ही कल्पकता आणि उत्साह शासन दाखवणार का?
2 Comments
शासन दप्तरी याची नक्कीच दखल घेणे गरजेचे आहे, जेणेकरून नारळी पौर्णिमेसारख्या उत्सवांना तो पूल वापरता येऊ शकेल व ब्रिटिशराजमध्ये बांधलेल्या लोकोपयोगी वास्तूंमध्ये पुलाची ओळख कायम राहील.
उषा तांबे यांनी कळवा पुलाची काही माहिती त्यांच्या “काँक्रीटचे किमयागार” ह्या पुस्तकात लिहिली आहे.