एक प्राध्यापक हा युवकांमधील सळसळत्या रक्ताची गरज ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याचं भविष्य घडवत असतो, असं म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील अशाच अनेक युवकांना ज्यांचे मार्गदर्शन लाभले आणि ज्यांच्यामुळे आज विविध व्यक्तीमत्त्व घडली. इतकेच नव्हे तर ठाण्यासह राज्यभरातील लेखकांना ज्यांनी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले ते व्यक्तीमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. संतोष लक्ष्मण राणे. साहित्यिक आणि शैक्षणिक विश्वातील ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य नाव असणा-या प्रा. डॉ. संतोष लक्ष्मण राणे यांच्याविषयी जाणून घेऊयात.
प्रा. डॉ. संतोष लक्ष्मण राणे हे ठाणे शहरातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. ते एक कुशल प्राध्यापक, साहित्यसेवक, प्रकाशक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघर्ष, समर्पण आणि ज्ञानाची कास धरून समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
जन्म आणि बालपण
1972 साली मुंबईतील सांताक्रूझ इथे संतोष राणे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते आणि त्यांनी संतोष यांच्यात बालपणापासूनच वाचनाची आवड रुजवली. संतोष राणे यांचे प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेतच झाले. मुंबईतील बैठ्या चाळीत वाढताना त्यांनी शेजारच्या ग्रंथालयाचे सभासदत्व घेतले आणि पुस्तकांशी मैत्री केली. गिरण्यांचा संप झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी हार बनवणे, लॉटरीची तिकिटे विकणे, अगरबत्ती विकणे अशा विविध कामांमध्ये हातभार लावला. त्यामुळे परिस्थितीची जाण असणा-या संतोष राणे यांचा सामाजिक बदलांशी जवळचा संबंध आला.
हेही वाचा- मनकवडे जादूगार डॉ. आनंद नाडकर्णी
शिक्षण आणि कारकीर्द
संतोष राणे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि मुंबई विद्यापीठातून ‘एमए’ पूर्ण केले. सेवासदन, उल्हासनगर इथून ‘बीएड’ केल्यानंतर 1997 साली ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला. ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरी वृत्तपत्रातील निवडक अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
शारदा प्रकाशन: साहित्यसेवेची नवी दिशा
प्रा. राणे यांनी ‘शारदा प्रकाशन’ या संस्थेची स्थापना केली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रकाशन संस्थेने संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत एक हजारपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. एकाच वेळी २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी त्यांना ‘लेखक-कवींना प्रकाशवाट दाखविणारा प्रकाशक’ असे गौरवले आहे.
साहित्यिक आणि सामाजिक योगदान
प्रा. राणे हे एक उत्तम निवेदक असून त्यांनी अनेक राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन केले आहे. त्यांनी ‘सामाजिक परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर विचार मांडताना सांगितले की, “लेखनातून क्रांती घडविण्याची क्षमता लेखकांमध्ये आहे. त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची गरज आहे.” प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी हे प्रा. संतोष राणे घेत असतात. म्हणूनच आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेलो हजारो विद्यार्थी हे निरनिराळ्या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
प्रा. डॉ. संतोष राणे यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांना ‘ग्रंथमित्र पुरस्कार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’, ठाणे महापालिकेचा ‘ठाणे गुणीजन’, ‘साहित्य सेवा पुरस्कार’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ‘सांदीपनी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रा. डॉ. संतोष लक्ष्मण राणे यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, समर्पण आणि समाजसेवेचा आदर्श आहे. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या कार्यामुळे ठाणे शहरातील साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत.
19 Comments
प्रा. डॉ. संतोषजी राणे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन शैक्षणिक , साहित्यीक , सामाजिक आणि प्रकाशन क्षेत्रात आपल्या अभ्यासु , कष्टाळु आणि ध्येयवादी वृत्तीतुन मिळविलेल्या उत्तुंग यशाची माहिती वाचुन त्यांच्याप्रती मनामधे असलेली आदर भावना अजुनच वृद्धींगत झाली . माझ्या काव्यसंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची तसेच सहप्राध्यापक , विद्यार्थी , साहित्य – सामाजिक – राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या आदरपुर्वक मैत्रभावनेची जाणिव झाली .
प्रा. डॉ . संतोषजी राणे सरांचे मनःपुर्वक अभिनंदन!
पुढील शैक्षणिक , साहित्यीक , सामाजिक क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा ! जुळुन आलेले साहित्यीक ऋणानुबंध वृद्धींगत होत राहोत हि सदिच्छा !🙏🙏
….. प्रदीप राजे🙏
खूप छान परिचय . प्रा डॉ संतोष राणे यांची शैक्षणिक, साहित्यिक, आणि सामाजिक व प्रकाशक म्हणून वाटचाल पाहता शून्यातून विश्व निर्माण करावे अशी आहे. माझा त्याच्याशी अनेक वर्षांपासून परिचय आहे पण मी जेव्हा बांदोडकर महाविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करत होतो तेव्हा त्यांचे कार्य , धडपड अगदी जवळून पाहण्याचा योग आला. राणे सर एक हसतमुख, उत्साही, हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांची सर्व क्षेत्रांतील वाटचाल अशीच बहरत राहो या शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.
प्रा. संतोष राणे हे सदाबहार आणि हसतमुख व्यक्तिमत्व आहे.वाहत्या झर्यासारखे सक्रिय राहणे हा त्यांचा स्वभाव.नवोदितांच्या अक्षरांना प्रकाशनाचा प्रकाश दाखविणे हे त्यांचे मोलाचे कार्य.त्यांच्या बोलण्या आणि वागण्यात फणसाच्या गोडव्याची मीठास आहे.त्यांच्या कार्यास हार्दिक सदिच्छा. – प्रा. दामोदर मोरे
डॉ राणे सर म्हणजे हसतमुख व्यक्तिमत्व.
कुणाचेही मन न दुखावता , आनंदाने आपले कर्तव्य बजावणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
पुढील जीवनासाठी खूप शुभेच्छा.
सर, खूपच छान प्रेरणादायी जीवन प्रवास! सदैव हसत आणि कार्यरत राहणारं, विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी झटणारं, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणारं, लोकप्रिय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! सर, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🌹
सर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी फक्त कॉलेजचे शिक्षक नसून, चालते बोलते विद्यापीठच आहेत.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर .
सुंदर परिचय
जीवन संघर्षातून आपण यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि अनेकांना आपण यशाचा मूळ मंत्र दिला.
डॉ. प्रा.संतोष राणे सर म्हणजे जोशी-बेडेकर कॉलेजचे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्यांचे अध्यापन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसते. ते विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पलिकडचे जग दाखवतात. त्यांनी घेतलेल्या वर्गात ज्ञान मिळतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दृष्टिकोन घडतो.
खूप खूप शुभेच्छा सर. 💐
डॉ. प्रा.संतोष राणे सर म्हणजे जोशी-बेडेकर कॉलेजचे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्यांचे अध्यापन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसते. ते विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पलिकडचे जग दाखवतात. त्यांनी घेतलेल्या वर्गात ज्ञान मिळतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दृष्टिकोन घडतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेला प्रत्येक विद्यार्थी केवळ उत्तीर्णच होत नाही, तर आयुष्याच्या परीक्षेतही यशस्वी होतो. राणे सरांसारखे शिक्षक म्हणजे शिक्षणविश्वातील खरे दीपस्तंभ – जे स्वतः प्रकाशमान राहतात आणि इतरांचं आयुष्य उजळवतात.
खूप खूप शुभेच्छा सर. 💐
डॉ संतोष राणे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व.पहिल्याच भेटीत आपलंसं करणारे.अनेकांना मोलाचा सल्ला देऊन प्रोत्साहित करणारे.सरांच्या कर्तृत्वाचा आलेख असाच उंच उंच जाओ.याच मंगलमय सदिच्छा.
एक चांगला माणूस, भरवशाचा मित्र. सतत दुसऱ्याला प्रोत्साहित करण्याचा त्यांचा स्वभाव मला विशेष भावतो. सूत्रसंचालन खास करतात. खूप साऱ्या कविता आणि साहित्यिक संदर्भ त्यांना तोंडपाठ आहेत. जीव लावावा असा जिवलग. माझी इच्छा आहे, माझे एखादे पुस्तक सरांनी प्रकाशित करावे…
सर तुम्ही ग्रेट आहात
मी 19 83 ते 85 च्या दरम्यान नौपाडा विभागामध्ये मल्हार टाकीज जवळ राजदीप सोसायटीमध्ये महाशब्द ब्रदर्स आर्ट सर्विस यांच्याकडे पेंटर म्हणून काम करायचं. मी 1986 सालात केंद्र सरकारमध्ये नोकरीला लागलो त्यानंतर हे माझे आणि माझे संबंध टिकून आहे त. त्यानंतर मी साहित्य क्षेत्राकडे वळलो होतो एकदा महाशब्दे यांना भेटण्यासाठी गेलो असताना तिथे राणे सर देखील आले होते. महा शब्दे यांनी माझी व राणी सरांची ओळख करून दिली. मी प्रकाशकाच्या शोधात होतो. माझी त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांना मी माझा परिचय करून दिला आणि माझं पुस्तक प्रकाशित करण्याच्या संबंधित विचारणा केली तेव्हा त्यांनी मला असेच सांगितले की त्यांचे तीन लोकांचे परीक्षण मंडळ आहे त्यांनी जर माझे लिखाण पसंत केले तर ते छापू. मी त्यांना माझे कच्चे लेखन पाठवून दिले. सहा महिन्यानंतर मला त्यांचा होकार मिळाला. त्यांनी तेव्हापासून माझे दोन पुस्तके छापली आहेत अजून दोन छापण्याच्या मार्गावर आहेत. नंतर राणे सर व माझा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. मी जसा अनंत अडचणीतून मार्ग काढीत केंद्र सरकारमध्ये सहसंचालक झालो. राणे सरांनी देखील खूप गरीबी परिस्थितीमधून शिक्षण घेतलेले आहे हा लेख वाचल्यानंतर समजते. ते आज एक नामांकित प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे चाहते प्राध्यापक आणि एक नामांकित साहित्यिक आहेत. आपला लेख वाचून राणे सरांविषयी बरीचशी माहिती मिळाली जे मला माहित नव्हती. त्यांना पुढील प्रगतीकरिता माझ्या शुभेच्छा.
माहितीपूर्ण लेख! प्रा डॉ संतोष राणे सर अतिशय प्रगल्भ आणि विद्वान ज्ञानी असे व्यक्तिमत्व आहे. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐
श्री संतोष राणे यांची माझी ओळख प्रकाशक म्हणून झाली,माझ्या पाच कादंब-यांच प्रकाशन त्यांच्या **शारदा प्रकाशन** या संस्थेच्या वतीने झाले,श्री संतोष राणे हे ऐक ऊतम व्यक्तीमत्व आहे.ठाण्यातील एक ऊतम प्राध्यापक, प्रकाशक,ऊतम वक्ता, मनमिळाऊ स्वभाव असलेले, हसतमुख स्वभाव अस हे महान व्यक्तीमत्व आहे,त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छां -लेखक, अभिनेता,नेता,अभियंता,निर्माता ईंजि मोहन पवार
प्रा. संतोष राणे हे एक प्रकाशक आहेत. जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. एवढे माहीत होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरी वृत्तपत्रातील निवडक अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएचडी मिळविली. हे पहिल्यांदा कळले. ते डॉ. प्राध्यापक झाले. हे विशेष वाटले. त्यांचा आरंभिक काळ जरा खडतर वाटतो खरा. पण पुढे तो रंगरूपास चढला असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि शैक्षणिक अंग आहे हे वाचून समाधान वाटले. कवी या नात्याने माझे ते पहिले प्रकाशक होत.
डॉ संतोष राणे एक आदर्श व्यक्ती आणि सामाजिक भान असणारे व्यक्तिमत्व .
विध्यार्थी प्रिय असे राणे सर. सरांची इतंभुत माहिती वाचून सरांना अजून ओळखता आले. खूप छान माहिती संग्रहित केली आहे. डॉ. राणे सरांना खुप खुप शुभेच्छा
प्रा. डॉ. संतोष राणे सर हे खरोखर वाखण्याजोगे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून स्वभाव मवाळ स्वरूपाचा असल्याने त्यांनी अनेकांची मने जिंकून शैक्षणिक क्षेत्रात व पुस्तक प्रकाशन क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिलेले आहे माझ्यासाठी एक प्रेरणास्थान असून कौतुक करावे तितके थोडे आहे….
डॉ संतोष राणे सर, एक मनमिळावू आदर्श शिक्षक/प्रकाशक म्हणून मला जास्तच भावले. खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.