शिक्षण हा जसा मानवाच्या जडणघडणीचा पाया समजला जातो, तसाच तो सामाजिक उन्नतीचा देखील महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक उत्क्रांतीमध्ये शैक्षणिक व्यवस्था हा महत्त्वाचा गाभा आहे. ठाणे शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे शैक्षणिक व्यवस्थेच्या माध्यमातून असेच अनमोल योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाण्याचे शिक्षणमहर्षी डॉ. वा. ना. बेडेकेर होय.
मामांकडून गिरवले इंग्रजी आणि गणिताचे धडे
डॉ. वा. ना. बेडेकर यांचा जन्म 1917 सालचा. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. 1920 ते अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ हा टिळक-आगरकरांच्या विचारांनी भारलेला होता. या सर्व सामाजिक घडामोडींचा डॉ. वा. ना. बेडेकरांवरही तितकाच दूरगामी परिणाम होत होता. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गोवळ हे डॉ. वा. ना. बेडेकरांचे गाव. गोवळला बेडेकरांचे मोठे एकत्र कुटुंब होते. वा. ना. बेडेकर हे 7-8 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. त्याआधी त्यांच्या आजोळी म्हणजे जानशीला त्यांच्या मामांकडे त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठवले होते. इंग्रजी आणि गणिताचे पहिले धडे हे त्यांच्या मामांनीच त्यांना दिले.
शिष्यवृत्तीवर महाविद्यालयीन आणि वैद्यकीय शिक्षण
वडिलांच्या निधनानंतर बेडेकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. वा. ना. बेडेकर पुन्हा गोवळला येऊन राजापूरच्या शाळेमध्ये दाखल झाले. मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण तिथेच झाले. मॅट्रीक झाल्यानंतर ते पुण्यात गेले. पुढचं त्यांचं सगळं शिक्षण हे अत्यंत कष्टाचं आणि शिष्यवृत्ती मिळवून झालं. ते बुद्धीमान होते. महाविद्यालयापासून वैद्यकीय शिक्षणामध्येही त्यांनी अनेक पारितोषिकं मिळविली. डॉक्टर झाल्यावरही पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेवटी यातून मार्ग काढत 1944-45 च्या दरम्यान ते ठाण्याला पोहोचले.
प्रखर देशभक्तीपुढं पदवीनंतरच शिक्षण टाळलं!
स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडींचे डॉ. वा. ना. बेडेकर हे चांगले जाणकार होते. म्हणूनच देशभक्ती त्यांच्या रोमारोमात भिनली होती. एकदा राजापूरहून रत्नागिरीपर्यंत चालत जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट त्यांनी घेतली होती. डॉक्टर झाल्यावरही त्यांना पुढील शिक्षणाकरता जायचं होतं. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाची धामधूम होती आणि नवीन डॉक्टर झालेल्यांना सैन्यात सामील व्हायला लागत होतं. पण ब्रिटिशांची नोकरी करायची नाही, म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : डॉ. दाऊद दळवी- ठाण्याचे इतिहासपर्व जागवणारे व्यक्तिमत्त्व
रुग्णसेवेशी एकनिष्ठ
डॉ. वा. ना. बेडेकर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये निपुण तर होतेच पण त्याहीपेक्षा जास्त तो व्यवसाय अत्यंत जबाबदारी आणि तन्मयतेनं ते करत असत. नौपाडा विभाग हा त्यावेळी ग्रामपंचायत होता. ठाण्याला रेल्वे असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग ठाण्याला स्थायिक होत होता. त्यांचा गोखले रोडवरचा दवाखाना हा रेल्वेच्या रस्त्यावरच होता. रुग्णांची सोय म्हणून ते दवाखान्यात अहोरात्र कार्यरत असत. हाच रुग्णसेवेचा वसा जपून 1950 साली त्यांनी स्वतःचं रुग्णालय चालू केलं.
गोठ्यातली शाळा…
ठाण्यातील शैक्षणिक क्षेत्रात डॉ. वा. ना. बेडेकरांनी 1957 साली पहिलं पाऊल टाकलं. व्यवसायाच्या निमित्तानं ते व्हिजीटसाठी नौपाडा भागातील गोखलेवाडीत गेले होते. त्यावेळी गोठ्यात भरणारी शाळा त्यांनी पाहिली. 1 ऑगस्ट 1935 साली स्थापन झालेल्या विद्या प्रसारक मंडळाची ती रजिस्टर मराठी खासगी शाळा होती. गोठ्यात भरणारी ही शाळा दुर्दशेतच सुरू होती. मुलं ओल आलेल्या जमिनीवर लाकडी फळीवर बसलेली होती. त्या मुलांतच डॉ. बेडेकरांनी आपली मुलगी शैला हीला बसलेलं पाहिले. यावेळी ही अवस्था पाहून डॉ. वा. ना. बेडेकर यांना वाईट वाटले. परंतु वाईट वाटून स्वस्थ न बसता त्यांनी या घटनेला कृतिशीलतेची जोड दिली. गोठ्यातील शाळा इमारतीत भरली पाहिजे असं तीव्रतेनं त्यांनी ठरवलं. त्यावेळी त्यांचे मित्र गुणाकर जोशी यांच्याशी ते बोलले. तेव्हा जोशी यांनीही याबाबत होकार दर्शवला. त्यानुसार सुमारे 25-30 प्रतिष्ठित नागरिक विद्या प्रसारक मंडळात समाविष्ट झाले. 1 ऑगस्ट 1957 रोजी विद्या प्रसारक मंडळाची पुनर्रचना केली गेली.
शाळांच्या इमारतींची निर्मिती
1956-57 च्या काळात मुलांच्या संख्यावाढीबरोबर जागेची अडचण शाळेला तीव्रतेनं भासू लागली. सहस्रबुद्धे वाडा, घाणेकर गुरुजींचं घर, ब्राह्मण सोसायटीचं कार्यालय, कै. भार्गवराम गोखले यांची कौलारू चाळ, चाळीला लागून असलेला पत्र्याचा गोठा असा शाळेचा भरकटल्यासारखा प्रवास चालू होता. पैशाअभावी मंडळाचे कार्यकर्ते हतबल झालेले होते. संस्थेची ही हतबलता दूर करण्याच्या हेतूनेच डॉ. वा. ना. बेडेकर यांनी संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं. कै. भार्गवराम गोखले यांजकडून विकत घेतलेल्या जागेवर संस्थेचं बांधकामही त्यांनी सुरू केलं. तेव्हा कार्यकारिणीतील वि. रा. परांजपे यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळेस ‘डॉ. बेडेकर विद्या मंदिर’ हे नाव द्यावं अशी सूचना केली. ती सूचना सर्वमान्य झाली. 1959 मध्ये प्राथमिक शाळेचा विकास माध्यमिक शाळेत झाला. तत्कालीन प्रजासमाजवादी पक्षाचे नेते कै. एस्. एम्. जोशी यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर कै. भार्गवराम गोखले यांच्याकडून विकत घेतलेल्या जागेवर संस्थेच्या पहिल्याच वास्तूच्या बांधकामाचं भूमीपूजन केलं गेलं. उच्च माध्यमिक विभागासाठी मोठमोठ्या खोल्यांच्या बांधलेल्या तीन मजली इमारतीत कै. सौ. आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यमाची शाळा 1976 मध्ये स्थापन करण्यात आली.
हे ही वाचा : उभारणीचा ‘प्रारंभ’!
ठाण्यात महाविद्यालयांची निर्मिती सर्वप्रथम करण्याचे श्रेय विद्या प्रसारक मंडळास
कॉलेज काढण्याचा विचार गुणाकर जोशी यांनीच डॉक्टरांच्या मनात भरवून दिला होता. मोकळी जागा मिळण्याचा प्रश्न होताच. ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यातील खाडीकाठची दलदलीची जागा त्यांनी मिळवली. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बांदोडकर यांच्यासह ठाण्यामधील धनिकांनी व मध्यमवर्गीय शिक्षणप्रेमी जनतेने आपापल्या ऐपतीनुसार देणग्या दिल्या आणि आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे संयुक्त पहिले कॉलेज ठाण्यात उभे राहिले.
एकाच कॅम्पसमध्ये लॉ, इंजिनियरिंग आणि व्यवस्थापन कॉलेजेस
प्रारंभी पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली ही महाविद्यालये योग्यवेळी मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली. 1972 मध्येच ठाण्यात विधी महाविद्यालय स्थापन करण्याचं श्रेयही विद्या प्रसारक मंडळास लाभलं. 1972 मध्येच विद्या प्रसारक मंडळाचा व्यवस्थापन विभाग स्थापन झाला. 1984 साली विद्या प्रसारक मंडळाने स्थापन केलेल्या तंत्रनिकेतनामुळे ठाण्यातील व ठाणे परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे. इ. स. 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात वेळणेश्वर येथेही वि. प्र. मंडळाने सुरू केलेलं इंजिनिअरींग कॉलेज दिमाखात उभं आहे.
इंग्लंडमध्ये शिक्षणसंस्थेची उभारणी
वि. प्र. मंडळाची पुनर्रचना करून 1957 ते 2004 पर्यंत सातत्याने 47 वर्षे अध्यक्षपदाची धुरा विलक्षण ताकदीने, सक्रियतेने व दूरदृष्टीने पेलवणारे डॉ. वा. ना. बेडेकर हे अलौकिक कर्मयोगी होते. प्रसिद्धीपासून व राजकारणापासून ते दूरच राहिले. आज डॉ. विजय बेडेकर हे वि. प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वि. प्र. मंडळाने इंग्लंडमध्ये ‘व्हीपीएमस् लंडन ॲकेडेमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’ संस्थेची निर्मिती केली. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केले, अनेक शिक्षण संस्था निर्माण करून भारतीयांना शिकविले, त्या इंग्रजांना त्यांच्या देशात जाऊन भारताच्या ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळातर्फे शिक्षण देणारी संस्था 2009 मध्ये स्थापन केलेली आहे! डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याची शैक्षणिक जडणघडणच झाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.