ठाणे शहराचा शेकडो वर्षांचा जो प्रवास झाला आहे, त्यात शहराचा चेहरा मोहरा बदलत जाणं स्वाभाविकच आहे. शहर वाढत गेलं, विस्तारलं गेलं आणि नवनवीन भाग निर्माण झाले. जुन्या शहरातील भागांचे महत्व काळाबरोबर जरा कमी होत गेलं. तरिही ठाणे शहरातील एक भाग जो शंभर एक वर्षांपूर्वी महत्वाचा होता, तोच भाग आजही तितकाच महत्वाचा राहिला आहे. तो भाग म्हणजे ‘टेंभी नाका’. या भागाचा उल्लेख ‘टेंभी’ असा महिकावतीच्या बखरीत वाचायला मिळतो. म्हणजे साधारण तेराव्या-चौदाव्या शतकापासून हा भाग अस्तित्वात आहे. तर ब्रिटिशांच्या राजवटीत हा भाग म्हणजे जणू ठाण्याचे सत्ता केंद्रच होता.
सत्ताकेंद्रात ग्रंथालयाची उभारणी
टेंभी नाका परिसरातच कलेक्टर ऑफिस,जिल्हा न्यायालय, जिल्हा इस्पितळ, ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी शाळा अशा गोष्टी एकवटलेल्या होत्या. त्यामुळेच 175 वर्षांपूर्वी याच भागात सरकारने ठाण्यातील पहिलं सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. तेव्हा ठाण्याला न्यायाधीश म्हणून काम पाहणाऱ्या ‘की’ साहेबांच्या पुढाकाराने सन 1850 मध्ये ठाणे शहरात ‘ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ स्थापन करण्यात आली. या ग्रंथालयामुळे ठाण्यातील लोकांसाठी इंग्रजी आणि मराठीतील ज्ञान भांडार खुलं झालं. हे ठाणे जिल्ह्यातले पहिलं सार्वजनिक ग्रंथालय होतं.पुढे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डब्ल्यू.बी.म्युलक यांनी पुढाकार घेऊन या ग्रंथालयाची स्वतःची वास्तू निर्माण केली. त्यामुळे टेंभीनाक्यावर एका टुमदार,कौलारू वास्तुमधून ग्रंथालयाचे कामकाज सुरू झालं. त्यावेळी म्युलक साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या लायब्ररीचे नामकरण ‘म्युलक लायब्ररी’ असे करण्यात आलं. यावेळी बसवण्यात आलेली नामकरणाची शिळा सध्याच्या नव्या वास्तूत ही पाहायला मिळते.
1879-80 मध्ये 45 सभासद
आजची ग्रंथालयाची बहुमजली इमारत जिथे आहे तिथेच ही वास्तू होती. ठाणे गॅझेटियरमध्ये केलेल्या नोंदींनुसार हे ग्रंथालय सुरू झाल्यानंतर तीस वर्षांनी म्हणजे 1879-80 मध्ये या ग्रंथालयात एकूण 974 पुस्तके होती. त्यात 712 इंग्रजी ग्रंथ होते तर 235 पुस्तके मराठी, संस्कृत, हिंदुस्थानी, फारसी, गुजराथी भाषांमधली मिळून होती. इंग्रजी पुस्तकांमध्ये 52 नियतकालीकांचा समावेश होता. इंग्रजीतील पुस्तकांमध्ये कायदा, धर्म, विज्ञान, कला, शासकीय नोंदी, आत्मचरित्रं, प्रवास वर्णनं, इतिहास, ललित साहित्य आणि संकिर्ण विषयांवरील अशी विविध प्रकारची पुस्तके होती. तेव्हा ग्रंथालयात ‘बॉम्बे गॅझेट’ आणि ‘बॉम्बे समाचार’ ही वर्तमानपत्रे घेतली जात असत. तसेच ‘पुणे ज्ञानप्रकाश’हे साप्ताहिकही येत असे. याबरोबरच ठाण्यातून प्रसिध्द होणारी ‘अरुणोदय’ आणि ‘सूर्योदय’ही वर्तमानपत्रेही संपादकांकडून विनामूल्य येत असत. तेव्हा या ग्रंथालयाचे एकूण 45 सभासद होते त्यातील 7 प्रथम वर्गाचे (मासिक रु.1 वर्गणी),12 द्वितीय वर्गाचे (आठ आणे वर्गणी), 23 तृतीय वर्गाचे (चार आणे वर्गणी) आणि 3 चतुर्थ वर्गाचे (दोन आणे वर्गणी) होते. सन 1879-80 मध्ये लायब्ररीत एकूण रु.470/- वर्गणीतून जमा झाले होते.
हेही वाचा – ऐतिहासिक घोडबंदर किल्ला
1965 मध्ये नाव बदलून ठाणे नगर वाचन मंदिर
कलेक्टर म्युलक यांनी ग्रंथालयाला इमारत बांधून दिली. तेव्हा ग्रंथालयाच्या कार्यकारिणीमध्ये कलेक्टर डब्ल्यू.बी म्युलक (अध्यक्ष), सिव्हिल सर्जन डॉ.के.आर.किर्तीकर (उपाध्यक्ष), बी.जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक जनार्दन बाळाजी मोडक(चिटणिस), तर र. गं. भोर हे खजिनदार होते. या कार्यकारिणीमध्ये शेठ मोतिलाल हरगोविंददास, नारायणराव खारकर, काझी बुरानुद्दीन, रावसाहेब चिंतामण भट, रावबहाद्दूर बाळकृष्ण देवराय, इ.एन. मोझरडी, व्ही.आर. ओक, रावबहादूर आर. टी. आचार्य हे मान्यवर होते. हे सगळे तेव्हाच्या ठाण्यातील आपापल्या क्षेत्रात अग्रेसर असलेले लोक होते. 1965 मध्ये या ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष आणि ठाणे नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी सीताराम वि.सामंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालयाचे नाव बदलून ठाणे नगर वाचन मंदिर असे करण्यात आलं.

सध्या 77 हजार पुस्तके
जुनी इमारत लहान पडत असल्याने 1970 साली नवी बहुमजली इमारत उभी राहिली. पुढे 46 वर्षांनी पुन्हा एकदा इमारतीचे संपूर्ण नुतनीकरण करुन 2016 मध्ये आज दिसणारी वास्तू उभी राहिली. बदलत्या काळानुसार संस्थेनं संगणकीकरण करुन कामकाज अधिक जलद आणि पारदर्शी केलं आहे. सध्या या ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधली मिळून सुमारे 77 हजार पुस्तके आहेत. तसंच सुमारे हजार मासिके, नियतकालिके संस्थेने जतन केली आहेत. वेगवेगळ्या वर्गाचे मिळून संस्थेचे पंधराशेहून अधिक सभासद आहेत. सध्याचे अध्यक्ष केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तक बँक, साहित्यिक कार्यक्रम असे उपक्रम केले जातात. 2000 साली संस्थेनं आपला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी ‘ग्रंथ शारदा ’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ठाण्यातील मुक्त पत्रकार आणि कवी विनोद पितळे यांनी नगर वाचन मंदिराची वाटचाल दाखवणारा ‘ज्ञानसागर’ हा लघुपट ही तयार केला आहे.
ठाणे नगर वाचन मंदिराच्या या दीर्घ वाटचालीत त्या त्या काळात रावबहादूर स. के. भागवत, सर गोविंद बळवंत प्रधान, सेठ त्रिभुवनदास जमनादास, कृ.भि.जोशी, चिं.रा.चौबळ, वामनराव रेगे, यमुताई साने, प्रा.सिंधु पटवर्धन, पद्माकर रवाडकर,य.रा.साने, भा.शं.प्रधान, श,शां.कर्णीक अशा अनेकांनी विविध पदांची जबाबदारी मोठ्या तळमळीने सांभाळली आहे. सध्या केदार जोशी संस्थेच्या अध्यक्षपदावरुन काम पाहात आहेत. ठाणे शहराच्या सांस्कृतिक-शैक्षणिक परंपरेला आधारभूत ठरलेलं ‘नगर वाचन मंदिर’ म्हणजे ठाण्याचे सांस्कृतिक वारसा चिन्हच म्हटले पाहिजे.
3 Comments
खूपच छान माहिती मिळाली. हवेशीर, भरपूर उजेड असल्याने तिथे बसुन वाचायला मला फार आवडते. संदर्भ साठी पुस्तके ही uplabdha होतात.
माहितीपूर्ण लेख.
हे वाचनालय कधीकाळी जिल्हा वाचनालय होते का?