हुबेहूब आकार देऊन मूर्तीतही भावना आणण्याची ताकद कुणात असेल, तर ती शिल्पकारामध्येच. आणि असेच एक शिल्पकलेतील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भाऊ साठे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकलेतील व्यक्तीमत्त्व आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभले ही प्रत्येक ठाणेकरांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अशाच या अभिमानास्पद शिल्पकाराविषयी जाणून घेऊयात…
स्पॅनिश सरकारची शिष्यवृत्ती
सदाशिव दत्तात्रय साठे उर्फ भाऊ साठे. शिल्पकलेच्या दुनियेतील एक मोठं नाव. भाऊंचा जन्म हा 17 मे 1926 रोजी पेण येथील वावोशी गावात झाला. भाऊंचं शालेय शिक्षण कल्याण येथील सुभेदारवाडा शाळेत झालं. लहानपणापासून कलेची नितांत आवड असणा-या भाऊंनी पुढे जाऊन शिल्पकलेतच संपूर्ण आयुष्य जगण्याचा ठाम निर्धार केला होता. भाऊंच्या चुलत्यांचा गणपती निर्मितीचा कारखाना कल्याणमध्ये होता. भाऊंनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. कल्याण येथील साठेवाड्यात ते लहानाचे मोठे झाले. या अवलिया कलाकाराने पुढे 1947 साली मुंबईच्या सर जे.जे. महाविद्यालयातून कलाशिक्षण घेतले. 1948 साली मॉडेलिंग आणि स्कल्पचरचा डिप्लोमा करून भाऊ साठे हे शिल्पकला क्षेत्रात आले. मोठ्या कष्टाने त्यांनी 1958 मध्ये स्पॅनिश सरकारची शिष्यवृत्ती मिळवली. शिल्पकलेत वेगवेगळे प्रयोग साकारणं यात भाऊंचा हातखंडा होता. म्हणनूच विविध शिल्प साकारून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख शिल्पकला क्षेत्रात निर्माण केली.
आंतररराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार
भाऊंनी सिनेनिर्माते व्ही.शांताराम यांच्याकडे सेट डिझाइनिंगसाठी मोल्डिंग खात्यात काही दिवस नोकरी केली. त्यानंतर दिल्लीतील अँटिकच्या दुकानात स्टोअर आर्टिस्ट म्हणूनही नोकरी केली. त्याच दरम्यान, भाऊंच्या कर्तृत्वाला वाव देणारी घटना घडली. दिल्ली नगरपालिकेने महात्मा गांधींचा हिंदुस्थानातील पहिला भव्य पुतळा बनवण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी बऱ्याचशा शिल्पकारांमध्ये स्पर्धा होती, पण ते काम भाऊंनी मिळवले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केले. भाऊ साठे हे ऑल इंडियन स्कल्पचर असोसिएशनचे संस्थापक सदस्य देखील होते. मुंबई, दिल्ली, लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क इथे त्यांच्या शिल्पकृतींचे प्रदर्शन भरविले गेले आहे. 1973 मध्ये त्यांना लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस येथून प्रिन्स फिलिप यांचे शिल्प साकारण्यासाठी बोलावण्यात आले होते.
हे ही वाचा : पी. सावळाराम : सजग, जागरूकता, भावनाप्रधान कवी !
महत्त्वाच्या पुतळ्यांच्या उभारणीत भाऊंचे योगदान
भाऊंनी देशभरात अनेक पुतळे साकारले. पुरंदरावर आक्रमक पवित्र्यात दोन्ही हाती तलवारी घेऊन, शत्रूवर तुटून पडलेल्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा, ग्वाल्हेर येथे 1962, 1969 साली उभारलेला राणी लक्ष्मीबाईंचा 19 फूटी पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नऊ फूटी पुतळा, लाल किल्ल्यासमोरील 1975 साली उभारलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 18 फूटी पुतळा, ठाण्याच्या डॉ. वा.ना. बेडेकर यांचा सहा फूटी पुतळा ही भाऊंच्या कलाकृतीतून साकारलेली आहेत. नवी दिल्ली येथील महात्मा गांधी यांचे 9 फुटी शिल्प देखील भाऊ साठे यांनी साकारले आहे. सार्वजनिक ठिकाणी गांधीचे पहिले शिल्प साकारणारे व्यक्तीमत्त्व अशी त्यांची ख्याती आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिध्द 18 फुटी अश्वारूढ पुतळा देखील भाऊ साठे यांनी साकारला आहे. महाराजांची मुद्रा प्रौढप्रतापी, निर्भय, सर्व कल्याणकारी अशी आहे. पुतळा अश्वारुढ आहे. शीड जसे नावेला दिशा देते, तशी रयतेला स्वराज्याच्या दिशेने नेणाऱ्या आरमाराची उभारणी करणारे आहे. हाच संदेश या सुप्रसिध्द पुतळ्यातून भाऊंनी मांडला. लोकमान्य टिळकांचा 18 फुटी पुतळा, इंदिरा गांधी, रामनाथ गोयंका आदींचे शिल्प देखील भाऊंनी साकारले आहे. साठे यांच्या शिल्पकलेची दखल घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती.
पुरस्कारांनी सन्मान
1954 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते भाऊ साठे यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तसेच 2004 मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव पुरस्कार देऊन भाऊ साठे यांना सन्मानित करण्यात आले. गेली पाच दशके त्यांनी शिल्पकलेत भरीव कार्य केले. 2019 साली त्यांनी साकारलेले दांडी यात्रेचे शिल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. दांडी यात्रा ही भाऊ यांनी साकारलेले शेवटचे शिल्प ठरले. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी या दोन्ही संस्थांकडून लाईफ टाईम अचिव्हमेंटचा पुरस्कार देऊन भाऊंच्या शिल्पकलेचा गौरव केला होता.
साठे शिल्पालय
शिल्पकलेला स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यासह देशभरात अनेक विद्यार्थी भाऊ साठे यांनी घडवले. शिल्पकलेच्या माध्यमातून सामाजिक जडणघडणीत भाऊंनी महत्त्वाचे योगदान देखील दिले. 1948 च्या संघबंदीच्या विरोधात सत्याग्रह करणारे स्वयंसेवक म्हणूनही भाऊंची ओळख संपूर्ण ठाणे जिल्ह्याला आहे. डोंबिवली औद्योगिक विभागात साठे शिल्पालय साकारण्यात आले. त्याठिकाणी त्यांची अनेक शिल्पे ठेवण्यात आली आहेत. शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या भावी शिल्पकारांसाठी हे शिल्पालय कायम मार्गदर्शनपर ठरत आले आहे. भाऊ साठे यांचे शिल्पकलेवरचे त्यांच्या शिल्पांची जन्मकथा सांगणारे ‘आकार’ नावाचे पुस्तक प्रकाशित आहे.