ठाणे स्टेशन – गोदाम ते सॅटिस!

Thane Station : ब्रिटिशांनी आणलेली ती ऐतिहासिक झुकझुक गाडी ठाणे रेल्वे स्टेशनात दाखल झाली, ते ठाणे रेल्वे स्टेशन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एखाद्या दुर्मीळ फोटोत नक्कीच पाहिलं असेल. दुर्मीळ असल्यामुळे तो फोटो काळ्या आणि पांढऱ्या अशा फक्त दोन रंगांत असणार हे गृहित धरायला हवंच. त्या फोटोतलं ठाण्याचं रेल्वे स्टेशन हे कोणाकोणाला एखाद्या गोदामासारखं दिसतं.

ब्रिटिशांनी आणलेली ती ऐतिहासिक झुकझुक गाडी ठाणे रेल्वे स्टेशनात दाखल झाली, ते ठाणे रेल्वे स्टेशन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एखाद्या दुर्मीळ फोटोत नक्कीच पाहिलं असेल. दुर्मीळ असल्यामुळे तो फोटो काळ्या आणि पांढऱ्या अशा फक्त दोन रंगांत असणार हे गृहित धरायला हवंच. त्या फोटोतलं ठाण्याचं रेल्वे स्टेशन हे कोणाकोणाला एखाद्या गोदामासारखं दिसतं. फोटोतल्या त्या स्टेशनाभोवती ठाणेकरही तुरळक दिसतात. कमी लोकसंख्या असण्याच्या त्या काळात त्या स्टेशनाबाहेर तुरळक ठाणेकर दिसणं तसं साहजिकही होतं. पुढे आमच्या विकसनशील देशाने कात टाकली आणि गोदामासारख्या दिसणाऱ्या त्या स्टेशनाचाही चेहरामोहरा बदलला. विकसित नसला तरी विकसनशील दिसू लागला.

ठाणे-व्हीटी लोकल गेल्या शतकात वडाळा, शिवडीमार्गे!

चार प्लॅटफॉर्म्सचं तेव्हाचं ते इटुकलं स्टेशन अख्ख्या ठाणेकर जनांचा प्रवाह सामवून घ्यायचं. आज कोणाला सांगितलं तर ते अद्भुत वाटेल की तेव्हा ठाण्यातून सुटणारी लोकल कुर्ल्याला कूस बदलून हार्बरमार्गे तेव्हाच्या व्हीटीला म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला जायची. चुनाभट्टी, वडाळा, शिवडी, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड वगैरे स्टेशनं मजल-दरमजल करत गाठायची. पुढे मात्र हार्बर लाईनने व्हीटी गाठण्याचं अल्पसंख्य ठाणेकरांचं हे सुख त्यांच्यापासून दुरावलं. कारण स्पष्ट होतं. आधी म्हटल्याप्रमाणे हार्बर लाईनने व्हीटी गाठणारे ठाणेकर अल्पसंख्य ह्या वर्गात मोडू लागले… अर्थात, ते एकच कारण त्यावेळी ती लोकल बंद होण्याचं नसणार!

ठाणे-व्हीटी लोकल, शिवडीमार्गे

स्टेशनबाहेरची लाल परी आणि टांगे

1988 पर्यंत ठाणे स्टेशनच्या बाहेर पडलं की, आजच्यासारखी ठाणे परिवहन सेवेच्या बससेवेची रेलचेल नसायची. एसटी नावाची लालपरी ठाणेकरांच्या दिमतीला असायची. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ह्या एसटीचं तिकिट होतं, छोट्यांसाठी 10 पैसे तर मोठ्यांसाठी 20 पैसे. त्यावेळी शाळकरी मुलांसाठी एसटी मासिक पास द्यायची, त्यासाठी 5 रुपये मोजावे लागायचे. ठाणे स्टेशनच्या बाहेर ह्या बसेस तेव्हा वागळे इस्टेट, वर्तक नगर, श्रीरंग सोसायटी, गुरूकुल सोसायटी, माजिवडे इथपर्यंत जायच्या. इतकचं काय, ठाणे स्टेशन ते टाउन हॉल या इतक्या छोट्या अंतरापर्यंतही ही एसटी धावायची. आजच्या इतक्या मोठ्या संख्येनं त्या वेळी रिक्षा नव्हत्या. आर्थिक उदारीकरणाच्या आधीचा तो काळ होता, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे पगार तोपर्यंत गलेलठ्ठ झालेले नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून ठाणे स्टेशनपासून रिक्षाची चैन लोकांच्या पाकिटाला परवडणारी नव्हती. शिवाय आजच्यासारखा शेअरिंग रिक्षांचा पर्यायही तेव्हा उपलब्ध नव्हता.

Thane ST Depot

ठाणे स्टेशनकडून एसटी एके एसटी हाच एक घर गाठण्याचा दुवा असायचा. पण इथे एक आठवण सांगायला हवी की त्या एका काळात ह्याच ठिकाणी स्टेशनात बरेच टांगे उभे असायचे आणि ठाणेकर ह्या टांग्यानेही घरचा रस्ता पकडायचे. अगदी 1990-95 पर्यंत हे टांगे स्टेशनच्या बाहेर पाहायला मिळत होते. खरंतर एके काळी नव्याने उदयाला येणाऱ्या ठाण्यात समाजातला एक असा वर्ग येत होता की, जो आपला गाडग्यामडक्याचा संसार ह्या टांग्यातून घेऊन येत होता.

रेल्वेस्टेशनचा मेकओव्हर

साधारण 60-65 वर्षांपूर्वी दादर-गिरगावातली माणसं ठाण्यात घरं घेऊ लागली. ठाणं बाळसं धरू लागलं म्हणा किंवा ठाण्याला सूज येऊ लागली म्हणा. ठाणे स्टेशनचा मेकओव्हर होऊ लागला. ठाणे स्टेशनचे फलाट वाढले. फलाटांचे क्रमही उलटसुलट होते. त्यावेळी नवख्या माणसाला गांगरायला व्हायचं. आता एक सरळ क्रमाने प्लॅटफॉर्म क्रमांक आहेत. स्टेशनला जोडले जाणारे पूल अरुंद राहिले नाहीत, ते रुंद झाले, आता तर सरकते जिने आले. गोदामासारख्या वाटणाऱ्या स्टेशनाची इमारत उभी राहिली. कोणे एके काळी हार्बर लाईनने धावणारी लोकल ठाण्यातून दिसेनाशी झाली खरी, पण दुसऱ्या बाजूला वाशी, सीबीडी, बेलापूर, पनवेलला जाणारी ट्रान्सहार्बर ठाणे स्टेशनवर डेरेदाखल झाली. त्यासाठी रेल्वेमार्गाचा विस्तार झाला. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यात येऊन उभ्या राहू लागल्या. भारताची पहिली रेल्वे थांबलेल्या या ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील प्लॅटफॉर्मवर काही वर्षांपूर्वी एक एअर-कंडिशन्ड स्वच्छतागृह उभं राहिलं. 

सॅटिसच्या जादूची कांडी

आजच्या ठाणे स्टेशनवर सॅटिसचं जे विकसित आवरण दिसतं, ते तेव्हा ठाण्यातल्या राज्यकर्त्यांच्या कल्पनेत असणं शक्य नव्हतं. ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन  आणि स्टेशन परिसरात होणारी बेसुमार गर्दी विचारात घेऊन सॅटिस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आला. ह्या प्रकल्पाने ठाणे स्टेशनचं रुपडं आमुलाग्र पालटलं. स्टेशनच्या पूलावरून आपण थेट बसस्टॉपच्या ब्रीज स्टेशनवर येतो. फ्लायओव्हर आला. ठाणे बस डेपोकडून हा फ्लायओव्हर सुरू झाला तो थेट मासुंदा तलावापर्यंत पोहोचला. जुन्या ठाण्याच्या तुलनेत हे फारच नवं आणि डोळे विस्फारून टाकणारं होतं. एक साधासरळ चाकरी करणारा माणूस अचानक कॉर्पोरेट संस्कृती अंगाखांद्यावर लेवून यावा आणि झकपक दिसावा तसा तो प्रकार होता. सॅटिस प्रकल्पामुळे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर सगळीकडे रिक्षांचं साम्राज्य दिसू लागलं. रिक्षासाठी भलामोठा स्टॅन्ड उभारला गेला आणि तो स्टॅन्ड माणसांनी खचाखच भरून जाऊ लागला. त्याच्या थोडं पुढे शेअरिंग रिक्षाची प्रथा सुरू झाली. 

स्टेशनच्या बाहेरील आस्वाद आणि शृंगार!

पूर्वी एसटीमध्ये आपला नंबर लागला की ती बस खेळाच्या साहित्यांचं प्रसिद्ध दुकान असलेल्या गणपुले स्पोर्ट्सकडून जायची. त्याच्या अगदी पुढे एक प्रसिद्ध दुकान होतं ज्याचं नाव होतं शृंगार आर्ट ज्वेलर्स. आज मात्र हे दुकान दिसत नाही. असंच एक स्टेशन परिसरातलं प्रसिद्ध हॉटेल होतं त्याचं नाव होतं आस्वाद. तेव्हा ह्या हॉटेलातला बटाटवडा आणि मिसळ ह्यांची कीर्ती ठाण्यात मोठी होती. ठाण्यातल्या अनेकांचं कोणाला भेटीला बोलवण्यासाठीचं ते संकेतस्थळ होतं. आजच्या भाषेत सांगायचं तर तो लॅन्डमार्क होता. काहींचा तर म्हणे तिथे बघण्याचा कार्यक्रम व्हायचा. भानुशाली हॉस्पीटलकडून डावीकडे वळल्या वळल्या अगदी उजवीकडे हे आस्वाद हॉटेल होतं. आज असं एखादं प्रसिद्ध हॉटेल तिथं होतं यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

सायकल स्टॅण्ड गायब

आज सॅटिस पुलावरून बस जेव्हा वेग घेते तेव्हा खाली असलेली दुकानं नजरेस पडत नाहीत. अर्थात. आता ही बस पूर्वीसारखी एसटीची लाल परी राहिलेली नाही. ती ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची सेवेकरी झालेली आहे. ह्या बसेसचे आकारमानही आता वेगळे झाले आहे. वाढत्या ठाण्याकरता परिवहन सेवा अपुरी पडत असल्याने लांबवर राहणारे ठाणेकर स्वतःच्या बाईक, स्कूटर्सवरुनही स्टेशन गाठतात. पूर्वी सायकली पार्क करायला स्टेशनवर सायकल स्टॅण्ड होता. हा सायकल स्टॅण्ड गायब होऊन त्याची जागा स्कूटर पार्किंगने कधी घेतली ते कळलंही नाही. स्टेशनवरील नव्या पार्किंग व्यवस्थेत छोटा सायकल स्टॅण्ड परत उभा राहिलाय आणि स्कूटर्स, बाईक्ससाठी चांगली सोय झाली आहे.

एकूणच, ठाणे स्टेशनचं रुपडं आजच्या काळानुसार बदलणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच ते बदललं आहे. ठाणे स्टेशनचं रुपडं बदललं तसंच स्टेशनच्या आजुबाजूच्या परिसराचा चेहराही बदलला. फक्त बदलला नाही तो ठाणे स्टेशनच्या लगतचा ठाण्याचा एसटी डेपो. तो मात्र तसाच राहिला जुना किंवा जुनाट. त्याला मात्र काळाचा नियम लागू पडला नाही. सरकत्या काळाच्या नियमाला हा एसटी डेपो कायम अपवाद राहिला असावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश