उपवन प्रोफेशनल झालं!

Thane : ठाणे हे तलावांचं शहर म्हणजे ‘सिटी ऑफ लेक’ आहे, हे पुन्हा पुन्हा काय सांगायचं! ते आता ठाण्याबाहेरच्या लोकांना व्यवस्थित कळलेलं आहे. ठाण्यातल्या ह्या तलावांचा मुकूटमणी, मेरूमणी कोणता तलाव असेल तर तो उपवन तलाव!
[gspeech type=button]

ठाणे हे तलावांचं शहर म्हणजे ‘सिटी ऑफ लेक’ आहे, हे पुन्हा पुन्हा काय सांगायचं! ते आता ठाण्याबाहेरच्या लोकांना व्यवस्थित कळलेलं आहे. मासुंदा तलाव, ब्रह्माळा तलाव, कचराळी तलाव, रायलादेवी तलाव, अंबेघोसाळे तलाव, मखमली तलाव. ठाण्यातल्या अशा किती तलावांची नावं सांगायची! ह्यातले काही तलाव तर एकमेकांपासून एका हाकेच्या अंतरावर आहेत. काही तलाव एकमेकांपासून थोड्याफार फरकाने दूर आहेत. काही जुळे वाटावे इतके जवळ आहेत.

रेमंड कंपनीसाठी पाणीपुरवठा

असो, ठाण्यातल्या ह्या तलावांचा मुकूटमणी, मेरूमणी कोणता तलाव असेल तर तो उपवन तलाव! हा उपवन तलाव खरंतर ठाणे स्टेशनापासून दूर, म्हणजे येऊरच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. ठाण्याच्या भर रहदारीपासून दूर, एकटा, एकाकी आणि एकांतप्रिय असा हा तलाव आहे. डोंगराच्या बाजूला असलेल्या तलावामुळे ह्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. तळ्यात पाण्याचे झरे आहेत. आणि आजूबाजूच्या टेकड्यांवरीलही पाणी येऊन या तलावाला मिळतं. काहींचं म्हणणं आहे की, हा तलाव म्हणजे ठाण्याचं काश्मिर आहे. ठाण्यापासून एका उंचवट्यावर असलेला हा तलाव निश्चितच ठाण्यातलं एक प्रेक्षणीय स्थळ बनला आहे.  उन्हाळ्यात या पोखरण तलावातील पाण्याची पातळी कमी झाली की, गोलाकार उभं दगडी बांधकाम दिसायचं. त्याला सगळे जण ‘पाण्याची चिमणी’ म्हणायचे. पोखरण रोड नं. 1 वरील रेमंड कंपनीकरता या चिमणीतून पाणी खेचलं जायचं. पावसाळ्यात तलावाच्या पाण्याची पातळी किती वाढलीय, याचा अंदाज चिमणीकडं पाहून लावला जायचा. आता रेमंड कंपनीही बंद पडली आणि तलावातल्या त्या दगडी चिमणीवर भगवान शंकराची मूर्ती स्थानापन्न केली आहे.

हे ही वाचा : क्रिकेट ऑफ ठाणे

पोखरण तलावाचं नामकरण

हा तलाव आज उपवन तलाव म्हणून प्रसिध्द आहे हे खरं आहे. पण त्याचं खरं नाव हे पोखरण तलाव होतं. मुंबईकडून कॅडबरी कंपनीकडे येताना डाव्या हाताला आपण वळलो की जो पोखरण रोड सुरू होतो त्याला पोखरण रोड नं. 1 म्हटलं जातं आणि  हा रोड तसाच पुढे जाऊन जेव्हा जुन्या ग्लॅक्सो कंपनीकडे येतो तेव्हा तो पोखरण रोड नं. 2 होऊन जातो. ह्या दोन पोखरण रोडच्या संगमावर कालचा पोखरण तलाव आणि आजचा उपवन तलाव आहे. ठाणं विकसित होत गेलं, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर त्याचा मेक ओव्हर होत गेला तसं ह्या पोखरण तलावाचं उपवन तलाव असं बारसं कधी झालं ते कळलंच नाही.

पोहणाऱ्यांची आवड असणारा मोकळाढाकळा तलाव

अर्थात, हा तलाव पोखरण तलाव म्हणून ओळखला जात होता तेव्हा तो उघडावागडा होता. त्याचं रुपडं साधंसरळ, मोकळंढाकळं होतं. त्याच्यावर कसला कठडा नव्हता., कसलं कुंपण नव्हतं, कसला अडथळा नव्हता. मिसरूड न फुटलेलं पोरगंही तलावाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तलावातल्या पाण्यात सूर मारू शकायचं. पाण्यात स्वत:चा देह बुचकळून काढून तलावाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो बाहेर काढू शकायचा. पोहण्याची आवड असणाऱ्या ठाण्यातल्या जलतरणपटूंसाठी उपवन तलाव म्हणजे एक खुलं व्यासपीठ असायचं. कुणीही ह्या तलावाच्या काठावर बसून पाण्यात छोटासा खडा भिरकावून त्यावरचे तरंग जवळून निरखू शकायचं. तलावाच्या शांत, संथ पाण्यात अलगद आपले पाय टाकून बसू शकायचं. आपलं मनमोहक प्रतिबिंब पाण्यात न्याहाळू शकायचं. मात्र पावसाळ्यात पाण्याचा अंदाज नसल्यानं नव्वदीच्या दशकापर्यंत दर पावसाळ्यात एक तरी बळी या तलावात जायचाच. मग पुढं काठ बांधून सुरक्षाफलक लावण्यात आले.

                                     उपवन तलावाचे सुशोभिकरण

चकचकीतपणात हरवलेला जुना बाज

…पण पोखरण तलावचा उपवन झाल्यापासून मात्र हे चित्र पूर्णपणे बदललं. हा मोकळाढाकळा, उघडावागडा तलाव बंदिस्त झाला. साधी खाकीपावडर लावून आपलं गावरान सौंदर्य मिरवण्याचं भानही नसणाऱ्या एखाद्या गावच्या परकरी पोरीने शहरातल्या पॉश सॅलॉनमध्ये ब्लिचिंग-फेशियल  करून आलिशान बाल्कनीत ऐटीत उभं राहावं तसं ह्या तलावाचं झालं. कुणी म्हणेल की ह्या तलावाने कात टाकली. असेलही कात टाकली. असतीलही ह्या तलावावर नव्या सुखसोयी आल्या. असतीलही काठावरची माणसं कोणत्याही धोक्यापासून मुक्त झालेली. पण ह्या तलावाचं ते जन्मजात रूप, नैसर्गिक स्वरूप दिसेनासं झालं. तो जुना तलाव हरवला, साफ बेपत्ता झाला.

हे ही वाचा : ठाण्याचे शिक्षणमहर्षी डॉ. वा. ना. बेडेकेर

हिंदी चित्रपटांचं शूटिंग उपवनला

त्या जुन्या तलावाचा एक काळ होता जेव्हा तिथे त्रिमुर्ती नावाच्या एका हिंदी सिनेमाचं शुटिंग झालं होतं. तेव्हा आजच्या तरूणांच्या दिलाची धडकन असलेल्या ह्रुतिक रोशनचे पिताश्री राकेश रोशन तिथे आले होते, त्या काळचा कॉमेडियन असराणी, दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी होती. चरित्र अभिनेते ए.के. हंगल होते. अपर्णा चौधरी नावाची एक दुर्लक्षित अभिनेत्री होती. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक होते राजेन्द्र भाटिया. अशा काही सिनेमांची शुटिंग्ज तिथे अधुनमधून व्हायची. पण हा तलाव नंतर कठडे लावून बंदिस्त झाला, तिथे रेस्टॉरन्ट्‌स आली आणि सिनेमावाल्यांसाठी ते शुटिंगचं लोकेशन वाटेनासं झालं. तसे एखादे टीव्ही सिरीयलवाले इथे येऊन गेलेही, पण ते तेवढेच. तेवढ्यापुरतेच.

 तसं म्हटलं तर तलावाचं आधुनिकीकरण झालं हे निविर्वाद. परिणामी, बनारसमध्ये  जसे घाट असतात तसा उपवनला घाट झाला. तलावालगतच्या गणपती मंदिराचा विस्तार झाला. त्यासाठी गणपती मंदिराच्या मागची पुर्वीची बाग नाहीशी झाली. तलावात भर टाकून त्या भरावावर रेस्टॉरन्ट झालं. जुन्या तलावाचा चेहरामोहरा बदलून गेला. तळ्यातल्या लहान कारंजाच्या जागी मोठं म्युझिकल फाउंटन आलं. पुर्वी ठाणे किंवा आसपासच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सहली ह्या तलावाच्या ठिकाणी यायच्या. तिथली बाग गेली आणि सहली थांबल्या. पण गेले काही वर्ष संध्याकाळचा म्युझिकल फाउंटन शो बच्चे कंपनीसोबत मोठ्यांनाही ओढून आणतोय. बागेच्या बाजूला असलेलं विश्रांतीगृहासारखं ठिकाणही गेलं. आज त्या ठिकाणी महापौरांचं निवासस्थान आलं.  पुर्वीचं ते रंगरूप मात्र हरवून गेलं.

                   उपवन आर्ट फेस्टिवल दरम्यान केलेली रोषणाई

गणपती विसर्जनाचा थाट, उत्साह

एक जमाना असा होता की गणपती विसर्जनाला भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे ह्या तलावावर लोटायचे. भाविकांनी हा परिसर नुसता फुलून यायचा. गणपतीच्या विसर्जनाआधी आरत्या व्हायच्या. अबीरगुलालांच्या रंगात भाविक रंगून जायचे. वातावरण भक्तवत्सल होऊन जायचं. पण आता गणपतीतलं ते वातावरण तिथे दिसत नाही. आता गणपतींचं विसर्जन ह्या तलावाच्या बाजूला असलेल्या पालायदेवीच्या मंदिरामागे कृत्रिम तलाव बनवून केलं जातं.

हे ही वाचा : ऐतिहासिक घोडबंदर किल्ला

प्रोफेशनल लुकमध्ये हरवलेलं धीरगंभीरपणा

आज ह्या तलावाभोवती एका बाजुला गगनचुंबी इमारती झाल्या आहेत. एकेकाळी दगड फोडण्याचा छोटेखानी कारखाना जिथे होता तिथे हॉटेलं झाली.  वर्षातून एकदा आर्ट फेस्टिव्हल होऊ लागलं. गणपती मंदिरात माघी गणपतीचा सोहळा होऊ लागला. त्याआधी हे चित्र नव्हतं. हा तलाव आणि वर्तक नगर कॉलनीनंतर वसवलं गेलेलं शिवाई नगर ही बैठी वस्ती ह्यामध्ये सगळं माळरान होतं. रस्ता वैराण असायचा. पण आता मात्र ही परिस्थिती बदलून गेली. उपवन परिसर आणि तलाव आता एकटा राहिला नाही. त्याला आता मुलामाणसांची, लोकवस्तीची रात्रीअपरात्री सोबत झाली. मध्यरात्रीपर्यंत तिथली वर्दळ वाढली. दुचाकी आणि तिचाकींची रहदारी वाढली…आता कोणे एके काळचा पोखरण तलाव कालबाह्य झालाच, पण उपवन तलावाचा धीरगंभीरपणाही गेला. तलाव जणू प्रोफेशनल झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

टेंभी नाका परिसरातच कलेक्टर ऑफिस,जिल्हा न्यायालय, जिल्हा इस्पितळ, ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी शाळा अशा गोष्टी एकवटलेल्या होत्या. त्यामुळेच 175 वर्षांपूर्वी
Thane : प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी हे प्रा. संतोष राणे
Thane : आंबेडकरी समाजासाठी 14 एप्रिल ही नुसती दररोजच्या धबडग्यातली एक तारीख नसून हा एक लाखमोलाचा दिवस असतो. रोजघडीच्या कामातून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ