अशोक समेळ — रंगभूमीवरील सात्त्विक ‘बहुरूपी’

Thane : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, गीतकार, कवी, वक्ता, मार्गदर्शक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक रूपं घेणारे अशोक समेळ हे खर्‍या अर्थाने बहुरूपी कलाकार आहेत.
[gspeech type=button]

कलाकार ही उपाधी मिळवणं जितकं सोपं वाटतं, तितकंच ती कायम टिकवणं कठीण असतं. कारण कलाकार होण्यासाठी अभिनय, लेखन, दिग्दर्शन या तांत्रिक बाबींइतकंच, मनाच्या खोल गर्भात  समज, सहानुभूती आणि सामाजिक भान या गोष्टी जपाव्या लागतात. अशा सर्व बाजूंनी समृद्ध असलेलं एक नाव म्हणजे ठाणेकर अशोक समेळ. एकाच वेळी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, गीतकार, कवी, वक्ता, मार्गदर्शक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक रूपं घेणारे अशोक समेळ हे खर्‍या अर्थाने बहुरूपी कलाकार आहेत.

1943 साली अशोक समेळ यांचा जन्म झाला. लहानपणी गरिबीला सामोरं जात जात रंगमंचावर उभं राहण्याची धडपड त्यांनी लहानपणापासूनच सुरू केली. शिक्षण मुंबईत झालं आणि तिथल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांनी त्यांच्यातला कलावंत आकार घेत गेला. पुढे त्यांनी रंगभूमीच्या, टेलिव्हिजनच्या आणि मराठी-गुजराती साहित्यविश्वाच्या अनेक क्षितिजांना स्पर्श केला.

मराठी रंगभूमीवर अमिट ठसा

अशोक समेळ यांच्या ‘तो मी नव्हेच’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘मी मालक या देशाचा’, ‘अवघा रंग एकच झाला’, ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या नाट्यकृती केवळ रंगभूमीवर गाजल्या नाहीत, तर अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरल्या. या प्रायोगिक चळवळीतून त्यांनी सर्व ठाणेकरांना घेऊन “संन्यस्त ज्वालामुखी” हे 40 तासाचं सलग 11 प्रयोग करणारं विक्रमी नाटक सादर केलं. हा विक्रम “लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंदवण्यात आला. ही बाब ठाण्यालाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आभिमानास्पद ठरली.

हे ही वाचा : ठाण्याचे कवि मन- प्रा. प्रवीण दवणे

दूरचित्रवाणीवर उल्लेखनीय कामगिरी

केवळ नाट्यक्षेत्रच नव्हे तर दूरचित्रवाणीवरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अल्बम, तिसरा डोळा, आई, हे बंध रेशमाचे, सखे सोबती, सांजभूल, श्रीमंताची लेक या मालिका घराघरांत पोहोचल्या. त्यांचं लेखन, संवादफेक आणि अभिनय या सगळ्यांतून संवेदनशीलतेचं दर्शन घडतं. त्यांनी 2 हजारहून अधिक मालिकांचे भाग लिहिले आणि अनेक मालिका दिग्दर्शितही केल्या.

गुजराती रंगभूमीसाठी योगदान

‘सुगंधनुं सरनामूं’, ‘कचिडो’, ‘सुतारनुं तातने…’, ‘गंगाजळ’ ही त्यांची नाटकं गुजराती रंगभूमीवर अधिक लोकप्रिय ठरली. मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबर गुजराती भाषासुद्धा त्यांना अवगत होती. या गुजराती भाषेचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. गुजराती रंगभूमीवरील त्यांचं योगदान वाखाण्याजोगं होतं. त्यामुळे कोणा लेखकाला गुजराती रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर समेळ यांचे नाव अग्रस्थानी लिहावे लागेल. तब्बल 27 नाटके त्यांनी गुजराती रंगभूमीवर सादर केली. त्यांनी स्वत:ला, त्यांच्या सर्जनशीलतेला आणि त्यांच्यातला कलाकाराला कोणत्याच भाषिक सीमेमध्ये अडकवून ठेवलं नाही. 

ठाण्यात कलाकार घडवले

महानगरपालिकेच्या साहाय्याने आणि महापौरांच्या मदतीने गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना रंगभूमीच्या आणि लेखनाच्या दुनियेत पुढे जाण्यासाठी त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केलं. ठाण्याच्या टेंभीनाका भागात त्यांनी प्रायोगिक नाट्य चळवळ उभारली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. 

एकदा त्यांच्या संपूर्ण रंगमंच साहित्याचं, वेशभूषेचं आणि नेपथ्याचं सामान आगीत जळून खाक झालं. पण या घटनेने हताश न होता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सर्जनशीलतेचा ध्यास घेतला. ही जिद्दच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

हे ही वाचा : ठाणेकरांच्या मनातील राजे ‘धर्मवीर आनंद दिघे’!

साहित्यिक समेळ

 ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’, ‘स्वगत’, ‘ते आभाळ भीष्माचं होतं’, ‘सप्तचिरंजीव अश्वत्थामा’ अशा त्यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांनाही मंत्रमुग्ध केलं आहे. वक्तृत्व आणि अध्यात्म यांचीही जोड त्यांच्या जीवनात आहे. विविध व्यासपीठांवरून त्यांनी समाजप्रबोधनपर व्याख्यानं दिली आहेत. त्यांच्या बोलण्यात एक अंतर्मुख करणारी साधना आहे. त्यामुळेच ते केवळ ‘कलाकार’ म्हणून नव्हे, तर ‘सांस्कृतिक मार्गदर्शक’ म्हणूनही ओळखले जातात.

सन्मानमूर्ती अशोक समेळ

मामा वरेरकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, नाट्यदर्पण सन्मान, ठाणे गौरव, ठाणे नगर रत्न,  राम गणेश गडकरी पुरस्कार, गंधार गौरव पुरस्कार यासारख्या तब्बल 34 मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यालं आहे. मात्र या सर्व पुरस्कारांपेक्षा, त्यांची साधी राहणी हीच जास्त मनाला भावणारी आहे. 80 वर्षांचा वयाचा टप्पा पार करूनही आजही ते मालिकांमध्ये, नाटकांत आणि लेखनात सक्रिय आहेत. ते म्हणतात, “ज्याचं जीवनच रंगमंच आहे, त्याला निवृत्तीचा प्रश्नच पडत नाही!”

खऱ्या अर्थाने ठाणे भूषण

समाज, संस्कृती, साहित्य, रंगभूमी यांचे एकत्रित दर्शन घडवणारं त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथच आहे. अशोक समेळ हे केवळ नाव नाही, तर एका शतकाच्या मराठी रंगभूमीचा जिवंत इतिहास आहे. आणि अशा कलासंपन्न व्यक्तीमत्त्वाचा ठाणे जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane: संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावरच पहिलं मराठी साहित्य संमेलन ठाण्यात झालं होतं. या संमेलनाचा एकूण अंदाजे खर्च 24 हजार रुपये
Thane : विठ्ठल सायन्ना हे अव्वल इंग्रजी काळातले एक नामवंत बांधकाम व्यावसायिक होते. ठाणे, मुंबई आणि पुणे येथे त्यांनी उभारलेल्या
Thane : 1893 साली एका घराच्या ओसरीवर सुरू झालेल्या ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ या ठाण्यातील पहिल्या ग्रंथालयानं आधुनिक पिढीशीही नाळ जोडली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ