ठाण्यात पश्चिमेकडे उतरल्या उतरल्या पूर्वी सगळ्यात जास्त लक्ष वेधून घ्यायचा तो अशोक सिनेमा. त्याचं कारण, हे सिनेमागृह ठाणे स्टेशनाच्या अगदी जवळ होतं. ठाण्यात कोर्टकचेरीच्या कामांसाठी वगैरे आलेले लोक त्यांचं काम जर का रेंगाळलं की ह्या सिनेमागृहात जाऊन टाइमपास म्हणून लागला असेल तो सिनेमा बघून यायचे. तोपर्यंत सिडकोकडे ठाणा कॉलेज उभं राहिलं नव्हतं. पण लवकरच ते उभं राहिलं. कॉलेजकुमार आणि कॉलेजकन्यका लेक्चर बंक करून किंवा कॉलेज सुटल्यावर, तसाच एखादा गाजलेला किंवा न गाजलेलाही सिनेमा बघायला ह्या अशोकवनात येऊ लागल्या.
स्टेशनशेजारचं अशोक टॉकिज
पूर्वी सिनेमागृहात राज कपूर सप्ताह, देव आनंद सप्ताह असायचे. त्या संपूर्ण आठवड्यात राज कपूरचे, देव आनंदचे एकेक सिनेमे दाखवले जायचे. अशोक सिनेमांसारख्या सिनेमागृहांत हे सिनेमे बघायला दर्दी सिनेमाप्रेमी गर्दी करायचे. त्या एका काळात ठाण्यात फक्त दोनच सिनेमागृहं होती. एक हे अशोक आणि दुसरं अशोक सिनेमागृहापासून एका हाकेच्या अंतरावर भंडार आळीकडे असलेलं प्रभात.
ठाण्याची सिनेमा भूक भागवणारी आद्य टॉकिजं
ओंजळीएवढ्या असलेल्या ठाण्याची सांस्कृतिक भूक तेव्हा ह्या फक्त दोन सिनेमागृहांवर भागायची. ही दोन्ही सिनमागृहं ठाणेकरांनी तुडुंब भरायची. हाउसफुल्ल व्हायची. दोन्ही सिनेमागृहांच्या दारावर हाउसफुल असा बोर्ड झळकायचा. हीच ती वेळ असायची सिनमाची तिकिटं ब्लॅक करून आपलं उखळ पांढरं करणाऱ्यांची. दो का पाच, दो का पाच असं कानाकडून हळुच पुटपुटत जाणाऱ्यांची. दोन रुपयांचं तिकिट तेव्हा पाच रूपयांत ब्लॅक व्हायचं ह्याचा अर्थ पाच रूपयाला त्या काळात काय मोठी किंमत होती बघा! आज मंदिराच्या पायरीवर बसलेल्या कटोऱ्यात पडणाऱ्या पैशाचं किमान मूल्य पाच रूपये असू शकतं. आज हेही लक्षात येतं की तेव्हा अवघ्या दोन रूपयांत डोळे भरून सिनेमा बघायला मिळायचा. आज तर दोन रूपयांत कधी कधी एखादं चॉकलेटही मिळण्याची वानवा असते. असो, ह्या लेखाचा तो विषय नाही. विषय आहे ठाण्यातल्या सिनेमागृहांचा.
हे ही वाचा : …हे ठाणं त्यांचं नाही!
प्रभातमधला रौप्य महोत्सवी सिनेमा
प्रभात सिनेमाचा विषय निघाला आहे म्हणून एक आठवण सांगायला हवी की तेव्हा तिथल्या मॉर्निंग शोचं तिकीट एक रूपये पाच पैसे इतकं अल्पस्वल्प असायचं. प्रभात सिनेमाबद्दल आणखी एक आठवण सांगायची तर, तेव्हा प्रचंड गाजलेला ‘जय संतोषी माँ’ हा पौराणिक सिनेमा प्रभात सिनेमात तब्बल पंचवीस आठवडे चालला म्हणजे चक्क रौप्य महोत्सवी ठरला. त्यावेळचे सिनेमे एखाद्या सिनेमागृहात पंचवीस आठवडे, पन्नास आठवडे असे चालून ज्युबिली हीट व्हायचे. किती आठवडे सिनमे चालले, हे तेव्हा सिनेमांच्या यशाचं परिमाण असायचं. वंदना सिनेमागृहात ‘अमर, अकबर, अँथनी’ पंचवीस आठवडे चालला. प्रभात सिनेमातल्या ‘जय संतोषी माँ सिनेमा’च्या वेळी तर ठाण्यातले काही देवभोळे लोक म्हणे पडद्यावर संतोषी माता प्रकटताच थैलीतून आणलेला नारळ फोडायचे आणि नारळाचं पाणी शिंपडायचे.
बदलत्या काळातले वंदना, मल्हार, आनंद, आराधना
असो. काही काळानंतर ठाणं विस्तारत गेलं. मोठ्या संसारात खाणारी तोंडं वाढत जातात तशी ठाण्यात सिनेमा बघणाऱ्यांच्या डोळ्यांची संख्या वाढत गेली आणि वंदना, गणेश, मल्हार अशी सिनेमागृहं आकाराला आली. ही सगळी नव्या युगाप्रमाणे वातानुकुलित सिनेमागृहं होती. तोपर्यंत अशोक आणि प्रभात ही सिनेमागृहं वातानुकुलित नव्हती. उन्हाळ्यात घामाने अंग चिंब निथळून टाकणारी होती. वंदना, मल्हार, गणेश, आराधना, आनंद ह्यासारखी वातानुकुलित सिनेमागृहं झाल्यानंतर वातानुकुलित नसणाऱ्या अशोक आणि प्रभातला ठाण्याचे रसिक लोक सापत्नभाव दाखवणं साहजिक होतं. पण तरीही ही दोन सिनेमागृहं वातानुकुलित सिनेमागृहांच्या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहिली.
मल्टिप्लेक्स प्रभात आणि जमीनदोस्त अशोक
नंतर मात्र प्रभात सिनेमागृहावर बुलडोझर चालवला गेला आणि तिथे भव्यदिव्य मॉल उभारण्यात आला. प्रभातचा सिंगल स्क्रीन म्हणजे एकल पडदा काळाच्या पडद्याआड गायब झाला. तिथे मल्टि स्क्रीन म्हणजे बहू पडदा आला. मोठ्या माशाने छोट्या माशांना गिळून स्वाहा करावं तसं हे आक्रमण होतं. हे आक्रमण झुगारूनही ही सिंगल स्क्रीन सिनेमागृहं आपला पडदा कशीबशी उजळवत राहिली ही निश्चितच टिकून राहण्याची चिकाटी होती. पण काळाच्या ओघात हळुहळू ह्या चिकाटीला शेवटचा श्वास हा घ्यावा लागलाच. काही काळापुर्वी अशोक सिनेमागृह जमीनदोस्त झालं.
हे ही वाचा : ठाणे स्टेशन – गोदाम ते सॅटिस!
मॉलने गिळलेले सिंगल स्क्रीन
आराधना तर केव्हाच दिसेनासं झालं. वंदना, गणेश ह्यासारखी बाकीची सिनेमागृहं आपलं अस्तित्व जपून राहिली, पण एक सिनेमागृह म्हणून त्यांचा अवतार हळुहळू संपत गेला. हळुहळू मॉल संस्कृतीने ठाण्यात आपला झेंडा रोवला. कोरम, व्हिवियानासारखे भव्यदिव्य मॉल उभे राहिले आणि भव्यदिव्यतेच्या प्रेमात आकंठ बुडालेली ठाण्यातली नवी पिढी मल्टि स्क्रीनसमोर गर्दी करू लागली. अशोक, प्रभात, गणेश, आनंद, वंदनामधली गर्दी ओसरू लागली. ह्या सिनेमागृहांना जमेत धरणंच मग लोकांनी सोडून दिलं.
नवीन तंत्रज्ञानात हरवलेली जुनी सिनेमागृह
…म्हणजे आधी वातानुकुलित नसलेलं अशोक आणि प्रभात सिनेमागृह असलेलं ठाणं, कालांतराने गणेश, वंदना, आराधना, आनंद अशी वातानुकुलित सिनेमागृहं असलेलं ठाणं आणि आता तर मॉलच्या खोबणीत बसवलेली सिनेमागृहं अशी तीन स्थित्यंतरं किंवा कदाचित तीन मध्यंतरं एकूण जगरहाटीप्रमाणे ठाण्यातही घडून आली. तोपर्यंत सिनेमाचं तंत्रही बदलून गेलं होतं. सिनेमॅटोग्राफी, ध्वनीयोजना वगैरे गोष्टीही विकसित झाल्या होत्या. त्या सगळ्या भव्यदिव्य सिनेमागृहातच शोभून दिसू लागल्या होत्या. परिणामी, सिंगल स्क्रीन असलेली सिनेमागृहं अडगळीत पडणं साहजिक होतं.
अर्थात, इतिहासाच्या पानात जुन्या पाउलखुणा दिसतात आणि त्या विसरल्या जात नाहीत. तसं आजही ठाण्यातल्या ह्या जुन्या सिनेमागृहांचा कुणाला विसर पडलेला नाही. आजही रिक्षावाल्यांना एखाद्या ठिकाणाचा लॅन्डमार्क म्हणून ह्या जुन्या सिनेमागृहांची नावं घेतली जातात. ह्या सिनेमागृहांचे भग्न अवशेषही मागे उरले नसले तरी….