साल 1975. बरोबर पन्नास वर्षांपुर्वींची गोष्ट. मी नुकताच एसएससी झालो होतो. दहावी एसएससीची आमची ती पहिलीच बॅच होती. मला कॉमर्सला जायचं होतं. तसं मी ते आधीच ठरवलं होतं. त्यावेळी परीक्षेत पास झालेल्यांचे नंबर सगळ्या वर्तमानपत्रांत छापून यायचे. वर्तमानपत्रांची सात-आठ पानं ह्या नंबरांनी भरून गेलेली असायची. मी पास झालो आहे हे मला निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशीच ठाण्यातल्या दैनिक सन्मित्रच्या कचेरीत कळलं होतं.
निकाल घोषित करणारं वृत्तपत्र कार्यालय
दैनिक सन्मित्रच्या कचेरीत एसएससीच्या बोर्डाच्या निकालाचं जाडजुड पुस्तक त्यावेळी यायचं आणि एसएससीच्या परिक्षेला बसलेल्या मुलांचा गराडा त्या कचेरीभोवती पडायचा. एसएससी निकालाच्या दिवशी ठाण्यातल्या दैनिकाच्या ह्या कचेरीकडे दरवर्षी हे दृष्य असायचं. एसएससीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ह्या गर्दीच्या चेहऱ्यावर एक काळजीयुक्त उत्सुकता असायची. काही अंशी ताणतणावही असायचा, पण आपण पास झालो आहोत ही बातमी कळल्यावर त्याच चेहऱ्यावर आनंदाची एक लकेर उमटायची. क्वचित कधी तिथे पेढ्यांचा बॉक्स आणला जायचा. तो गर्दीत वाटता वाटता रिकामा व्हायचा. रिकामे झालेले असे बरेच बॉक्सेस गर्दीतून चालताना पायाखाली यायचे. आपला नंबर न आढळून आलेले काही निराश, काळवंडलेले चेहरेही नजरेला पडायचे. पण त्यांची संख्या तशी कमीच असायची.
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी धावपळ
त्या गर्दीचा नंतरचा सूर मात्र वेगळा असायचा. आता आपण पास तर झालो आहोत, पण पुढचं काय, असं एक भलंमोठं प्रश्नचिन्ह काहींच्या कपाळावर असायचं. गलेलठ्ठ गुण मिळविलेल्या मुलांना मुंबईतल्या नामांकित कॉलेजात धाव घ्यायची असायची. नामांकित कॉलेजांच्या यादीत रूइया, रूपारेल, सोमैया, झुनझुनवाला अशी बडी नावं असायची. चांगल्या गुणांसह चांगल्या कॉलेजला आता रेल्वेने जाता येणार याचाही ह्या मुलांना आनंद असायचा.
आमच्यासारख्या वर्तणुक बरा/बरी/बरे, वरच्या वर्गात गेला अशा प्रजातीतील विद्यार्थ्यांना मुंबई वगैरे कशाला, गड्या आपला गाव बरा असं वाटायचं आणि आम्ही आपलं ठाणे पसंत करायचो म्हणजे ठाण्यातलं ठाणा कॉलेज आम्हाला बरं वाटायचं.
ठाणा कॉलेजमधली प्रवेश प्रक्रिया
निकालाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला वगैरे घेऊन ठाणा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दाखल व्हायचो.
1975 च्या सुमारास ठाणा कॉलेजात मात्र वेगळंच वातावरण असतं. एसएससी निकालाच्या दुसऱ्या दिवशी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची काही प्रमाणात गर्दी असते, पण ती प्रचंड मोठी गर्दी नसते. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश घेताना फार कष्ट पडत नाहीत. कुणा थोरामोठ्याची चिठ्ठी आणावी लागत नाही, कुणा थोरामोठ्याचा वशिला लावावा लागत नाही. रांगेत उभं राहिलं की सहज प्रवेश मिळतो. यथावकाश, नोटीस बोर्डावरच्या प्रवेश मिळालेल्यांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश झाल्याचं दिसतं. साहजिकच प्रत्येकाच्या मनाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. ह्यात इतक्या सहजासहजी प्रवेश मिळाल्याच्या समाधानाची ही जोड असते.
हे ही वाचा : ठाण्याचे शिक्षणमहर्षी डॉ. वा. ना. बेडेकेर
ठाणा कॉलेजमध्ये सहजगत्या प्रवेश का मिळायचा?
ठाणा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आम्हाला काही अडचणी यायच्या नाहीत. कारण साधंसोपं होतं. ठाणा कॉलेज नुकताच सुरू झालेलं. ते तितकं नावारुपाला आलं नव्हतं. त्याऐवजी मुंबईतली कॉलेज ही खूप प्रसिद्ध होती. त्या कॉलेजमधले प्राध्यापक मंडळी जास्त नामांकित, जास्त विद्वान वाटत असतं. मुंबईतल्या कॉलेजमध्ये शिकायला जाणं प्रतिष्ठित समजलं जायचं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं ही अशा प्रसिद्ध कॉलेजला प्रवेश घ्यायला जात असल्यामुळे ठाणा कॉलेजला विद्यार्थ्यांची फारशी गर्दी नसायची म्हणून सरसकट सगळ्याना प्रवेश मिळायचा.
काळाच्या औघात चित्र बदललं…
हळुहळू हे चित्रं साफ बदलून गेलं. ठाणे कॉलेजचा भाव वधारतो. एसएससीच्या परीक्षेत गुणांचं घबाड मिळवणाऱ्यांनाही तिथे प्रवेश मिळवणं कठीण होऊन जातं. बड्या बड्या धेंडांचा वशिला लावूनही तिथे प्रवेश मिळत नाही. ठाण्यातून मुंबईतल्या कॉलेजात शिकायला जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनाही दुसरी पसंती म्हणूनही ठाणा कॉलेजचं दार किलकिलं होत नसतं. ठाण्याचा विस्तार होतो, ठाण्याच्या लोकसंख्येत वाढ होते म्हणून हा परिणाम होतो हे खरं असलं तरी ठाणा कॉलेजच्या प्रतिमेचं संवर्धन एव्हाना झालेलं असतं हा भागही असतोच.
सर्वसाधारण गुण असूनही आमच्यासारख्या ज्या विद्यार्थ्यांना ठाणा कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळालेला त्यांना 90 टक्क्यांच्या आसपास गुण मिळविलेल्या मुलांना ठाणा कॉलेजला प्रवेश मिळत नसल्याचं पाहून आश्चर्य वाटतं. पूर्वी कोणतिही चौकशी न करताच कॉलेजच्या परिसरात जाता यायचं. मात्र आता कॉलेजचं आयडी कार्ड व काय काम आहे हे सांगितल्याशिवाय गेटवरुन आत सोडत नाही एवढी परिस्थिती बदलली आहे. कॉलेजच्या इमारतीचाही विस्तार केला आहे. पुर्वीचं ठाणा कॉलेज आणि आजचं ठाणा कॉलेजच्या चेहरामोहऱ्यासह प्रत्येक स्तरावर फरक दिसून येतो.
ठाणा कॉलेजप्रमाणे दैनिक सन्मित्रच्या कचेरीकडचं वातावरण ही आता बदललेलं आहे. तिथेही आता पूर्वीसारखी एसएससीच्या निकालादिवशी गर्दी जमत नाही. निकालाची उत्सुकता असलेले चेहरे आणि आनंद व्यक्त करणारे विद्यार्थी हे चित्र आता रस्त्यावर पाहायला मिळत नाही. हा काळाचा महिमा असतो. त्याला उपाय नसतोच!