स्वतःला कोकण नृपती म्हणवून घेणाऱ्या शिलाहारांची राजधानी असलेल्या ‘श्री स्थानक’ अर्थात ठाणे शहराचा हा प्राचीन इतिहास आज फक्त ताम्रपट आणि शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो. या काळाच्या खाणाखुणा ठळकपणे सांगणारी एकही वास्तू आज दुर्दैवाने अस्तित्वात नाही.
राष्ट्रकुटांचे मांडलिक ‘शिवभक्त’ शिलाहार!
ठाण्याच्या इतिहासाचा कालक्रम सांगतो की, 9 व्या शतकापासून ते साधारण 12 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ठाण्यावर शिलाहारांची राजवट होती. हे शिलाहार मुळचे कोकणातले नव्हते. तर त्यांचं मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (तगर) हे होते. शिलाहार हे राष्ट्रकुटांचे मांडलिक होते. 10 व्या शतकाच्या अखेरीस राष्ट्रकुटांची राजवट संपुष्टात आली आणि शिलाहार आपोआप स्वतंत्रपणे उत्तर कोकणाचा कारभार पाहू लागले. शिलाहार सम्राट अपराजित याने श्रीस्थानक म्हणजेच ठाणे ही आपली राजधानी केली. शिलाहार राजे धार्मिक वृत्तीचे होते. शिवभक्त होते. त्यांचे जे ताम्रपट सापडतात, त्यात वेगवेगळ्या मंदिरांना दिलेल्या दानांचा उल्लेख आढळतो. याच शिलाहार राजवटीत श्रीस्थानक अर्थात ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर अनेक मंदिरे उभारल्याचा उल्लेख मिळतो. आज यातील एकही मंदिर अस्तित्वात नाही. मात्र त्यातील अनेक मूर्ती ठाणे शहरात वेगवेगळ्या विभागात सापडल्या आहेत.
श्रीस्थानकाच्या बदलत्या राजवटी
शिलाहारांची राजवट देवगिरीच्या यादवांनी संपुष्टात आणली आणि श्रीस्थानकासह उत्तर कोकणावर आपले शासन सुरू केले. पुढे खिलजीच्या आक्रमणामुळे यादव साम्राज्य लयाला गेलं. त्यानंतर बिंब राजवंशाने उत्तर कोकणावर ताबा मिळवला. या राजवटीतील केशवदेव या राजाच्या राजमुद्रेत तो ‘ठाणे स्थानावरुन राज्य करतो’ असा उल्लेख आहे.बिंब राजवटीत शिलाहारांनी बांधलेली मंदिरे शाबूत राहिलीच, शिवाय बिंब राजांनीही नवीन मंदिरे उभारली.
पोर्तुगिजांचा मंदिरांवर घाला
ठाण्यातील वैभवसंपन्न मंदिरांना नजर लागली ती पोर्तुगिज राजवटीत. 16 व्या शतकात ठाण्यावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर पोर्तुगिजांनी आपले धर्मप्रसाराचे धोरण पुढे रेटताना ठाण्यातील बहुतेक सगळी पुरातन मंदिरे जमिनदोस्त केली. या मंदिरांच्या अवशेषांचा वापर इमारतींच्या पायासाठी केला आणि त्यातील मूर्ती भग्न केल्या किंवा तलावात बुडवल्या. या सपाट्यात मासुंदा तलावाकाठची सगळी मंदिरे नष्ट झाली. पोर्तुगिजांची जुलमी राजवट असह्य झाल्यामुळे अणजूरच्या नाईकांनी पेशवे थोरले बाजीराव यांना मदतीसाठी विनंती केली.
मासुंदा तलावात अर्धवट बुडालेलं शिवलिंग
सन 1737 मध्ये चिमाजी आप्पांनी अणजूरकर नाईकांच्या मदतीने ठाण्यावर स्वारी करुन ठाणे जिंकून घेतले. आणि पोर्तुगिजांनी यावेळी ठाण्यातून पळ काढला. ठाण्याची व्यवस्था लावत असताना मासुंदा तलावात अर्धवट बुडालेल्या अवस्थेतील भव्य शिवलिंग सापडलं. हाच बिंब राजवटीतील श्री कौपिनेश्वर. पोर्तुगिजांनी मंदिर उध्वस्त केलं. पण त्यांना शिवलिंग फोडता आलं नाही म्हणून त्यांनी ते मासुंदा तळ्यात बुडवलं होतं. पेशव्यांचे सुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांनी सन 1760 मध्ये श्री कौपिनेश्वराचे मंदिर नव्याने बांधून काढले आणि ठाण्याचे अधिदैवत पुन्हा एकदा सन्मानाने आपल्या गाभाऱ्यात विराजमान झाले.
4 फूट 3 इंच उंचीचे महाराष्ट्रातील भव्य शिवलिंग
आपण आज जे कौपिनेश्वर मंदिर पाहातो त्यातील गाभारा हा त्या काळात बांधलेला आहे. सुभेदार बिवलकरांनी जे मंदिर उभारले ते पूर्ण दगडी बांधणीचं होतं. श्री कौपिनेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात जे शिवलिंग आहे ते 4 फूट 3 इंच उंचीचे आहे आणि त्याचा घेर 12 फूटांचा आहे. आजही हे महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.
या शिवलिंगाला साजेसा भव्य नंदी त्याच्या समोर बसवण्यात आला आहे. शिवाय कौपिनेश्वर मंदिराच्या अंगणात शितलादेवी, श्री दत्तगुरू, कालिका माता, हनुमान, श्रीराम यांची मंदिरेही आहेत.या मंदिराच्या अंगणात पेशवेकाळातली एक खूण आजही पाहायला मिळते.
ठाणे शहराचे कोतवाल म्हणून अणजूरच्या नाईक बंधूंपैकी बुबाजी नाईक यांची नेमणूक झाली होती. सन 1746 मध्ये त्यांचे निधन झाले. तेंव्हा त्यांच्या पत्नी सती गेल्या, या सतीचे वृंदावन श्री कौपिनेश्वर मंदिराच्या अंगणात पाहायला मिळते. येथिल श्री दत्त मंदिराबाहेर दोन दीपमाळा आहेत. त्यावरील माहिती फलकानुसार त्या सन 1895 मध्ये उभारण्यात आल्या आहेत. या दिपमाळांच्या मध्ये एक छोटं पण अनोखं मंदिर पाहायला मिळतं. हे कामधेनूचं मंदिर आहे. या मंदिरात कामधेनू, कल्पवृक्षासह गुरू वसिष्ठ यांची मूर्ती स्थापन केलेली आहे.
1917 मध्ये मंदिर आवारातील गोसंमेलनात महात्मा गांधी उपस्थित
आधुनिक काळातील कौपिनेश्वर मंदिराची पहिली डागडूजी झाली ती सन 1897 मध्ये, त्यासाठी ठाणेकरांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून आठ हजार रुपयांचा निधी जमवला होता. या मंदिराच्या इतिहासात अनेक नामवंतांनी, मान्यवरांनी या जागृत देवस्थानाला भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1917 मध्ये याच मंदिराच्या आवारात गोभक्तांचे एक मोठे संमेलन भरले होते आणि त्याला खुद्द महात्मा गांधीजी उपस्थित होते अशी नोंद आहे.
ट्रस्टतर्फे ज्ञानकेंद्र हे अध्यात्म, धर्म, तत्वज्ञानाचे ग्रंथालय
ठाणे शहरामधील योगासनांचा सर्वात पहिला जाहीर वर्गही याच कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात सुरू झाला होता. योगाचार्य का.बा.सहस्रबुध्दे यांनी 1973 हा योगासनांचा वर्ग या मंदिराच्या आवारात सुरू केला होता. दरवर्षी कौपिनेश्वर मंदिरात चातुर्मासानिमित्त होणारी प्रवचने, किर्तने हे आजही ठाण्यातील नागरिकांचे आकर्षण आहे. श्रीरामजन्मापासून ते श्रीदत्तजयंतीपर्यंत विविध धार्मिक उत्सव मोठ्या थाटामाटात इथे साजरे होतात. शिवाय काहीवेळा श्रावण सोमवारी श्री कौपिनेश्वराला बर्फाची आरास केली जाते, तेव्हा ती पाहायला ठाण्यातले आबालवृध्द गर्दी करतात. 1977 साली कौपिनेश्वर मंदिराच्या ट्रस्टने अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान या विषयावरील माहितीपूर्ण पुस्तकांचे ‘ज्ञानकेंद्र’ हे मोठे ग्रंथालय सुरू करुन ठाण्यातीलच नव्हे तर बाहेरगावच्या अभ्यासकांचीही मोठी सोय केली आहे.
आता श्री कौपिनेश्वर मंदिराचे नाव ठाण्यात दरवर्षी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेशी जुळलेलं आहे. या भव्य शोभायात्रेचा आरंभ श्री कौपिनेश्वराच्या मंदिरामधूनच होतो. गेली हजार एक वर्षे हे प्राचीन शिवमंदिर ठाणे शहराच्या परंपरेला पावित्र्याची प्रभा देत उभे आहे.
संदर्भ – 1) श्रीस्थानकाचे शिलाहार – डॉ.रुपाली मोकाशी
2 ) असे घडले ठाणे — डॉ.दाऊद दळवी
9 Comments
आपल्या ऐतिहासिक ठाणे तथा श्री स्थानका बद्दल इतकी अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. कौतुक करावे तितके कमीच.
आपल्या पुरातन माहिती संशोधनाच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!
अशी इतिहासपुर्वक माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा….
Khoop chhan mahiti
Kudos to Dr Rupali, Dalvi sir and you
अथक संशोधन करून ठाणे शहराच्या सांस्कृतिक इतिहासाची सर्वसामान्य नागरिकांना ओळख करून देण्याचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
Khup chan mahiti
खूप छान माहिती , अशीच माहिती डेट रहा
खूप छान माहिती
दुर्मिळ, संग्राह्य माहिती.
खूप छान माहिती, येणार्या लेखा विषयी उत्सुकता आहे