ठाण्याचे ऐतिहासिक नाव ‘श्री स्थानक’ होते. या नावाचा एक अर्थ असाही सांगितला जातो की ज्या शहरात ‘श्री’ म्हणजे परमेश्वराचे स्थान वास्तव्य आहे असे शहर. या अर्थाची खात्री पटवणारी अनेक मंदिरे ठाणे शहरात आहेत.
सातशे-आठशे वर्षांपूर्वीच्या श्री कौपिनेश्वर मंदिरापासून ते अगदी या वर्षी बांधण्यात आलेल्या भव्य आणि देखण्या श्री तुळजाभवानी मंदिरापर्यंत ठाण्यात विविध दैवतांची मंदिरे पाहायला मिळतात. या सगळ्या मंदिरांमध्ये एक मंदिर मात्र सगळ्यात वेगळं, विशेष आहे, कारण ते चक्क देवतेऐवजी भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. हे मंदिर म्हणजे ठाण्याच्या दमाणी इस्टेट भागातील ‘विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर’. गेली 113 वर्षे हे मंदिर ठाणे शहराच्या लोक जीवनाचा हिस्सा झालं आहे. ज्यांच्या नावाने हे श्री दत्त मंदिर प्रसिध्द आहे ते विठ्ठल सायन्ना कोण होते आणि त्यांचं ठाण्याशी काय नात होतं? याचा इतिहास रंजक आहे.
विठ्ठल सायन्ना हे अव्वल इंग्रजी काळातले एक नामवंत बांधकाम व्यावसायिक होते. ठाणे, मुंबई आणि पुणे येथे त्यांनी उभारलेल्या अनेक भरभक्कम वास्तू आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. ज्यांच्या नावाची ओळख ठाण्यात एका श्री दत्त मंदिराच्या रुपाने जपलेली पाहायला मिळते. त्या नावाची एक गंमत आहे. त्या काळातील पध्दतीनुसार अनेक कागदपत्रांवर आणि सार्वजनिक जीवनात ‘विठ्ठल सायन्ना’ असाच उल्लेख पाहायला मिळत असला तरी त्यांचे पूर्ण नाव ‘विठ्ठल सायन्ना यादव’ असे होते. त्यांचे आज ठाण्यात राहाणारे वंशज ‘यादव’ हेच आडनाव वापरतात. तर हे विठ्ठल सायन्ना तसे मुळचे मुंबईचे. त्यांचे वडील हे आंध्र प्रदेशातून मुंबईत आले आणि कुलाब्यात राहू लागले. त्यांचा ब्रिटिश सैन्याला दूध पुरवण्याचा व्यवसाय होता.
विठ्ठल सायन्ना यांचा जन्म कुलाब्यातच 14 जानेवारी 1866 रोजी झाला. औपचारिक शिक्षण पूर्ण झाले नसले तरी विठ्ठलजी उपजत हुशार होते आणि विविध विषयांमध्ये त्यांना गती होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवल्यावर त्यांनी उपजिवीकेसाठी बांधकाम ठेकेदार म्हणून काम करायला सुरवात केली. त्यांनी अभियांत्रिकी किंवा वास्तु कलेचं शिक्षण घेतलेलं नव्हतं, मात्र या विषयांची त्यांना उपजतच जाण होती. वास्तुविशारदाने कागदावर रेखाटलेला आराखडा जसाच्या तसा प्रत्यक्षात उभारण्याची किमया त्यांना अवगत होती.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील पहिले सार्वजनिक मराठी ग्रंथालय!
त्यामुळेच तत्कालीन ब्रिटिश वास्तुरचनाकार आणि अभियंते यांची मर्जी त्यांच्यावर बसली. आपल्या कुशल कामगारांच्या मदतीने तेव्हा नव्याने घडत असलेल्या मुंबईतील अनेक इमारती बांधायची संधी विठ्ठलजींना मिळाली. गेली शंभरहून जास्त वर्षे दिमाखात उभी असलेली मुंबईतील ‘जनरल पोस्ट ऑफीस’ची इमारत, ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ (आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) अशा भव्य इमारती त्यांनीच बांधल्या आहेत. त्याच बरोबर ‘कावसजी जहांगिर हॉल’,’ रॉयल इन्स्टीट्युट ऑफ सायन्स’, ‘स्मॉल कॉज कोर्ट’,’ एलफिस्टन टेक्निकल स्कूल’ या इमारतीही विठ्ठल सायन्नां यांनीच उभारल्या आहेत. त्या काळात प्रचलीत असलेल्या ‘इंडो सार्सनिक’ वास्तूशैलीतील इमारती बांधण्यात त्यांचा हातखंडा होता.
याच विठ्ठल सायन्ना यांनी 1912 मध्ये त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक श्री नंदमहाराज यांच्या इच्छेवरुन ठाण्यात सुंदर दत्त मंदिर उभारलं, दमाणी इस्टेट भागातील हेच मंदिर आता विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर म्हणून ओळखलं जातं. 1914 मध्ये विठ्ठल सायन्ना आपल्या परिवारासह दत्त मंदिराच्या शेजारी राहायला आले आणि ठाणेकर झाले. याच वर्षी त्यांनी ठाणे-कळवा पूल नव्याने बांधला, जो पुढे शंभर वर्षे वाहतुकीसाठी वापरात होता. ठाण्यात उभारलेल्या दत्त मंदिराच्या मूळ वास्तुवर मुंबईतील म्युझियमच्या वास्तुरचनेचा प्रभाव होता. ही मंदिराची मूळ वास्तू जुनी झाल्यामुळे 1986 मध्ये पाडून आज दिसणारी नवी इमारत उभारण्यात आली.
या विठ्ठल सायन्ना दत्त मंदिराला शिर्डीचे श्रीसाईबाबा, संत गाडगे महाराज, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, पूजनीय कलावतीआई, अशा अनेक अधिकारी व्यक्तिंनी भेट दिली आहे. या मंदिरात बालगंधर्व, सवाइ गंधर्व, मा. कृष्णराव अशा मोठ मोठ्या कलावंतांनी मैफिली रंगवल्या आहेत. या मंदिरालगतची जमीन विकत घेऊन तिथे विठ्ठलजींनी शेती सुरू केली आणि त्या शेतातील उत्पादनावर ठाण्यात, मुंबईत अन्नछत्रे उघडली. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी’या तत्वाचा त्यांनी तंतोतंत अवलंब केला. विठ्ठलजींचे आणखी एक मोठे सामाजिक काम म्हणजे त्यांनी स्वखर्चाने पुण्याच्या पेरुगेटजवळील भावे हायस्कूलच्या नुतनीकरणासाठी त्यांनी इमारत बांधून दिली. त्यांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून त्या इमारतीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा बांधलेल्या अनेक उत्तमोत्तम वास्तुंमधून उमटवणाऱ्या आणि दानशुरतेने अनेकांचे जीवन उजळणाऱ्या विठ्ठल सायन्ना यादव यांनी 9 फेब्रुवारी 1932 रोजी या जगाचा निरोप घेतला. या दत्त मंदिराशिवाय ठाण्यातील आणखी एका वास्तूला विठ्ठल सायन्ना यांचे नाव देण्यात आले आहे. ती वास्तू म्हणजे ठाण्याचे ‘सिव्हिल हॉस्पिटल’. मात्र आजही विठ्ठल सायन्ना हे नाव त्यांनी बांधलेल्या दत्त मंदिरामुळे ठाणेकरांच्या मुखी असते. एका दानशूर व्यावसायिकाची आठवण ठाण्याने एका पवित्र मंदिरामधून जपली आहे.