गेल्या काही वर्षांपासून पाऊस कधी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पडतो, तर कधी जून महिना संपला तरी पाऊस पडत नाही.. हवामान बदलांमुळे आपल्या पर्यावरणावर परिणाम होत आहे. शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अवकाळी पाऊस, ओला किंवा सुका दुष्काळ यात शेतकरी सतत अडकून राहतो.
पण पूर्वी असं नव्हतं. पावसाळा म्हटलं की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला पावसाला सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र लागलं की, कोकणातल्या प्रत्येक घरात लगबग सुरू होते. कोकणात मृग नक्षत्राला ‘मिरग’ म्हणतात. या नक्षत्रात आकाशात ढग जमायला लागतात आणि रानात ‘मिरग’ किडा दिसू लागतो. मिरगाचे किडे दिसू लागले की शेतकऱ्यांची पेरणीची धांदल सुरू होते. पावसाचं आगमन म्हणजे कोकणातील लोकांसाठी मोठा सण असतो. चला तर, ‘मिरगा’च्या दिवसांत कोकणात काय काय केलं जातं ते जाणून घेऊया.
मिरग सुरू होण्याआधीची कामं
मिरग सुरू होण्याआधी घरावरची कौलं पत्रे साफ केले जातात. तडे गेलेली कौलं, पत्रे बदलली जातात. ‘भात लावणी’ करताना पावसात भिजू नये म्हणून वापरली जाणारी इरली माळ्यावरून काढून साफ करतात. मातीच्या घरांभोवती नारळाच्या झावळ्यांनी किंवा गवताने काठ्या लावून आवरण करतात. यामुळे मातीच्या भिंती पावसात भिजत नाहीत आणि त्यांचं संरक्षण होतं. कोकमं, आंब्याची साटं, मिठातल्या कैऱ्या, सांडगी मिरच्या, नाचणी इत्यादी गोष्टी उन्हात सुखावून त्यांचा साठा केला जातो.
मिरग म्हणजे काय?
मे महिन्याचा शेवट आला की, कोकणातील प्रत्येक गावात मिरगाच्या कामांची जोरदार तयारी सुरू होते. पिढ्यानपिढ्या कोकणातील लोक पावसाचं स्वागत एका खास, पारंपरिक पद्धतीने करतात. कोकणात परंपरेने चांगल्या पावसाची एकूण 7 नक्षत्रं मानली जातात. त्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, हस्त, चित्रा यांचा समावेश होतो. मृग हे पावसाचे पहिले नक्षत्र मानतात. यात चांगला पाऊस होतो. भाताच्या पेरणीकरता हा जोरदार पाऊस आवश्यक असतो, म्हणून मृगाचा मान खासचं असतो.
पहिला पाऊस पडला की, कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जातो आणि आपल्या देवाकडे भक्तीभावाने साकडं घालतो.
मिरग किडा आणि पेरणीची लगबग
जमिनीतून बाहेर येणारे लाल रंगाचे छोटे किडे दिसायला लागले की, समजायचं निसर्गात बदल व्हायला सुरवात झाली आहे. कारण हे किडे पावसाच्या सुरवातीच्या दिवसात दिसू लागतात. म्हणून या किड्याला ‘मिरग किडा’ असं म्हणतात. कोकणातील लाल मातीत हा मिरग किडा दिसू लागला की, पाऊस तोंडावर आल्याचं शेतकरी मानतात. आणि मग शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. तसंच या दिवसांत झाडांवर लूक – लूक करणारे काजवे देखील दिसतात.

याचबरोबर पहिला पाऊस सुरू झाला की, कोकणातील लोक चढणीचे मासे , खेकडे पकडायला जातात. मिरगात कोकणातील प्रत्येक घरात रात्री चुलीवर तिखट-मीठ लावून भाजलेले मासे किंवा माशांचं कालवण, खेकड्यांचा रस्सा हमखास असतोच.
मिरगाची राखण
मृग नक्षत्रात शेतकरी पहिल्या पावसाचं आणि शेतजमिनीची उत्साहाने पूजा करतात. यालाच कोकणात ‘मिरगाची राखण’ असं म्हणतात. मृग नक्षत्रापासून पुढील 15 दिवसातील कोणत्याही एका दिवशी हा ‘मिरग दिवस’ साजरा केला जातो. यावेळी काही लोक तिखटाची राखण देतात तर काही लोकं गोडी राखण देतात.
राखण देताना आधी राखणदेवाला गाऱ्हाण घातलं जातं. त्यानंतर तोच कोंबडा चुलीवर शिजवतात आणि घरातील सर्वजण एकत्र मिळून चवीने खातात. ही तिखटाची राखण वाराच्या दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार किंवा रविवारी दिली जाते. गोड्या राखणेत भाजी, भाकरी, भात, वरण आणि एखादा गोड पदार्थ बनवून तो देवाला दाखवून राखण साजरी करतात. मिरगाची राखण देऊन झाल्यानंतर शेतकरी जोमाने शेतात कामाला सुरुवात करतो.
मृग नक्षत्र सुरू झालं की, कोकणातील प्रत्येक घराच्या अंगणात लाकडाचा छोटा मांडव उभा करून त्याचा खाली उन्हाळ्यात सुकवलेल्या तोवशी , पडवळ, काकडी, मिरचीच्या बिया लावल्या जातात.
तर ,असा असतो आपल्या कोकणातला मिरग.