शेती करायला हल्ली कोणी सहजासहजी तयार होत नाही. कितीही विकास होत असला तरी शेतीशिवाय कशालाच पर्याय नाही. नोकरी-व्यवसाय हे कायमस्वरूपी नसतात, हे आपल्याला कोरोना काळात लक्षात आलं. शेती मात्र तुमचा उदारनिर्वाह व्यवस्थित होण्यासाठी शाश्वत पर्याय असल्याचंही आपल्या लक्षात आलं. नूतन मोहिते यांना हे 1983 मध्येच लक्षात आलं.
सासऱ्यांच्या निधनानंतर 52 एकर शेतीची जबाबदारी पडली
नूतन मोहिते सांगतात, सासरे आबासाहेब मोहितेंचे निधन झाल्यानंतर शेतीचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. सासऱ्यांच्या निधनानंतर शेतीचा एवढा मोठा व्याप सांभाळणारे कोणी नव्हते. हळूहळू मीच यामध्ये लक्ष घातले. ऊस आणि इतर पिकं घेतली. रेठरे गावात पहिल्यांदा सोयाबीनची पेरणी केली. त्यापूर्वी या भागात कोणी सोयाबीन करत नव्हते. ऊस शेती बरोबरच टोमॅटो, कोबी, फ्लावर यासारखे माळवे सुद्धा करण्यास सुरुवात केली आणि आजही करत आहे.
शेती करत असताना ट्रॅक्टर, जीप, बैलगाडी धाडसाने शिकले
“मी शेती करण्यास धाडसाने सुरुवात केली. त्यापूर्वी कधी शेतात काम करण्याची सवय नव्हती. शेतात काम करत करत मी ट्रॅक्टर, जीप, बैलगाडी चालवायला शिकले. शेतात नांगरणी करायची असेल किंवा कोणती पेरणी करायची असेल तर मी स्वतः वाहन चालवते. मुलं लहान होती. त्यावेळी स्वतः जीप घेऊन त्यांना शाळेत सोडण्यासाठी जात होते. धाडस करून सर्व वाहने चालवण्यास शिकले”.
मी शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा लोकांनी माझ्याशी बोलणं टाळलं
माझ्यावर अचानक आलेल्या जबाबदारीमुळे मी शेतीला सुरुवात केली. त्यावेळी मला अनेकांचे सहकार्य मिळणे अपेक्षित होते मात्र तसं झालं नाही. माझ्याशी सर्वांनी बोलणंच बंद केले. यापुढे जात अनेकांनी आमच्या शेतात जे रोजंदारी वर येत होते, त्यांना आमच्या शेतात काम करण्यासाठी जाऊ नका असे सांगितले जायचे. त्यांना दारू, जेवण दिले जायचे. एकदा माझ्या पाच एकर जमिनीत ऊसाची लागवड करायची होती. त्यावेळी येणाऱ्या गड्यांना दारू आणि जेवण दिले गेले. आणि गडी आले नाहीत. त्यावेळी आमचा एक कामगार, एक बाई आणि मी आम्ही तिघांनी पाच एकर ऊसाची लागण केली. असा अनेक वेळा त्रास मला दिला गेला. आबासाहेबांचे या भागात एवढं काम असूनही लोकांनी आम्हाला त्रास दिला.
संघर्षाच्या काळात कोणाचीच मदत मिळाली नाही
ज्यावेळी मी शेतीचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळी नातेवाईक,मित्रपरिवार यांच्याकडून कसलीच मदत मिळाली नाही. आबासाहेब मोहितेंनी अनेकांची मदत केली. अनेक जण त्याबाबत बोलतात. पण कोणीच काही सल्ला दिला नाही की, मदत केली नाही. त्यामुळे अनेकांनी नाव ठेवली तरी, धाडसी वृत्तीने काम करत राहिले. कोणी चुकीचे बोलले तर त्याला त्याच पद्धतीने उत्तरे दिली. म्हणून मी इथपर्यंतचा प्रवास करू शकले.
हेही पहा : Podcast | प्रगतशील महिला शेतकरी नूतन मोहितेंशी खास बातचीत | Women Farmer
अनेक गरिबांना मदत
माझ्यावर संघर्षाची वेळ आली तरी अनेक गरीब आणि गरजूंना मदत केली. अनेकांची स्वखर्चाने लग्न लावून दिली. स्वतःच्या दारात मांडव घालून लग्न लावली. माझ्या शेतात जे पिकलं ते देऊन मदत केली. आजही करते. भाऊबंदाने त्रास दिला म्हणजे ते फक्त मला शेतात काम करण्याची काय गरज आहे. मला काय कमी आहे, असं बोलत होते. तरी मी ते मनात न ठेवता मदत करत राहिले.
मुलं,सुना, नातवंडांना शेतीचे महत्व सांगते
मी स्वतः चाळीस वर्षाहून अधिक काळ शेतीचा कारभार पाहतेय. माझ्या मुला-मुलींना मी शेताबद्दल माहिती दिली. त्यांना शिकवले त्यानंतर माझ्या सुनांना सुद्धा शेती बद्दल माहिती दिली. माझ्या सुना शेतामध्ये सर्व काम करतात. नातवंडांना सुद्धा शेतातील सर्व काम शिकवते. जनावरांना चारा घालणं,धारा काढणे यासारखी सगळी कामं माझी मुलं, सुना, नातवंड करतात. प्रत्येकानं घरात शेतीबद्दल माहिती दिली गेली पाहिजे. किंवा आवड निर्माण केली पाहिजे.
शेतात एक मूठ धान्य टाकले तर दोन मूठ मिळते
शेती ही महत्त्वाची आहे. शेतीत एक मूठ धान्य टाकलं तर, दोन मूठ धान्य मिळते. नोकरी आज आहे उद्या नाही. सर्वांना सद्यस्थितीत नोकरी मिळेलच असं नाही. त्यामुळे सर्व तरुण मुला-मुलींना सांगते की, शेतीकडे वळलात तर तुमचाच जास्त फायदा आहे.
आता परिस्थिती बदलली आहे
शेतीला सुरुवात केली त्यानंतर बराच काळ संघर्षाचा होता. अनेक अडचणींचा सामना करत मी वाटचाल केली. धाडसाने सर्व गोष्टी करत राहिले. आज एवढ्या वर्षानंतर मात्र परिस्थिती बदलली आहे. जे लोक नातेवाईक, भाऊबंद मला नावं ठेवत होती. ते आज कौतुक करत आहेत. शेतात कामगार येऊन दिले जात नव्हते. तसा आता काही प्रकार नाही. त्यामुळे संघर्षाचा काळ सध्यातरी नाही.