उभारणी महत्त्वाची

घोषणा आणि भरावापेक्षाही उभारणी महत्त्वाची आहेच.
[gspeech type=button]

विभूतीपूजा नवलाई राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण हा काळाचा महिमा आहे. त्यांचं शौर्य आणि कर्तृत्व अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहावे ही सामाजिक गरज आहे. त्यासाठी चरित्रं, पुस्तकं, सिनेमे निर्माण करावे लागतील, व्याख्यानं द्यावी लागतील, महाप्रताप सांगणारी स्मारकं उभी करावी लागतील. पण त्यांचे पुतळे उभारणं ही आता सामाजिक स्मारकांपेक्षाही काही लोकांची राजकीय गरज झाली आहे. त्यामुळेच पुतळ्याचा कुठल्याही प्रकारे अवमान वा पुतळा कोसळणं हीसुद्धा एक राजकीय भूकंप आणणारी गोष्ट झाली. राजकारण अपरिहार्य झाल्यामुळे चूक कुणाचीही असो, प्रशासनाचं नेतृत्व करणाऱ्याने पुतळ्याची जबाबदारी घेऊन माफी मागणं हे संयुक्तिक आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभरवेळा छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली तरी ती कमीच वाटेल असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रस्तावित बंदराच्या पायाभरणी समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. अपेक्षा ही की या वादावर पडदा पडावा.

परंतु महाराष्ट्रातील विरोधी पक्षीयांना हे आयतं मिळालेलं कोलित विझू द्यायचं नसावं. निदान मनसुबा तरी तसाच दिसतो. या सगळ्या गदारोळात राजकीय व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराबद्दल तसेच सागरी दळणवळातील सामरिक नीतीबाबत शिवमहिमा गायला जात आहे. पण छत्रपतींच्या सामरिक तसेच संरक्षित सागरी व्यापारी मार्गाच्या दीर्घदृष्टीतून कुणी राजकीय परिपाठ अंगीकारतंय की त्याकडे पूर्णपणे पाठ फिरवतंय?

मुंबई बंदर हे आपण नाही तर ब्रिटिशांनी विकसित केलेलं बंदर आहे. मुंबई बंदराने गुजरातेतल्या सुरत या बंदराची मक्तेदारी मोडीत काढली. आपण मात्र स्वातंत्र्योत्तर काळात इतर राज्यांतल्या बंदरांना आपली मक्तेदारी मोडू दिली. मुंबई बंदरानंतर आपण नव्या बंदराचा विचारच केला नव्हता. मुंबई शहराचा व्याप वाढल्यावर मुंबई बंदराचा ताण वाटून घेण्यासाठी न्हावाशेवाचं बंदर विकसित केलं गेलं खरं. पण ते मुंबई बंदराचं प्रतिरूप झालं आणि मुंबईचं मूळ बंदर ओस पडलं. आपल्याला बंदरांचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून जागतिक पातळीवर व्यापार करणारं सोपारा आणि कल्याण यासारखी बंदरं होती. कल्याणच्या बंदरातून देशावर व्यापारी मालाची वाहतूक नाणेघाटामार्फत व्हायची. या दोन प्राचीन बंदरांसोबतच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर छोटी अनेक बंदरं होती आणि त्यातील काही आजही कार्यरत आहेत.

शिवकाळात या व्यापारी दळणवळणाला महाराजांनी सागरी चाच्यांपासून संरक्षण दिलं. तसेच स्वतःचं आरमार निर्माण करून खांदेरी-उंदेरीपासून ते सिंधुदुर्गापर्यंतच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज आणि ब्रिटिश दर्यावर्दींवर वचक ठेवला. महाराजांच्या अवघ्या पाच दशकांच्या आयुष्यात त्यांनी इतक्या ‘शाह्यां’शी लढा देताना आणि स्वराज्याची स्थापना करताना महाराष्ट्राचा सागरी किनारा दुर्लक्षित केला नाही.

आपण मात्र छत्रपतींकडून काही शिकलोच नाही. आपल्याच सागरी किनाऱ्यावरून राजरोसपणे आरडीएक्सही उतरलं आणि दहशतवादी अजमल कसाबही बिनधोक चालत आला. या घटनांमध्ये मुंबईचं आणि आपल्या सागरी संरक्षणाचं नाक कापलं गेलं.

आपण छत्रपतींचा शिवमहिमा गातो खरे, पण आपले राज्यकर्ते मात्र वाढवण बंदराबाबत गेल्या साठ वर्षांपासून फक्त पाठपुरावाच करत होते. शिवरायांची सामरिक नीती अनुसरण्याऐवजी ब्रिटिशांनी ठेवलेल्या संचिताच्या आधारावर सागरी लाटांवर स्वार होत होते.

आज वाढवण बंदराची पायाभरणी आणि दिघी बंदराच्या विस्ताराच्या घोषणेच्या वेळेसच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं कोसळणं हा संकेत काय सांगतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

घोषणा आणि भरावापेक्षाही उभारणी महत्त्वाची आहेच…

पण आपण उभारलेलं मूर्तिमंत संचित खाऱ्या आणि खऱ्या वादळ-वाऱ्यातही निगुतीनं जपता आलं पाहिजे.

ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trad Women : आपल्या कुटुंब व घराची काळजी घेणं यात चुकीचं काहीचं नाही. पण ही जबाबदारी घरातली स्त्रीच कशी उत्तमपणे
Rice or Roti: प्रसिद्ध लेखक आणि पौराणिककथा अभ्यासक देवदत्त पटनायक यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण आणि उत्तर प्रांतातील महिलांच्या शैक्षणिक प्रगतीचा
Meat sale ban on Independence day : कडोंमपानं स्वातंत्र्यदिनी कोंबडी, शेळी, मेंढर कापण्याची थोडक्यात मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढलाय.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ