महाराष्ट्राच्या आरोग्य आणि प्राणी कुंडलीतले ग्रह सध्या काही ठिक असल्याचे दिसत नाहीत. योगायोगानं या दोन्ही कुंडलीतले ग्रह एकाच अहिंसाप्रिय धर्माशी जोडले गेले आहेत. हा अहिंसाप्रिय समुदाय आता सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयालाही जुमानत नसल्याचं दिसत आहे.
न्यायालयाचा निर्णय ही कचऱ्याच्या पेटीत
न्यायालय आणि सरकारी आदेशांना धुडकावून कबुतरांना दानापाणी द्यायला अहिंसाप्रिय समुदाय एकवटला आहे. या समाजाचे मुनी गुरू महाराज यांच्या आदेशानंतर हा समुदाय रस्त्यावर आक्रमकपणे उतरला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दादरमधील कबुतरखान्याला ताडपत्री टाकून झाकण्यात आलं होतं. पण आज म्हणजे दिनांक 6 ऑगस्टच्या सकाळीच अहिंसाप्रिय समाजानं महिलांना पुढं करून ही ताडपत्री दूर केली. पोलिसांना न जुमानता, न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केलं गेलं. या संपूर्ण प्रकरणांवर दिनांक 7 ऑगस्टला उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असताना देशाच्या न्यायव्यवस्थेला न जुमानण्याची हिंमत अहिंसाप्रिय समुदायानं केली आहे. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा समुदाय रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याकरता चिथावत आहेत. आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्याकरता त्यांचा धर्म महत्त्वाचा आहे.
आरोग्य धोक्यात आहे तरिही हा अट्टहास…
कबुतरांची विष्ठा आणि पिसं यामुळं श्वसनमार्ग आणि फुप्फुसाला गंभीर संसर्ग होतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना संसर्गाचा जास्त आहे. काही नागरिकांचे मृत्यू याच संसर्गामुळं झाल्याचं सिद्ध झाल्यावर, महापालिकेत याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल झाल्या केल्या. पावसाळी अधिवेशनात यावर जोरदार चर्चा झाल्यावर मुंबईतील सर्व कबुतरखाने तातडीने तोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. बृहन्मुंबई महापालिकेनं कारवाईला सुरवात करताच लगेचच न्यायालयात या विरोधात याचिका दाखल झाल्या. आणि हेरिटेज कबुतरखाने तोडण्यावर स्थगिती आली. या कबुतरांना पोती पोती धान्य टाकण्याला मनाई करण्यात आली. पण मानवी आरोग्याला प्राधान्य देत मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांचा बंदोबस्त करायला हवा असंही म्हटलं. दिनांक 6 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी सरकार या कबुतरखान्यातील कबुतरांना ठराविक वेळेत दाणा-पाणी देईल असा तोडगा काढला होता.
हेही वाचा : शहरातल्या कबुतर खान्यांवर का उगारला जात आहे कारवाईचा बडगा?
अहिंसाप्रिय समाजाचं या कबुतरांवर भारीच प्रेम आहे. जागोजागी या समाजातल्या व्यक्ती कबुतरांना धान्य घालत असतात. अनेक नव्यानव्या जागी या मंडळींनी कबुतरखाने सुरू केले आहेत. मुंबई-ठाण्यात तर काही ठिकाणी भर रस्त्यातच कबुतरांना धान्य घातलं जातं. काही दिवसांपासून या समाजातील लोकांनी हे कबुतरखाने तोडणं आणि धान्य घालायला बंदी घालू नये याकरता सरकारवर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. मंगळवारी 5 ऑगस्टला सरकारमधील एक मंत्री आणि अहिंसाप्रिय समाजाशी जवळीक असणाऱ्या मंत्र्यांनी कबुतर हे शाकाहारी असल्याचं म्हटलं. आज 6 ऑगस्टला या समाजानं कबुतरखान्यांच्या समर्थनार्थ आंदोलन आणि सभा आयोजित केली होती. आज सकाळीच हे आंदोलन व सभा स्थगित केली आहे. आणि 7 ऑगस्टला न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू असं या समुदायानं म्हटलं होतं. पण थोड्याच वेळात दादरच्या देरासरमधून एकत्र बाहेर पडत, कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येनं जमून कबुतरखान्यावरील ताडपत्री दूर केली.
न्यायालयाच्या अवमानासाठी आंदोलनाची नियोजनबद्ध आखणी
महिलांना पुढं करून समुदायानं कबुतरांना दाणापाणी द्यायचा प्रयत्न केला. महिलांना अटक केल्यावर तरुणांचा जत्था कबुतरांना दाणे द्यायला पुढं आला. म्हणजे अगदी नियोजनबद्धरित्या न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला जात आहे. मूळात न्यायालयानं याआधीच मानवी आरोग्याला प्राधान्य द्यावं आणि कबुतरखाने हटवावेत असं म्हटलं असताना, सतत या प्रकरणी पुनर्वलोकन किंवा वेगवेगळ्या याचिका दाखल करून हा समाज सरकारला कारवाई करू देत नाहीये.
धार्मिक विधींसाठी महादेवी हत्तीणीच्या आरोग्याशी खेळ
याच समाजाशी संबंधित आणखी एक घडामोड कोल्हापुरात घडत आहे. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीशी संबंधित. नांदणी मठ हाही या अहिंसाप्रिय समुदायाचाच आहे. या हत्तीणीच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होत असतानाही तिला मठाच्या धार्मिक कामात सहभागी करून घेतलं जायचं. संधीवात, डोकेदुखी, जखमा, नखांमधील इन्फेक्शन, नैसर्गिक अधिवास यासर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं महादेवीला उपचारांकरता गुजरातमधील वनतारामध्ये दाखल करण्याचे आदेश दिले. पण यावरून या मठानं केवळ त्यांचाच समुदाय नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चुकीचा प्रचार करत वनतारामध्ये महादेवीला नेण्याविरोधात रान पेटवलं आहे. हत्ती हा समूहप्रिय, संघप्रिय प्राणी आहे. आरोग्याच्या प्रश्नांसोबतच कोणत्याही धार्मिक मानमरातबासाठी अशाप्रकारे हत्तींना वेठीस धरणे कितपत योग्य आहे. एखादा मनुष्य आजारी असल्यावर त्यालाही उपचारांची गरज असते. प्रसंगी त्याकरता रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याप्रमाणं वन्यप्राण्यांनाही अशा शुश्रुषेची आवश्यकता असते. मोठमोठ्यानं रडून, भावेनाचा आवेषाचं सार्वजनिक प्रदर्शन करून महादेवीच्या आरोग्यापेक्षा मठाची प्रतिष्ठाच इथं महत्त्वाची दिसत आहे. लोकांना चिथावून मोठमोठे मोर्चे काढले जात आहेत.
तथ्यांपेक्षा भावनांचा बाजार
हत्तीकरता नैसर्गिक अधिवास महत्त्वाचा नाही का, महादेवीचं आरोग्य महत्त्वाचं नाही का, महादेवीबद्दल खरंच आत्मियता आणि प्रेम वाटत असेल तर तिचं आरोग्य सुधारावं याकरता लोकभावना तयार झाली पाहिजे. मठाच्या प्रतिष्ठेपायी महादेवीचं आयुष्य पणाला लावायचा थिल्लरपणा सोडून द्यायला हवा. महादेवीच्या उपचारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांचा दबाव निर्माण केला जात आहे. साहजिकच स्थानिक राजकीय पुढारी या सर्वात उतरले नाही तर कसं चालणार. आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याकरता सर्वच राजकीय नेत्यांनी महादेवीला कोल्हापूरच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे. लोकांच्या कामांकरता एवढी तत्परता, एकजूट दाखवली जाते का? पालकमंत्री, नांदणी मठाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी दिनांक 5 ऑगस्टला बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महादेवीबाबत अंबानी कुटुंबाशी बोलणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याबद्दल कोल्हापूरहून पावणे सहाशे किलोमीटर अंतरावरील हिंगोलीमध्येही महादेवीला परत आणण्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिंगोलीतील नागरिकांचा असा मोर्चा काढण्याचं काय प्रयोजन असावं. या मोर्च्यात सहभागी झालेल्या किती खेडुतांना महादेवी, तिचं आरोग्य याबद्दल माहीत असावं.
आपल्या समाजाला एकवटून लोकभावनेला चिथावणी द्यायची. ना मानवाच्या आरोग्याला महत्त्व द्यायचं, ना प्राण्यांच्या आरोग्याला महत्त्व द्यायचं. आपल्या धर्माच्या नावाखाली इतर सर्वच मानवी समुदायाला वेठीस धरायचं काम अहिंसाप्रिय समुदाय बऱ्याच काळापासून करत आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारवर दबाव टाकून न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करायला लावायचं. न्यायालयात अनेक केसेस वर्षानुवर्ष रखडलेल्या आहेत. मानवी व प्राणी या दोघांच्याही आरोग्य व हिताला प्राधान्य देऊन न्यायालयानं निर्णय घेतला आहे. तरी पुन्हा पुन्हा एकाच विषयावर याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवणं आणि आपल्या संकुचित विचारांच्या समाजाला जे हवं तेच पदरी पाडून घेण्याचं काम हा समाज करतोय. इतर अनेक मुद्द्यांमध्येही हा समुदाय आम्ही वेगळे किंवा श्रेष्ठ दाखवण्याच्या नादात, इतर धर्म व जाती समुदायाला वेगळे पाडत असल्याच्या अनेक घटना सतत घडत आहेत. भारतीय घटनेनुसार सर्वच धार्मिक समुदायांना समान वागणूक आणि न्यायही अपेक्षित आहे. व्यापारी नाड्या या समाजाच्या हातात असल्यानं आणि राजकीय हितसंबंधांच्या नादात ‘लोककल्याणकारी राज्य’ या संकल्पनेला सरकारनं हरताळ फासू नये.