प्रसिद्ध लेखक आणि पौराणिककथा अभ्यासक देवदत्त पटनाईक आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की, उत्तर भारतातील महिला गव्हापासून रोटी तयार करतात. घरातल्या पुरुषांना गरमागरम रोटी देण्याच्या चक्रात त्या बहुतांश वेळ स्वयंपाकघरात घालवतात. भात शिजवण्यापेक्षा रोटी तयार करायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळं महिलांना शिकण्याकरता कमी वेळ मिळतो. भात शिजल्यानंतरही बराच वेळ गरम राहतो. काही नाही तर तूप घालूनही तो खाता येतो. ते पुढं असंही म्हणतात की, गहू हे पश्चिम आशिया व मध्यपूर्वेतून आपल्याकडे आले. हे महिलांना नियंत्रित करण्यासाठीच आले तर आग्नेय आशियातून आलेले तांदूळ, विड्याची पानं, सुपारी, नारळ आणि ऊस हे महिलांना स्वातंत्र्य देतात.
रांधायचा वेळ, एकत्र जेवण आणि स्थानिक पिकपद्धत
नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. काहींना ही गोष्ट खरी वाटते. चपाती, रोटी करणं काही महिलांना खरंच कंटाळवाणं वाटतं. काहींनी याचा संबंध त्यांच्या खाद्यसंस्कृतीशी जोडला. काहींच्या मते भात पचायलाही हलका आहे. गव्हामुळं खूप वेळ भूक लागत नाही. तांदूळ धुवून पाणी घालून शिजत ठेवलं की झालं. पोळीसारखं तिथंच थांबावं लागत नाही. काही म्हणतात, भात आणि चपात्या यांच्याशिवायही स्वयंपाकघरात अनेक कामं असतात ती महिलांनाच करावी लागतात. काहींना भात हे लठ्ठपणाला आमंत्रण वाटतं. काहींचं म्हणणं आहे की, फक्त भात आहारात असणाऱ्या घरात सर्वजण एकत्र बसून जेवतात. पण गरम पोळी ताटात हवीच्या नादात सर्व एकत्र बसून जेवू शकत नाहीत. त्यातूनही बाईला उरलेल्या असल्यानसलेल्या पदार्थांमध्येच भूक भागवावी लागते. तर काहींना आपलं खाणं भौगोलिक स्थिती हवामान याच्याशी संबंधित वाटते. गहू पिकणाऱ्या भागातलं थंड, कोरडं हवामान आणि कमी पाणी हे त्या पिकासाठी पोषक असल्यानं साहजिकच आहारात रोटीचे प्रमाण मुख्य आहे. तर दक्षिण प्रांतात किंवा पाण्याच्या मुबलक प्रमाण असणाऱ्या भागात भाताचं पिक मोठ्या प्रमाणात येतं. जिथं जे पिकतं त्याचा समावेश त्यांच्या आहारात मुख्यत्वे असतो. तर काहींच्या मते स्त्रियांनी शिकणं हे तिथल्या सामाजिक परिस्थितीवर अवलंबून आहे.
अजूनही स्वयंपाकघर बाईचीच जबाबदारी
स्वयंपाक आणि महिला हे आपल्याकडे अगदी घट्ट समिकरण आहे. महिला शिकल्या नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या तरी; घरातून बाहेर पडण्यापूर्वी नाश्ता, डबे हे करूनच तिनं बाहेर पडावं. बाहेरुन कितीही दमून आली तरी तिनंच स्वयंपाक करावा, घरच्या पुरुषाच्या हातात तो बाहेरून आल्यावर चहा पाणी आयतं मिळणार, तो त्याला हवा तसा वेळ घालवणार हे घट्ट रुजवलं गेलं. त्यामुळं आता अनेक अप्लायनसेस उपलब्ध असले आणि मदतनीस असल्या तरी किचन, मेन्यू प्लानिंग हे घरच्या बाईलाच करावं लागतं. घरातील महिला आणि पुरुष दोघेही नोकरी करणारे असले तरी फार कमी घरात पुरुष या गोष्टीत लक्ष घालतात. त्यामुळं भात किंवा पोळी, चपाती काहीही जरी असलं तरी बाईला त्यात लक्ष घालावचं लागतं.
भाताच्या शेतातली परिस्थिती काय?
हे तर झालं रांधायच्या बाबतीत. पण शेतातली स्थिती काय? तांदूळ आणि गहू ही दोन्ही पिकं भारतातील मुख्य आहाराचा भाग आहेत. तांदळाच्या शेतीकरता गव्हाहून अधिक कामगार लागतात. पारंपरिकपणे भात शेतीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. बियाणं पेरणं, आवणी-लावणी ते कापणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महिलाच काम करतात. एवढी सर्व कामं करुनही महिला या शेतीमधला फक्त ‘कामगार’च राहतात. जमिनीची मालकी त्यांच्याकडं असते का? तर याचं उत्तर अजूनही “नाही” हेच द्यावं लागतं. भात विक्री करतानाही त्यांच मत विचारात घेतलं जात नाही. किंवा आलेल्या उत्पन्नातली काही रक्कम मुद्दाम त्यांच्या हाती वेगळी दिली जात नाही.
संशोधक आणि धोरणकर्त्यांचं दुर्लक्ष
भात उत्पादनात गुंतलेल्या महिलांना धोरणकर्ते, संशोधकाकडूनही बहुतेकदा दुर्लक्षित केलं जातं. जमीन, कर्ज, प्रशिक्षण आणि विकास प्राधान्यक्रम निश्चित करण्यात त्यांचे प्रतिनिधित्व कमी असते. कृषी धोरण आणि पद्धतींचा महिलांच्या आरोग्यावर आणि शरीरावर काय परिणाम होतो याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. विविध प्रकारच्या नवीन बियाणांवर लक्ष दिलं जातं पण महिलांच्या कामाचा भार कमी करण्यासाठी किंवा त्यांचे धोके कमी करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेण्यासाठी संशोधकांकडून तुलनात्मक गुंतवणूक केली जात नाही. विशेषतः कृषी रसायनांच्या वापराच्या बाबतीत. पुरुष अधिक उत्पन्नासाठी गावाबाहेर जातात त्यामुळंही शेतीची जबाबदारी पूर्णपणे बाईवर येते. किटकनाशकं फवारणीही तिलाच करावी लागते. या रसायनांचाही तिच्या आरोग्यावर परिणाम होतोच.
शेतीसंबंधित काहीही निर्णय घ्यायचे झाले तरी ते पुरुषच घेतात. आणि हे फक्त भात नाही तर इतर शेतीकरताही लागू होतं. यामुळं फक्त आहारात भात की चपातीनं बाईच्या कामाचा भार कमी होतो. परिणामी तिला शिक्षणाकरता वेळ मिळतो. एवढ्यापुरतंच हे मर्यादीत राहू नये. हे पिकं पिकवणारी बाईही किती सक्षम होत आहे याकडंही लक्षं द्यायला हवं.