आजही भारताच्या ग्रामीण भागात मुलींच्या शाळागळतीचं प्रमुख कारण हे ‘पाळी’ आहे. पाळीबद्दलचा ‘टॅबू’ आहेच, त्यासोबतच पुरेसं पाणी आणि स्वच्छ प्रसाधनगृह या गोष्टीच उपलब्ध नसल्यानं आपोआप मुलींची शाळागळती होऊ लागते. पाळीबाबतची लाज, संकोच टाळून मुलींनी सन्मानाने या शारीरिक बदलाकडे पाहावं याकरता अनेक उपाययोजना सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था करत आहेत. पण या सर्व प्रयत्नांना खीळ बसवण्याचं काम शहाडमधील आर. एस. दमानी इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिकेनं केलं आहे.
मुलींची अंतर्वस्त्र काढून आणि हाताच्या बोटांचे ठसे घेऊन तपासणी
शहाडच्या या शाळेतील मुलींच्या प्रसाधनगृहात जमिनीवर रक्ताचे थेंब आढळल्यानं ते स्वच्छ करण्याऐवजी, शाळेची महिला कर्मचारी याबाबत थेट मुख्याध्यापिकांना कळवते. या कर्मचारी महिलेला त्याबाबत समज देण्याऐवजी मुख्याध्यापिका पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींना एकत्र बोलावून कोणाला पाळी आली आहे, आणि हे कोणी केलं असं दरडावून विचारतात. वॉशरुममधील डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवून जाब विचारू लागल्या. साहजिकच मुली घाबरल्या आणि कोणीही उत्तर देईना. मग मुख्याध्यापिकांनी आणखी चार शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना काही मुलींची अंतर्वस्त्र काढून तपासणी करायला सांगितली. एवढ्यावरच न थांबता मुलींच्या हाताचे ठसे घेऊन हे ठसे बाथरुममधील ठश्यांशी जुळतात का, अशी गुन्हेगारी तपासणी या मुख्याध्यापिकेनी सुरू केली. साहजिकच मुलींकरता ही अतिशय अपमानास्पद आणि शरमेची बाब झाली. यातील काही मुलींनी हा प्रकार घरी सांगितला आणि शाळेत जाणार नसल्याचं सांगितलं.
शिक्षिका आणि स्त्री म्हणूनही असंवेदनशील
मुलींनी शाळेत यावं, त्यांची पाळी शाळेत येण्याला अडसर होऊ नये याकरता अनेक पातळींवर उपाययोजना केल्या जात आहेत. सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन हा त्यातलाच एक भाग. शाळांच्या प्रसाधनगृहात सॅनिटरी पॅडचे व्हेडिंग मशीन्स लावली आहेत पण ती कार्यरत आहेत का, हे पाहणंही महत्त्वाचे आहे. शाळेनी पुढाकार घेऊन मुलींना पाळीबद्दलची शास्त्रीय माहिती सांगणं, शारीरिक व मानसिक बदलांची माहिती सांगून पाळीबाबत समुपदेशन करणं, शारीरिक स्वच्छता कशी राखायची, ही माहिती देणं अपेक्षित असताना शहाडमधील शाळेच्या मुख्याध्यापिकेनं मुलींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांशी मैत्रीचं आणि विश्वासाचं नातं निर्माण केल्यास विद्यार्थी आपोआप शिक्षकांकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात किंवा त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. पण दमानी शाळेतील मुख्याध्यापिकेनं स्वतः एक महिला असूनही या मुलींच्या नाजूक मनावर आपल्या कृतीचा किती विपरीत परिणाम होईल याचा जराही विचार केला नाही. त्यांना साथ देणाऱ्या शिक्षिकांनी कदाचित नोकरी जायच्या भीतीनं याला विरोध केला नसण्याची शक्यता आहे. पण तेही चुकीचंच आहे.
पाळीची साधनशुचिता
पाळी आणि तिच्या भोवतीची साधनशुचितता ही भारतीय मानसिकतेचा अविभाज्य भाग आहे. आजही ‘पाळी’ हा शब्द मोठ्यानं उच्चारला जात नाही. पाळीकरता कावळा शिवला, बाहेरची झाली, चम्स असे अनेक शब्द विविध वयोगटात वापरले जातात. मुख्याध्यापिका आणि सफाई कर्मचारी महिलेला कदाचित प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा वाटला असेल. पण याबाबतीतही मुलींचं योग्य प्रकारे समुपदेशन होणं गरजेचं आहे. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता कामा नये. एखादीची पाळी येण्याची पहिली वेळही असू शकते. घाबरून तिला नक्की काय करावं हे सुचलंही नसेल. हल्ली पाळी सुरू होण्याचं वय 9-10 वर्षाकडे सरकलं आहे. अशावेळी पालकांकडून कितीही गोष्टी सांगितल्या गेल्या तरी, शाळेनं तज्ज्ञ बोलावून याबाबत मुलींना माहिती देणं जरुरी आहे. शाळेच्या वॉशरूममध्ये सॅनिटरी पॅड ठेवणं आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण किंवा शारीर ओळख हा भाग अजूनही समाज आणि शाळांमध्ये टाळलाच जातो.
हेही वाचा –धडपड पाळीच्या पर्यावरणस्नेही उत्पादनांसाठी
शिक्षक म्हणून भान जपायला हवे
पूर्वी असं म्हटलं जायचं की शिक्षक समाज किंवा पिढी घडवतात. पण सकारात्मकपणे पिढी घडवण्याकरता शिक्षकही मुळात तेवढेच संवेदनशील असायला हवेत. एखाद्या विषयाची गोडी लागण्यात शिक्षकांचे शिकवणे आणि विद्यार्थ्यांसोबतचे वागणे कारणीभूत असते. कोवळ्या वयात शाळेतच अशा प्रकाराला सामोरं गेलेल्या या मुलींना आता समुपदेशाची गरज आहे. या मुलींनी शालेय शिक्षण न थांबवता झाल्या प्रकारातून बाहेर येण्यासाठी त्यांना पालकांसोबतच शाळा प्रशासनानेही मदत करायला हवी.
सध्या या मुख्याध्यापिका आणि सफाई कर्मचारी महिलेवर पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. चार शिक्षिकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण हा विषय एवढ्यावरच न थांबवता शिक्षकांच्या संवेदनशीलता जागृत करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना कशा हाताळाव्यात याचंही प्रशिक्षण देण्याची गरज दिसून येते.
1 Comment
huo3sd