सोशल मिडिया सध्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. जगातल्या काहीही घडामोडी अक्षरशः मायक्रो सेकंदात तुम्ही खुर्द किंवा बुद्रुकमध्ये बसले असाल तरी तुम्हांला कळतात. कोविड महामारीनंतर या सोशल मिडियामध्ये आणखी एक भर पडली म्हणजे ती विविध ट्रेंडची… म्हणजे कोणाच्या तरी सुपिक डोक्यातून काहीतरी कल्पना येते, आणि ती कल्पना इतर लोक उचलून धरतात. त्याकरता अगदी कॉफी, खाणं, कपडे, गाण्यावरील नाच अगदी काहीही या ट्रेंडमध्ये असू शकतं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत झालंय. अगदी साथ आल्यासारखं अनेकजण ते करून त्याचे व्हिडियोज पोस्ट करतात. कोविडच्या आधीही या गोष्टी होत्या पण याचं प्रमाण खूप कमी होतं.
आदर्श सून, आदर्श पतिव्रता आणि आदर्श माता
असाच काहीसा ट्रेंड 3-4 वर्षांपासून पाहायला मिळतोय, ‘ट्रॅड विमेन’ किंवा ‘ट्रॅड वाईफ’. ट्रॅडिशनल विमेन म्हणजेच पारंपरिक महिला याकरता वापरण्यात येणारं हे संक्षिप्त नाव. सोशल मिडियातील ट्रेंडकरता अशी लहानशी नाव वापरणंही सामान्य आहे. तर ‘ट्रॅड विमेन’ काय करते? एखादी पंचविशी ते पस्तीशीतली महिला घरातील सर्व सदस्यांपेक्षा लवकर उठणार, तिची आन्हीकं उरकणार, सडा सारवण नाही पण किमान रांगोळी तरी काढेल. केसांची लांब वेणी, साडी किंवा पारंपरिक पंजाबी ड्रेस असा पेहराव असणार. हलका-उठावदार मेकअप, कडक इस्त्रीचे कपडे, नीटनेटके केस असं सकाळीच छान आवरून कुटुंबासाठी नाश्ता तयार करणार. नवऱ्याकरता आणि मुलं असतील तर त्यांच्याकरता चारी ठाव पदार्थ असणारे ऑफिस-शाळेकरता डबे तयार करणार. काही जणी तर अगदी नवऱ्याच्या पायावर पाणी ओतून त्याला वाकून नमस्कार वगैरे करणार. सणसमारंभ अगदी उत्साहात पारंपरिकपणे करणार. घरातली रोजची कामं, नवरा-मुलं, सोबत असतील तर सासू-सासरे यांची सेवा करणं, घरासाठीची खरेदी करणं फक्त हेच या ‘ट्रॅड विमेन’चं आयुष्य असतं. या सर्व गोष्टींचे रोजचे व्हिडियो करून त्या पोस्ट करत असतात. आणि ह्या व्हिडियोजना प्रचंड व्ह्यूज आहेत. तुमच्या सोशल मिडिया फिडमध्ये एखादं रील, शॉर्टस् किंवा व्हिडियो आलं आणि तुम्ही ते पूर्ण पाहिलं किंवा त्यावर क्लिक केलंत तर त्याच त्याच प्रकारचा कंटेंट तुम्हांला सतत दिसत राहतो. गंमत म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही अशा ‘ट्रॅड वाईफ’ आहेत. काहीजणी तर सेलिब्रिटी आहेत आणि छान ब्रँडेड कपडे, मेकअप अशा नटूनथटून पोराबाळांसाठी, नवऱ्याकरता रांधत असतात. आदर्श सून, आदर्श पतिव्रता आणि आदर्श माता या सर्वच पुरस्कारांकरता आवश्यक गुण आपल्यात ठासून भरलेले आहेत हे या सर्वच देशी-परदेश ‘ट्रॅड विमेन’ दाखवत असतात.
गैर आहे का?
तर असं ‘ट्रॅड विमेन’ असणं यात गैर आहे का? तर अजिबात नाही. कोणी स्वतःहून शिक्षण घेता किंवा न घेता, आपल्या मर्जीनं किंवा घरातल्यांच्या मर्जीनं घर सांभाळण्याची जबाबदारी घेतात. ही जिची तिची वैयक्तिक बाब झाली. पण त्याचं उदात्तीकरण कितपत योग्य आहे. ह्या व्यक्तींचे व्हिडियो हजारो-लाखो-करोडोंच्या संख्येने पाहिले जातात. तेव्हा या अशाच गोष्टी आदर्श आहेत असं मानून आपल्या घरातील व्यक्तीकडूनही हे असं व्हायला हवं, ही अपेक्षा केली जाते.
प्रसिद्धी व पैसे कमवण्याचं साधन
‘ट्रॅड विमेन’च्या व्हिडियोतली व्यक्ती लोकांच्या मानसिकतेचा विचार करून असे व्हिडियो तयार करत असते आणि तिच्याकरता हे प्रसिद्धी व पैसे कमवण्याचं साधन असतं. किंबहुना जास्तीतजास्त व्ह्यूज असल्यावर हे पैसे कमवण्याचं माध्यमच असतं. प्लॅटफॉर्मकडून पैसे मिळतात. व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शनच्या संख्येवर या इन्फ्लुएन्सरना विविध उत्पादन, दुकानं, सेवांच्या जाहिराती मिळतात. त्यांच्या रोजच्या व्यवहारात या गोष्टी त्या वापरल्याचं व्हिडियोतून पाहायला मिळतं आणि आपल्यापर्यंत त्या गोष्टीची जाहिरात पोहचती होते.
संमिश्र प्रतिक्रिया
बऱ्याचदा हे अशा प्रकारचे व्हिडियो सोसायटी, फॅमिली व्हॉटसएप ग्रुपवर फॉरवर्ड होतात. या अशा आदर्श व्हिडियो खालच्या कमेंटस् संमिश्र असतात. पण यातील जास्तीत जास्त कमेंटस् ह्या ‘व्वा खूप छान, आदर्श, हेच योग्य’ अशा प्रकारातील असतात. काही जण ‘ट्रॅड विमेन’ विरोधी कमेंट करतात. आजच्या काळाशी हे कसं सुसंगत नाही. सगळ्यांनी घराच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. अशा कमेंट करणाऱ्या जास्त महिलाच असतात. पण एकंदर कमेंटस् पाहिल्या तर जास्तीत जास्त कमेंटस् ह्या ‘ट्रॅड विमेन’ लाईफस्टाईलचा उदोउदो करणाऱ्याच असतात. यात पुरुषीपणा डोकावत असतो.
अधिकार व वर्चस्ववादाचा भोवरा
पण या ‘ट्रॅड विमेन’ कळत-नकळतपणे समाजामधील मोठ्या गटावर आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून पारंपरिक श्रमविभागणी लादत आहोत. 70-75 वर्षांपूर्वीपर्यंत भारतातल्या घरोघरी हेच तर चित्र होतं. हळूहळू यात काही बदल झाला. शिक्षण घेतलं आणि रोजगार, व्यवसायाकरता महिला घराबाहेर पडली. आपलं करिअर करू लागली. पण तरी घर आणि मुलांचं संगोपन ही जबाबदारी अजूनही महिलेचीच मानली जाते. किंबहुना तिचं ‘कंडिशनिंगच’ तसं केलं जातं. एकिकडे महिला सबलीकरणाकरता सरकारी आणि खाजगी पातळीवर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मुलींचं शिक्षण, विविध क्षेत्रातील रोजगार, संशोधन याकरता विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अगदी निर्णयप्रक्रिया, सत्ताकेंद्रातही महिलांचं स्थान असावं याकरता घटनेत तरतूद केली गेली आहे. अनेक क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी, वर्चस्व महिलांनी मोडून काढलं. समान संधी, समान अधिकार असले तरी महिलांना सामाजिकदृष्ट्या समान जगण्याकरताचा अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण खूप मोठ्या संख्येनं अजूनही महिला अधिकार व वर्चस्ववादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेतच.
बहुतांश करिअर किंवा नोकरी करता घराबाहेर असणाऱ्या महिलेवर आधीच स्वतःच एक गिल्ट असतं, की मला मुलांकडे नीट लक्ष देता येत नाहीये. ‘ट्रॅड विमेन’ प्रकारचे रील, व्हिडियो आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद या महिलांवरचा ताण काही अंशी वाढवत आहेत का.. सोशलमिडियाचा वापरण्याची सुरुवात लोकांना जोडण्याकरती झाली. पण या आधुनिक साधन आणि माध्यमाचा उपयोग वैयक्तिक फायद्याकरता करताना समाजामध्ये आपण काय पेरत आहोत, हे लक्षात घेऊन कृती करण्याचं भान राखायला हवं.